![]()
पाचोरा : शासनाच्या वतीने 30 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या **’छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरा’**च्या पूर्वतयारीत प्रशासनाने दाखविलेल्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भुयारी पुल ते गो. से. हायस्कूल या मुख्य मार्गावरील मोठमोठे खड्डे शिबिरासाठी येणाऱ्या हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गंभीर अडथळा ठरत असल्याने ही बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या काही तासांत संबंधित यंत्रणा सक्रिय झाली आणि मध्यरात्रीच रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. 28 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 5.30 वाजता प्रांत अधिकारी भूषण अहिरे, डी.वाय.एस.पी. बापु रोहन, तहसीलदार विजय बनसोडे, मुख्याधिकारी मंगेश देवरे तसेच नगरपालिका प्रशासनाकडे ही समस्या मांडण्यात आली. समाधान शिबिराचे महत्त्व, विद्यार्थ्यांची नियमित ये-जा आणि नागरिकांची सातत्याने होणारी गैरसोय लक्षात घेऊन प्रशासनाने या विषयाला सर्वोच्च प्राधान्य दिले. नगरपालिका मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी तातडीने परिस्थितीचा आढावा घेत संबंधित यंत्रणा कार्यान्वित केली. त्याचबरोबर नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोरआप्पा पाटील यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत आवश्यक त्या उपाययोजना त्वरित राबविण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. प्रशासनाच्या या जलद निर्णयक्षमतेमुळे रस्ता दुरुस्तीचे काम कोणताही विलंब न लावता सुरू करण्यात आले. त्यानंतर नगर उपाध्यक्ष किशोर बारवकर यांचे सुपुत्र जय बारावकर यांना घटनास्थळी बोलाविण्यात आले. सार्वजनिक कामांमध्ये नेहमीप्रमाणे पुढाकार घेत जय बारावकर यांनी संपूर्ण कामाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी स्वतः मध्यरात्री घटनास्थळी उपस्थित राहून प्रत्येक टप्प्यावर कामाची पाहणी केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्याधुनिक मशिनरी, रोलर व आवश्यक यंत्रसामग्रीचा वापर करून रात्री बारा वाजल्यापासून पहाटे चार वाजेपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आले. कामाच्या गुणवत्तेबरोबरच नागरिकांच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले. दुरुस्ती सुरू असताना संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात चारचाकी वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले, तसेच आवश्यक त्या ठिकाणी बॅरिकेट्स उभारण्यात आले. 29 जुलै रोजी पहाटे नागरिकांनी पाहणी केली असता रस्त्यावरील खड्डे मोठ्या प्रमाणात बुजविण्यात आल्याचे आणि सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, यापूर्वीही या मार्गावरील काही भागांची दुरुस्ती जय बारावकर यांच्या पुढाकारातून करण्यात आली होती. त्या कामाचा दर्जा आजही अनेक ठिकाणी कायम असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे यावेळीही त्यांनी कोणतीही प्रसिद्धी न शोधता प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रशासनाशी समन्वय साधत काम वेळेत पूर्ण करून दाखविल्याने त्यांच्या कार्यपद्धतीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. या समाधान शिबिरात महसूल, कृषी, संजय गांधी योजना, पुरवठा, वीज वितरण, पंचायत समिती, वन, भूमी अभिलेख, परिवहन, आरटीओ, पोलीस, ग्रामीण रुग्णालय, महिला व बालविकास, शिक्षण, पशुसंवर्धन, नगरपालिका, सहकार, राष्ट्रीयीकृत बँका आणि बीएसएनएलसह एकूण 19 विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे हजारो लाभार्थी या शिबिरात सहभागी होणार असून त्यांच्या सोयीसाठी केलेली ही रस्ता दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचे तातडीचे नियोजन, नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोरआप्पा पाटील यांची सकारात्मक भूमिका, प्रांत अधिकारी भूषण अहिरे, डी.वाय.एस.पी. बापु रोहन, तहसीलदार विजय बनसोडे यांचा प्रशासनाशी प्रभावी समन्वय आणि जय बारावकर यांनी प्रत्यक्ष उभे राहून पार पाडलेली जबाबदारी यामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. विशेषतः आमदार किशोरआप्पा पाटील यांचे शिवसैनिक म्हणून सार्वजनिक हिताचा प्रश्न प्राधान्याने हाताळत विद्यार्थी, नागरिक आणि समाधान शिबिरासाठी येणाऱ्या हजारो लाभार्थ्यांच्या सोयीसाठी जय बारावकर यांनी घेतलेला पुढाकार हा कौतुकास्पद असल्याच्या भावना नागरिकांकडून व्यक्त होत असून त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.





























