![]()
पाचोरा – मराठी भाषेतील आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पाचोरा पोलीस प्रशासनाच्या वतीने उद्या मंगळवार, दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पाचोरा पोलीस स्टेशन येथे छोटेखानी पण आशयपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे. पत्रकारिता आणि प्रशासन, विशेषतः पोलीस प्रशासन यांचे नाते हे नेहमीच संवेदनशील, कधी संघर्षपूर्ण तर कधी सहकार्याचे राहिले आहे. समाजाच्या हितासाठी सत्य समोर आणण्याची जबाबदारी प्रसारमाध्यमांवर असते, तर कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर असते. या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडताना अनेकदा मतभेद, टीका-टिप्पणी, कठोर लेखन किंवा कारवाईची वेळ येते. वर्षभरात प्रसारमाध्यमांकडून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका झाली असेल, काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित झाले असतील किंवा एखाद्या घटनेवर कठोर शब्दांत लिखाण झाले असेल, तरीसुद्धा पत्रकार दिनाच्या दिवशी त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून पत्रकारांचा सन्मान करण्याची भूमिका पाचोरा पोलीस प्रशासनाने घेतली आहे, हे निश्चितच उल्लेखनीय आणि गौरवास्पद मानले जात आहे. पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजप्रबोधनाचे, जनजागृतीचे आणि लोकशाहीचे चौथे स्तंभ म्हणून ओळखली जाणारी जबाबदारीची भूमिका आहे. सत्य मांडताना पत्रकारांना अनेकदा नाईलाजाने कठोर वास्तव लिहावे लागते, काही गोष्टींबाबत तडजोड करता येत नाही, तर काही प्रसंगी प्रशासनाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करणे अपरिहार्य ठरते. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनालाही कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाई करावी लागते आणि एखाद्या पत्रकाराच्या विरोधात कारवाई करावी लागली, तरी ती वैयक्तिक नसून कायदेशीर प्रक्रियेचा भाग असतो. या दोन्ही बाजूंचा परस्पर नाईलाज समजून घेऊनही आपले ऋणानुबंध टिकवून ठेवणे, हेच परिपक्व लोकशाहीचे खरे लक्षण असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित होत आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी “दर्पण” या पहिल्या मराठी वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेचा पाया घातला आणि समाजात जागृती घडवून आणली. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत आजचे पत्रकार सामाजिक प्रश्न, अन्याय, भ्रष्टाचार, शोषण तसेच चांगल्या कामांची दखल घेत समाजासमोर निर्भीडपणे सत्य मांडत आहेत. अशा पत्रकारांचा सन्मान करणे, त्यांच्या कार्याची दखल घेणे आणि संवादाचे पूल अधिक भक्कम करणे, हा पत्रकार दिन साजरा करण्यामागील खरा उद्देश आहे. पाचोरा पोलीस प्रशासनाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमातून हाच सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून प्रसारमाध्यमे आणि पोलीस प्रशासन यांच्यातील नाते हे संघर्षापुरते मर्यादित न राहता संवाद, समन्वय आणि परस्पर आदरावर आधारित असावे, ही भूमिका या उपक्रमातून स्पष्टपणे पुढे येत आहे. समाजहितासाठी दोघांचीही भूमिका अत्यंत महत्त्वाची असून एकमेकांच्या मर्यादा आणि जबाबदाऱ्या समजून घेत पुढे जाणे काळाची गरज असल्याचेही यानिमित्ताने अधोरेखित होत आहे. या कार्यक्रमात पत्रकार बांधवांची उपस्थिती केवळ औपचारिक न राहता ती या ऋणानुबंधांना अधिक दृढ करणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पत्रकार दिनानिमित्त पोलीस स्टेशनमध्ये आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम एक सकारात्मक पाऊल मानला जात असून यामुळे भविष्यातही पोलीस–प्रसारमाध्यमांमध्ये अधिक सुसंवाद आणि विश्वासाचे नाते निर्माण होईल, अशी आशा व्यक्त होत आहे. दरम्यान, पाचोरा पोलीस प्रशासनाने हा स्तुत्य उपक्रम राबवला असला तरी पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीनेही अशाच स्वरूपाचा उपक्रम केवळ मर्यादित न ठेवता तालुकास्तरावरील तसेच पंचक्रोशीतील सर्व पत्रकारांना आमंत्रित करून व्यापक स्वरूपात राबवावा, अशी अपेक्षा ध्येय न्यूज व साप्ताहिक झुंज वृत्तपत्राचे संपादक संदीप महाजन यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार दिनानिमित्त अशा उपक्रमांची व्याप्ती वाढल्यास पोलीस प्रशासन आणि प्रसारमाध्यमांमधील परस्पर समज, सुसंवाद आणि सहकार्य अधिक दृढ होईल.

ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






