![]()
जळगाव : जिल्ह्यात अन्नपदार्थांच्या भेसळीविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडून (FDA) कारवाई सुरू असताना जळगाव शहरातील कारवायांची माहिती व संबंधित प्रतिष्ठानांची नावे जाहीर केली जातात; मात्र पाचोरा शहरात करण्यात आलेल्या कारवाईत नेमक्या कोणत्या ठिकाणी छापे टाकण्यात आले, संबंधित आस्थापनांची नावे काय आणि मालक कोण, याबाबत स्पष्ट माहिती जाहीर करण्यात न आल्याने अन्न व औषध प्रशासनाच्या जळगाव विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. जळगावमधील कारवाईनंतर या प्रकरणाचे धागेदोरे पाचोऱ्यापर्यंत पोहोचले. प्रशासनाच्या पथकाने पाचोरा शहरातील दोन ठिकाणी छापे टाकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईदरम्यान सुमारे २ हजार ५०० रुपये किमतीचा संशयास्पद साठा थेट नष्ट करण्यात आला. तसेच पाचोरा येथून १ लाख ३२ हजार ३९२ रुपये किमतीचे १७४.२ किलो संशयास्पद तूप आणि २ लाख ८ हजार ५६० रुपये किमतीचे ३७९.२ किलो क्रीम जप्त करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संशयास्पद तूप व क्रीम जप्त झाल्याची माहिती दिली जाते, तर दुसरीकडे ज्या ठिकाणी ही कारवाई झाली त्या प्रतिष्ठानांची नावे जाहीर केली जात नाहीत, ही बाब नागरिकांच्या दृष्टीने गंभीर आहे. कारवाई केलेल्या ठिकाणाचे नाव जाहीर न करण्यामागे नेमके कारण काय, असा सवाल आता उपस्थित होत आहे. जळगाव शहरातील कारवाईमध्ये संबंधित ठिकाणांची माहिती प्रसिद्ध केली जाते, मग पाचोऱ्याच्या बाबतीत वेगळी भूमिका का? एखाद्या ठिकाणी संशयास्पद अथवा भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्याबाबत पारदर्शक माहिती देणे आवश्यक आहे. मात्र पाचोरा कारवाईबाबत अधिकृत माहितीमध्ये संबंधित प्रतिष्ठानांची नावे स्पष्टपणे समोर न आल्याने संशयाला वाव मिळत आहे. विशेष म्हणजे, पाचोरा शहरात कारवाई झाल्यानंतर संबंधित विभागाकडून स्थानिक पातळीवर अधिकृत प्रश्नोत्तर, स्पष्टीकरण किंवा सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याची बाबही चर्चेत आहे. त्यामुळे जळगाव FDA कार्यालयाकडून पाचोऱ्याच्या कारवाईबाबत माहिती जाहीर न करण्यामागे नेमके प्रशासकीय अथवा कायदेशीर कारण काय आहे? याचे स्पष्टीकरण संबंधित अधिकाऱ्यांनी देणे गरजेचे आहे. पाचोऱ्यात जप्त करण्यात आलेल्या तूप व क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत का, त्यांचा अहवाल काय आला, संबंधित आस्थापनांवर कोणती कारवाई प्रस्तावित आहे, तसेच नष्ट करण्यात आलेल्या साठ्याचे स्वरूप काय होते, याचीही माहिती नागरिकांना मिळणे आवश्यक आहे. अन्नभेसळ हा थेट नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित विषय असल्याने कारवाईत पारदर्शकता, समान निकष आणि अधिकृत माहिती अपेक्षित आहे. जळगावमध्ये कारवाईची माहिती प्रसिद्ध होते आणि पाचोऱ्यात मात्र संबंधित ठिकाणांची नावे टाळली जातात, असा आभास निर्माण होत असेल तर तो दूर करण्याची जबाबदारी संबंधित विभागाची आहे. त्यामुळे पाचोऱ्यातील कारवाई नेमकी कोणत्या दोन ठिकाणी झाली आणि संबंधित प्रतिष्ठानांची नावे जाहीर न करण्यामागील अधिकृत कारण काय, याचे स्पष्टीकरण अन्न व औषध प्रशासनाने तातडीने द्यावे, अशी मागणी झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजचे संपादक संदीप महाजन यांनी केली आहे





























