![]()
६ जानेवारी आला की पत्रकारितेचे तथाकथित उत्सव सुरू होतात. शुभेच्छांचे फलक, सोशल मीडियावर फोटो, एकमेकांवर कौतुकाचा वर्षाव आणि अचानक उगवलेली पत्रकारांची गर्दी—हे दृश्य आता नवीन राहिलेले नाही. वर्षभर बातम्यांत दिसणारी नावे मोजकीच असतात; पण पत्रकारदिनी आणि पाकीटे वाटप प्रसंगी मात्र पत्रकारांची संख्या दुपटीने-तिपटीने वाढल्यासारखी भासते. हे केवळ हास्यास्पद नाही, तर पत्रकारितेच्या मुळावर घाव घालणारे वास्तव आहे. आजची कटू वस्तुस्थिती अशी आहे की अनेक ठिकाणी बातम्या केवळ १० ते १५ ठराविक लोकांच्याच नावावर सातत्याने लागतात. उर्वरित अनेक जण वर्षभर कुठेच नसतात. मात्र दीपावली भेट, पाकीट वाटप, सत्कार समारंभ किंवा पत्रकार दिन आला की हेच चेहरे पत्रकार म्हणून पुढे येतात. पत्रकारिता ही जबाबदारी नसून संधी असल्यासारखी वागणूक दिली जाते. पत्रकारिता हा व्यवसाय नसून समाजसेवा असल्याचे आपण वर्षानुवर्षे सांगतो. पण प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पत्रकारदिन , दिवाळी, पाकीट वाटप प्रसंगी पत्रकार जन्माला येतात. वर्षभर सामान्य माणसाचे प्रश्न, शेतकऱ्यांचे दु:ख, कामगारांचे हाल, महिलांवरील अन्याय, प्रशासनातील भ्रष्टाचार याकडे दुर्लक्ष करणारे काही लोक ६ जानेवारीला & भेट वस्तु वाटप प्रसंगी मात्र व्यासपीठावर झळकतात. भाषणे करतात, सन्मान स्वीकारतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा अदृश्य होतात. खरे पत्रकार ऊन-पावसाची पर्वा न करता बातमीसाठी उभे राहतात. धमक्या, दबाव, आर्थिक अडचणी, अपमान सहन करूनही सत्य मांडतात. पण त्यांची संख्या मर्यादित असताना, पोटभरू प्रवृत्तीची गर्दी वाढत चालली आहे. पत्रकारिता आता ओळखपत्र, प्रेस कार्ड, वाहनावरील स्टिकर किंवा सोशल मीडियावरील डीपीपुरती मर्यादित होत चालली आहे. या सगळ्यात सर्वात गंभीर आणि लाजीरवाणी बाब म्हणजे पत्रकारांच्या नावावर किंवा पत्रकार संघटनांच्या नावावर लायकी नसलेल्या व्यक्तींची पुरस्कार देणाऱ्यांची—खरे तर विकणाऱ्यांची—संख्या वाढत चालली आहे. पत्रकारितेशी काहीही संबंध नसलेले, समाजासाठी शून्य योगदान असलेले लोक केवळ पैशांच्या जोरावर किंवा ओळखीच्या आधारे पुरस्कार मिळवतात. हे पुरस्कार सन्मानाचे नसून व्यवहाराचे साधन बनले आहेत. जे पुरस्कार खऱ्या पत्रकारांच्या मेहनतीसाठी असायला हवेत, ते आज बाजारात विक्रीस ठेवलेल्या वस्तूसारखे वाटू लागले आहेत. यामुळे प्रामाणिक पत्रकारांचा अपमान तर होतोच, पण समाजाच्या नजरेत पत्रकारितेची किंमतही घसरते. “हा पण पत्रकार?” असा प्रश्न सामान्य माणसाच्या मनात निर्माण होतो आणि हीच पत्रकारितेची सर्वात मोठी शोकांतिका आहे. यात भर म्हणून ‘ब्रेकिंग’च्या नावाखाली सुरू असलेली भंपक पत्रकारिता. अर्धवट माहिती, अप्रमाणित बातम्या, अफवा आणि केवळ प्रसिद्धीसाठी दिलेले ब्रेकिंग—यामुळे पत्रकारितेचा दर्जा रसातळाला गेला आहे. बातमीची खातरजमा, भाषेची शुद्धता, शिक्षणाची कमी या आशयाची जबाबदारी यांचा विचारच केला जात नाही. अनेकांना शुद्ध मराठी बोलता किंवा लिहिता येत नाही; तरीही पत्रकार असल्याचा आव आणला जातो. भाषा ही विचारांची शिस्त असते. जिथे भाषा गंडते, तिथे विचारही गंडतात. अशा अपुऱ्या भाषिक क्षमतेसह समाजाला दिशा देण्याचा दावा करणारी पत्रकारिता ही दिशाभूल करणारी ठरते. पत्रकार दिन हा केवळ शुभेच्छा, फोटोसेशन आणि सत्कारांचा दिवस नसावा. तो आत्मपरीक्षणाचा दिवस असायला हवा. आपण वर्षभर काय केले? कुणासाठी उभे राहिलो? कुणाचा आवाज बनलो? सत्तेला प्रश्न विचारले का, की सोयीसाठी गप्प बसलो? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरे शोधली गेली, तरच पत्रकारितेचा आत्मा जिवंत राहील. खऱ्या पत्रकारांना ओळख देण्याचा, बनावट पत्रकार, पुरस्कारविक्रेते आणि पोटभरू प्रवृत्तीला आरसा दाखवण्याचा हा दिवस ठरायला हवा. अन्यथा पत्रकारदिनी, दीपावली भेटीच्या वेळी किंवा पाकीट वाटपाच्या प्रसंगी जन्माला येणाऱ्या पत्रकारांची व पत्रकार संघटनेची संख्या वाढतच राहील आणि वर्षभर बातम्या मात्र मोजक्याच लोकांच्या नावावर राहतील. सोशल मीडियासाठीचा आशयही याच वास्तवाकडे निर्देश करतो—पत्रकारदिनी जन्माला येणारे, भेटवस्तू व पुरस्कारांवर जगणारे आणि ‘ब्रेकिंग’वर पोट भरणारे चेहरे वाढत असताना, वर्षभर सत्यासाठी उभे राहणारे पत्रकार आजही मोजकेच आहेत.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







