![]()
पाचोरा : शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांना गती मिळावी तसेच नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांच्या विविध अडचणींचे एकाच ठिकाणी मार्गदर्शन व निराकरण व्हावे, या उद्देशाने पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघात ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले आहे. गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ४.०० या वेळेत महाराष्ट्र कृषी विकास महामंडळ (MAIDC) गोडाऊन, गिरड रोड, DYSP कार्यालयासमोर, पाचोरा येथे हे शिबिर पार पडणार असून मतदारसंघातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या जन्मदिनाचे औचित्य तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध विभागांशी संबंधित सेवा, आवश्यक मार्गदर्शन, योजनांची माहिती, कागदपत्रांबाबत सहाय्य आणि नागरिकांच्या विविध प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तत्काळ मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे विविध कामांसाठी वेगवेगळ्या कार्यालयांचे वारंवार हेलपाटे मारण्याऐवजी नागरिकांना एकाच ठिकाणी अनेक शासकीय सेवांचा लाभ मिळणार आहे. या समाधान शिबिराला प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार किशोर आप्पा पाटील, विधानसभा सदस्य, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी, जळगाव रोहन घुगे, उपविभागीय अधिकारी, पाचोरा भुषण अहिरे, तहसिलदार, पाचोरा विजय बनसोडे आणि तहसिलदार, भडगाव शितल सोलट यांचीही उपस्थिती लाभणार आहे. विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांच्या समस्यांचे गांभीर्याने ऐकून त्यावर आवश्यक ती कार्यवाही व मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध राहणार असल्याने हे शिबिर नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध शासकीय योजनांचे लाभार्थी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती, अर्ज प्रक्रियेचे मार्गदर्शन, प्रलंबित विषयांबाबत आवश्यक सल्ला आणि प्रशासकीय स्तरावर समन्वय साधून अनेक प्रश्नांना सकारात्मक दिशा देण्याचा प्रयत्न या शिबिरातून केला जाणार आहे. शिबिरासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीचा विचार करून पार्किंगची व्यवस्था गो. से. हायस्कूल येथे करण्यात आली आहे. नागरिकांनी वेळेचे नियोजन करून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि शासनाच्या विविध सेवांचा लाभ घेऊन आपल्या समस्या मांडण्याची ही संधी उपयोगात आणावी, असे आवाहन करण्यात आले आहे.





























