![]()
पाचोरा – नगर परिषदेत झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्षच्या स्थानिक संघटनेत तीव्र अस्वस्थता निर्माण झाली असून या पराभवामुळे केवळ राजकीय नुकसान झाले नाही तर निर्णयप्रक्रियेत जुन्या, निष्ठावंत पदाधिकाऱ्यांना सातत्याने डावलले जात असल्याची तीव्र भावना उफाळून आली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांच्या पक्ष कार्यालयात भाजपच्या जुन्या व ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन नेतृत्वाच्या मनमानी व एकतर्फी निर्णयांवर उघड नाराजी व्यक्त केली. अनेक वर्षांपासून पक्षासाठी तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेतले जात असल्याने पक्ष संघटनेत तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेत भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, माजी पंचायत समिती सभापती सुभाष मुंढे पाटील, बन्सीलाल पाटील, व्यापारी आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष कांतिलाल जैन, तालुकाध्यक्ष गोविंद शेलार, माजी तालुकाध्यक्ष हिंमतसिंग निकुंभ, शहराध्यक्ष दीपक माने, माजी शहराध्यक्ष रमेश वाणी, दत्ता बोरसे पाटील, नंदूबापू सोमवंशी, समाधान मुळे, माजी पदाधिकारी डॉ. शांतीलाल तेली, प्रदीप पाटील आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत भूमिका मांडताना मधुकर काटे यांनी सांगितले की पक्षाने मागील काळात काही नेत्यांना पक्षात सामावून घेणे हा अंतर्गत निर्णय असू शकतो, मात्र त्या निर्णयांचे परिणाम काय होऊ शकतात याची माहिती आम्ही वेळोवेळी पक्षश्रेष्ठी, जिल्हाध्यक्ष तसेच ना. गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांना दिली होती, तरीही योग्य वेळी ठोस निर्णय न झाल्याने पाचोरा व भडगाव नगरपालिकेत भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही आणि दारुण पराभव स्वीकारावा लागला. तरीसुद्धा आम्ही पक्षावर नाराज नाही, कोणीही राजीनामा देणार नाही, कारण भारतीय जनता पक्ष हा शिस्तीत चालणारा पक्ष असून पक्षाचा आदेश आमच्यासाठी सर्वोच्च आहे आणि कोणताही नेता पक्षापेक्षा मोठा नाही, हे त्यांनी ठामपणे स्पष्ट केले. मात्र पराभवानंतर आवश्यक असलेली आत्मपरीक्षणाची व सखोल चर्चा झाली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली तसेच पाचोरा नगर परिषद गटनेता निवडीदरम्यानही ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता परस्पर निर्णय घेण्यात आल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपच्या कोट्यातून स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय अधिकच वादग्रस्त ठरला असून कोअर कमिटीत असतानाही काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना डावलून थेट निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या निर्णयाबाबत ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा मुख्य आक्षेप असा आहे की स्वीकृत नगरसेवक म्हणून अॅड. अविनाश सुतार यांचे नाव निश्चित करण्यात आले असून त्यांनी शेतकरी अनुदान घोटाळ्यातील आरोपींचे वकीलपत्र स्वीकारले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुदानाशी संबंधित गंभीर घोटाळ्यातील आरोपींचे प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीला भाजपकडून स्वीकृत नगरसेवक करणे म्हणजे थेट शेतकरीविरोधी भूमिका घेतल्यासारखे असून हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्याने आम्हाला मान्य नाही व त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे स्पष्ट करण्यात आले. ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मते प्रत्यक्षात पक्षासाठी त्याग करणारे, अनेक वर्षे निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते आणि ज्यांना शब्द देण्यात आला होता त्यांनाच संधी देणे आवश्यक होते परंतु तसे झाले नाही शिवाय आगामी काळात ग्रामीण भागात जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुका होणार असून अशा वेळी जनतेसमोर विशेषतः शेतकऱ्यांसमोर जाताना अनुदान घोटाळ्याशी संबंधित वकिलाला भाजपचे स्वीकृत नगरसेवक म्हणून सदस्यत्व दिल्याचे उत्तर कसे द्यायचे, असा थेट सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. हा निर्णय भारतीय जनता पक्षाच्या तत्त्वांना व शेतकरीहिताच्या भूमिकेला शोभणारा नसल्याचे सांगत स्वीकृत नगरसेवक निवडीचा निर्णय तातडीने रद्द करावा, अशी आक्रमक मागणी करत पाचोरा नगर परिषद पराभवानंतर भाजपमध्ये निर्णयप्रक्रियेतील पारदर्शकता, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि शेतकरीहित या मुद्द्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे या पत्रकार परिषदेतून ठळकपणे समोर आले आहे.याप्रकरणी वरिष्ठ स्तरावरून गंभीर दखल घेण्यात आली असून भाजपच्या वरिष्ठ स्तरावरून शेतकरी अनुदान घोटाळ्या प्रकरणी आरोपीचे वकीलपत्र घेणारे ॲड. अविनाश सुतार यांचे स्वीकृत नगरसेवक पद रद्द साठी युद्ध पातळीवर जोरदार हालचाल सुरू झाली आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






