Home Dhyeya News Special हुतात्मा स्मारक परिसरातील घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष; मूळ प्रश्न सोडून इतरांवर कारवाई का?...

हुतात्मा स्मारक परिसरातील घाणीच्या साम्राज्याकडे दुर्लक्ष; मूळ प्रश्न सोडून इतरांवर कारवाई का? पत्रकार संदीप महाजन यांचा सवाल

0
132

Loading

पाचोरा : शहरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबविताना सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ, सुरक्षित आणि सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनाची आहे आणि ती मोठ्या प्रमाणात राबवली देखील जाते. मात्र राजीव गांधी टाऊन हॉल समोरील महादेव मंदिरालगत असलेल्या हुतात्मा स्मारकाच्या भिंतीलगत गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेल्या घाणीचे साम्राज्य, अनावश्यक साहित्याची साठवण आणि सार्वजनिक जागेचा होत असलेला गैरवापर याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पत्रकार तथा स्वातंत्र्य सैनिक पुत्र संदीप महाजन यांनी केला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, त्यांचा आक्षेप कोणाच्याही व्यवसायावर किंवा रोजीरोटीवर नसून, हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता, सार्वजनिक शिस्त आणि अनावश्यक साहित्यामुळे निर्माण होणाऱ्या अस्वच्छतेवर आहे. संदीप महाजन यांच्या म्हणण्यानुसार, राजीव गांधी टाऊन हॉलमधील गाळा घेतलेल्या एका ज्यूस व फ्रुट विक्रेत्याकडून गाळ्याबाहेर पंधरा ते वीस फूट अतिक्रमण करून दुकान थाटले आहे त्याने आणखी 50 फूट बाहेर दुकान आणले तरी काही हरकत नाही मात्र फळांचे कॅरेट, रिकामे खोके, इतर साहित्य तसेच अनावश्यक वस्तू दीर्घकाळापासून हुतात्मा स्मारक भिंती लागत  सार्वजनिक जागेत ठेवण्यात येत आहेत. त्याच परिसरात फळे व भाजीपाल्याचा कचरा टाकला जात असल्याने हुतात्मा स्मारकालगत अस्वच्छतेचे गंभीर चित्र निर्माण झाले असून, परिसराचे सौंदर्य आणि पावित्र्य बाधित होत आहे. या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार तथा स्वातंत्र्य सैनिक पुत्र संदीप महाजन यांनी मागील वर्षी नगरपालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीचा उद्देश केवळ हुतात्मा स्मारकालगत साचलेली घाण, अनावश्यक साहित्य आणि सार्वजनिक जागेचा गैरवापर थांबविणे हा होता. मात्र, मूळ समस्या दूर करण्याऐवजी ज्या छोट्या व्यावसायिकांची तेथे रोजीरोटी सुरू आहे, जे आपल्या व्यवसायाच्या ठिकाणी नियमित स्वच्छता राखतात, अशांनाही कारवाईचा फटका बसल्याची बाब अत्यंत अन्यायकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे मूळ प्रश्न कायम राहिला आणि ज्यांच्याविरोधात तक्रार नव्हती त्यांनाच मनस्ताप सहन करावा लागल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या प्रकरणी भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष तथा नगरसेवक यांनीदेखील नगरपालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. तरीदेखील हुतात्मा स्मारक परिसरातील घाण, कचरा आणि अनावश्यक साहित्य हटविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या दिसत नसल्याचे संदीप महाजन यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या परिसरात अतिक्रमण रोखण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचे स्वतंत्र पथक नियमित उपस्थित असते. असे असतानाही हुतात्मा स्मारकालगत पडून असलेले साहित्य, कचरा आणि अस्वच्छतेकडे दुर्लक्ष का केले जाते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. येत्या ९ ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर हुतात्मा स्मारक परिसरातील वाळू, खडी, कचरा, रिकामे खोके, कॅरेट आणि इतर अनावश्यक साहित्य तातडीने हटवून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्यात यावी. तसेच त्या ठिकाणी दुचाकी वाहनांसाठी अधिकृत पार्किंगचा फलक लावण्यात आल्यास सार्वजनिक जागेचा योग्य वापर होईल, कचरा टाकण्यास आळा बसेल आणि भविष्यात अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही. हुतात्मा स्मारक हे स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे प्रतीक असल्याने त्याचा परिसर स्वच्छ, सुंदर आणि सन्मानास पात्र राहणे ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे कोणाच्याही व्यवसायावर गदा न आणता, मूळ तक्रारीचा आशय लक्षात घेऊन घाणीचे साम्राज्य, अनावश्यक साहित्याची साठवण आणि सार्वजनिक जागेचा गैरवापर तातडीने थांबविण्यासाठी प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी पत्रकार तथा स्वातंत्र्य सैनिक पुत्र संदीप महाजन यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!