![]()
जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीने संघटनात्मक तयारीला वेग देण्याच्या दृष्टीने ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता काँग्रेस भवन, जळगाव येथे नूतन जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अँड. अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत तालुका व शहर पातळीवरील संघटन मजबूत करण्यासह जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण आणि बूथनिहाय कमिट्यांच्या निर्मितीवर विशेष चर्चा होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष भैय्यासाहेब संदीप पाटील, प्रदेश उपाध्यक्ष योगेंद्र पाटील, जिल्हा प्रभारी डॉ. अरविंद कोलते, प्रदेश सरचिटणीस मुफ्ती हारून नदवी, अ.भा.का. सेवादलचे राष्ट्रीय सचिव विनोद कोळपकर तसेच प्रदेश सचिव प्रवीण सुरवाडे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची तयारी, कार्यकर्त्यांची जबाबदारी, बूथ पातळीवरील संघटनात्मक बांधणी तसेच जिल्हा बँकेच्या संदर्भातील विषयांवरही दिशा निश्चित केली जाणार आहे. बैठकीला विशेष उपस्थिती म्हणून आमदार शिरीष चौधरी, आमदार रमेश विठ्ठल चौधरी, प्रदेश सरचिटणीस अँड. सलीम पटेल, डॉ. ए. जी. भंगाळे, राजीव दादा पाटील, जिल्हा बँक संचालक डॉ. सुरेश शामराव पाटील, माजी शहर जिल्हाध्यक्ष श्याम भाऊ तायडे, ज्येष्ठ नेते श्रीधर विष्णू चौधरी, मुनव्वर खान, प्रदेश ओबीसी सेल उपाध्यक्ष अशोक खलाने आणि माजी जिल्हा सरचिटणीस विजय वाणी उपस्थित राहणार आहेत. बैठकीदरम्यान जिल्हा कार्यकारिणीतील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये विजय महाजन – प्रदेश उपाध्यक्ष, ओबीसी सेल, श्वेता पाटील – एनएसयूआय प्रदेश उपाध्यक्ष, राहुल मोरे – प्रदेश सरचिटणीस, एससी सेल, किरण महाजन – जिल्हाध्यक्ष, ओबीसी सेल, एडवोकेट कौस्तुभ पाटील – जिल्हाध्यक्ष, एनएसयूआय आणि अँड. अंकुश कटारे – जिल्हाध्यक्ष, एससी सेल यांचा समावेश आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्षाची संघटनात्मक यंत्रणा अधिक प्रभावी करत गावागावातील कार्यकर्त्यांशी संपर्क वाढविणे, स्थानिक प्रश्नांवर सक्रिय भूमिका घेणे आणि आगामी निवडणुकांसाठी सक्षम यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न या बैठकीतून केला जाणार आहे. जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेला नव्या स्वरूपात गतिमान करण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची ठरणार आहे. सर्व संबंधित कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बैठकीस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा प्रशासन सरचिटणीस बाबा देशमुख यांनी केले आहे.





























