![]()
पाचोरा – नगरपालिकेच्या निवडणुकीत आज प्रभाग क्रमांक ११ अ आणि १२ ब मध्ये होणारे मतदान हे केवळ दोन जागांपुरते मर्यादित नसून, संपूर्ण पाचोरा शहराच्या राजकीय दिशादर्शक ठरणारे आहे. दि. २ डिसेंबर रोजी २६ नगरसेवक पदे आणि १ नगराध्यक्ष पदासाठी मतदानाची प्रक्रिया एकूणच शांततेत आणि सुरळीत पार पडली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे या दोन प्रभागांतील उमेदवारांचे मतदान त्या दिवशी होऊ शकले नव्हते. त्यामुळे आज स्वतंत्रपणे या दोन प्रभागांसाठी मतदान घेण्यात येत असून, यामुळे निवडणुकीची उत्सुकता आणि नैसर्गीक तापमान थंड असले तरी चर्चेचे राजकीय तापमान वाढले आहे. आजच्या मतदानासाठी प्रशासनाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. मतदान

केंद्रांवर पुरेसे कर्मचारी, निवडणूक साहित्य, तसेच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मतदान प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निर्भय आणि शांततेत पार पडावी, यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. मतदारांनी कोणत्याही दबावाशिवाय, निर्भयपणे मतदान करावे, असे स्पष्ट आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लोकशाही प्रक्रियेतील हा महत्त्वाचा टप्पा शांततेत पार पडावा, हीच अपेक्षा सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. मात्र या निवडणुकीचे महत्त्व केवळ प्रशासनिक पातळीवर मर्यादित नाही. उद्या जाहीर होणाऱ्या निकालाकडे संपूर्ण पाचोरा शहराचेच नाही राज्याचेही लक्ष लागले आहे. कारण या निवडणुकीत केवळ

नगरपालिकेतील सत्तासमीकरण ठरणार नसून, पाचोरा स्थानिक राजकारणातील खरी ताकद कोणाच्या बाजूने आहे, हेही स्पष्ट होणार आहे. आजच्या मतदानातून मतदार EVM मधून कोणाला कौल देतात, आणि उद्या निकालात जनतेचा विश्वास कुणावर उमटतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या निवडणुकीला अधिक राजकीय वजन येण्याचे प्रमुख कारण म्हणजे येथे रंगलेली थेट राजकीय लढत. पाचोऱ्यात शिवसेनेचे आमदार किशोरआप्पा पाटील यांनी दंड ठोकत थेट राजकीय मैदानात उतरून आपली ताकद पणाला लावली आहे. त्यांच्या विरोधात पहिल्यांदाच ना. गिरीषभाऊ महाजन, आमदार मंगेशदादा चव्हाण, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, अमोलभाऊ शिंदे, वैशालीताई सुर्यवंशी अशी एकत्रित प्रभावी राजकीय फळी उभी राहिली आहे. परिणामी ही लढत केवळ नगरपालीका मर्यादित न राहता, आमदार किशोरआप्पा पाटील विरुद्ध संपूर्ण भाजप आणि त्यांचे समर्थक, असा थेट सामना म्हणून पाहिली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाहता, संपूर्ण भाजप विरुद्ध पाचोरा शिंदेगट शिवसेना अशी स्पष्ट राजकीय लढत मतदारांच्या समोर आहे. त्यामुळेच ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असली तरी तिचे पडसाद राज्यपातळीवर उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. विशेषतः आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोऱ्याचा निकाल हा राजकीय शक्तीमापनाचा एक महत्त्वाचा निकष ठरणार आहे. पाचोरा हे राजकीयदृष्ट्या नेहमीच चर्चेत असलेले शहर आहे. येथे होणारे राजकीय प्रयोग, पक्षीय समीकरणे आणि नेतृत्वाची भूमिका राज्याच्या राजकारणातही अनेकदा चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यामुळेच या दोन प्रभागांचे मतदान आणि त्यातून लागणारा निकाल हा केवळ नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता, व्यापक राजकीय संकेत देणारा ठरणार आहे. कोणत्या पक्षाला, कोणत्या नेतृत्वाला जनतेचा खरा पाठिंबा आहे, हे या निकालातून स्पष्ट होईल. मतदारांच्या भूमिकेकडे पाहिले तर यावेळी मतदारही अधिक जागरूक आणि विचारपूर्वक मतदान करत असल्याचे चित्र आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे, नेतृत्वाची विश्वासार्हता, तसेच भविष्यातील राजकीय स्थैर्य या सर्व बाबींचा विचार करून मतदार आपला कौल देत आहेत. त्यामुळे आजच्या मतदानातून व्यक्त होणारा जनतेचा आवाज हा केवळ एका दिवसापुरता न राहता, पुढील अनेक निवडणुकांसाठी दिशादर्शक ठरणार आहे. या निवडणुकीत प्रशासनाची भूमिका देखील महत्त्वाची आहे. शांतता, पारदर्शकता आणि कायद्याचे पालन या बाबींवर भर देत मतदान प्रक्रिया पार पाडली जात आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवा, दबाव तंत्र किंवा गैरप्रकारांना थारा मिळू नये, यासाठी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्ज आहेत. लोकशाही प्रक्रियेवर जनतेचा विश्वास टिकून राहावा, यासाठी ही दक्षता आवश्यकही आहे. एकूणच पाहता, पाचोरा नगरपालिकेच्या या दोन प्रभागांतील मतदान हे स्थानिक राजकारणाची कसोटी ठरणारे आहे. उद्या जाहीर होणारा निकाल हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरेल. तो केवळ विजयी आणि पराभूत उमेदवारांची नावे सांगणार नाही, तर पाचोऱ्यातील राजकीय वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत, याचाही स्पष्ट संदेश देईल. त्यामुळे आजचे मतदान आणि उद्याचा निकाल हे पाचोऱ्यासाठीच नव्हे, तर राज्याच्या राजकारणासाठीही महत्त्वाचे ठरणार आहेत. सर्वांच्या नजरा उद्याच्या निकालावर खिळल्या असून, जनतेचा कौल कुणाच्या बाजूने जातो, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आजच्या दोन प्रभागांचे मतदान हे निवडणुकीचा शेवटचा टप्पा असला तरी निर्वाचन आयोगाकडून अधिकृत अजूनही “एक्झिट पोल जाहीर करण्याची वेळ” जाहीर झालेली नाही. ती वेळ जाहीर होताच ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्राच्या माध्यमातून पाचोरा आणि चोपडा नगरपालिका या दोन्ही नगरपालिकांचा अधिकृत व कायदेशीर चौकटीत एक्झिट पोल जाहीर केला जाणार असल्याने, ध्येय न्यूज & झुंज वृत्तपत्राचे संपादक संदीप महाजन यांच्याकडे नागरिक, वाचक व राजकीय नेते & कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर चौकशी होत असल्याचे चित्र आहे.






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.




