![]()
पाचोरा -अनुदानासंदर्भात उद्या दिनांक 15 जानेवारी 2025 गुरुवारी सकाळी 11.30 वाजता प्रांताधिकारी कार्यालयासमोर गुलाबसिंग पाटील यांचे आमरण उपोषण तर संदीप महाजन यांचे शेतकरी बांधवांसोबत लाक्षणिक उपोषण होणार असल्याची ठाम भूमिका जाहीर झालेली असताना, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाचोरा तहसील कार्यालयाने आज पत्रकार संदीप महाजन यांना एक सविस्तर व अधिकृत पत्र पाठवून सन 2019 पासून आजपर्यंतच्या शेतकरी अनुदान प्रकरणांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रामध्ये पाचोरा तालुक्यात अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्ती, नुकसानभरपाई तसेच विविध शासकीय योजनांतर्गत देण्यात आलेल्या अनुदानासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारी, चुकीच्या खात्यावर वर्ग झालेल्या रकमा, त्यावर करण्यात आलेली प्रशासकीय व कायदेशीर कार्यवाही तसेच सद्यस्थिती यांचा तपशील देण्यात आला असून, सदर पत्राची जशीच्या तशी प्रिंट प्रत बातमीसोबत जोडण्यात आली आहे. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाकडून पाठवण्यात आलेल्या या पत्रानुसार, सन 2019 पासून आजपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींची दखल घेऊन त्या वेळोवेळी संबंधित गावांच्या ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आल्या व उपलब्ध अधिकृत अभिलेखांच्या आधारे अनेक प्रकरणांचे निराकरण करण्यात आले असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तपासणीदरम्यान काही प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांचे अनुदान चुकीच्या खात्यावर वर्ग झाल्याचे निदर्शनास आले असून, अशा एकूण 598 इसमांच्या खात्यावर 2 कोटी 7 लाख 50 हजार 597 रुपये इतकी रक्कम चुकीच्या पद्धतीने जमा झाल्याची नोंद कार्यालयीन स्तरावर असल्याचे पत्रात नमूद आहे. या गंभीर स्वरूपाच्या प्रकरणाची दखल घेऊन पाचोरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ असल्याचेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. तसेच चुकीच्या खात्यावर जमा झालेल्या रकमेपैकी शासनाकडे वसुलीची कार्यवाही करत 46 इसमांकडून 17 लाख 62 हजार 26 रुपये इतकी रक्कम शासनाकडे जमा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अनुदानाच्या अफरातफरीप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे एफ.आय.आर. क्र. 428/2025 दाखल असून या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्याकडून करण्यात येऊन संबंधित प्रकरणात मा. न्यायालयात चार्जशीट सादर करण्यात आलेली आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचेही पत्रातून स्पष्ट होते. दरम्यान, आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेनुसार केवळ खुलासे व आकडेवारी पुरेशी नसून, सन 2019 पासून आजपर्यंत शेतकऱ्यांना मंजूर झालेली एकूण रक्कम, प्रत्यक्ष अदा करण्यात आलेली रक्कम, अद्याप अदा न झालेल्या रकमा, तसेच ज्यांना अद्याप अनुदान मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांची नावे व त्यामागील कारणांसह संपूर्ण माहिती पीडीएफ स्वरूपात जाहीर करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. तसेच 2019 पासून आजपर्यंत कोणताही

शेतकरी अनुदानापासून वंचित राहू नये, गुन्हा दाखल असो, कोर्टकचेरी सुरू असो, वसुलीची प्रक्रिया असो किंवा कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय बोजे असोत, या प्रक्रियांशी शेतकऱ्यांचा थेट संबंध नसून यादीतील शेवटच्या घटकापर्यंत प्रत्येक पात्र शेतकऱ्याला संपूर्ण अनुदानाची रक्कम मिळालीच पाहिजे, अशी ठाम भूमिका आंदोलनकर्त्यांनी जाहीर केली आहे. तहसील कार्यालयाच्या पत्रामध्ये माहे ऑक्टोबर 2024 मधील नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचाही उल्लेख करण्यात आला असून, 41 हजार 408 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना एकूण 57 कोटी 19 लाख 19 हजार 535 रुपये इतक्या रकमेचे अनुदान मंजूर करून त्यांची यादी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचे नमूद आहे. ग्राम महसूल अधिकारी यांच्या अहवालानुसार आधार, बँक तपशील व संमतीपत्र प्राप्त असलेला कोणताही पात्र शेतकरी ई-पंचनामा पोर्टलवर अपलोड होण्यापासून प्रलंबित नसल्याचेही तहसील कार्यालयाने स्पष्ट केले आहे. एकीकडे तहसील प्रशासनाने अनुदान प्रकरणांतील कार्यवाही नियमांनुसार झाल्याचा दावा केला असताना, दुसरीकडे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, उद्या होणाऱ्या आमरण व लाक्षणिक उपोषणानंतर प्रशासन व आंदोलनकर्ते यांच्यातील पुढील घडामोडींकडे पाचोरा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






