मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : दत्तगुरु प्रतिष्ठान, परशुराम नगर व ओम कालभैरव चॅरीटेबल ट्रस्ट (वडाळा) तसेच नवऊर्जा फाउंडेशन यांच्या वतीने शिवजयंती उत्सवानिमित्त विभागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन परशुराम नगर येथे करण्यात आले.
या वेळी नवऊर्जा फाउंडेशनचे अध्यक्ष स्वप्नील चंदने, खजिनदार सचिन कसाबे, दत्तगुरु प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतिश कोळी आणि सचिव अनिल शिगवण उपस्थित होते.
शिबिरामध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेतला व मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणीचा लाभ घेतला. सामाजिक बांधिलकीतून आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम उल्लेखनीय असून, भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा संकल्प आयोजकांनी व्यक्त केला.
भाईंदर (गुरुदत्त वाकदेकर) : महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत स्वयंसिद्धा फाउंडेशन आणि सहकार भारती, मिरा भाईंदर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अनुभूती – महिला सक्षमीकरण काळाची गरज’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणारा हा कार्यक्रम २३ मार्च २०२५ रोजी सायं. ३.०० ते ६.०० या वेळेत भाईंदर सेकंडरी स्कूल, उत्तन रोड, भाईंदर पश्चिम येथे संपन्न होणार आहे.
कार्यक्रमात महिला सक्षमीकरण काळाची गरज (उद्योजकत्वास पोषक शासकीय योजना), डिजिटल मार्केटिंग, दक्षता – ऑनलाइन फसवणुकीपासून बचाव ह्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच नाविन्यपूर्ण व भरीव कामगिरीसाठी महिला संस्था व व्यक्तींचा सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिक मंच (उत्पादन व विपणन) घोषणा देखील केली जाणार आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन वैशाली आवाडे (महिला प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश) यांच्या हस्ते होणार आहे. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शरदजी जाधव (संगठन प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश) तसेच विशेष निमंत्रित म्हणून भूषणजी पैठणकर, सचिव, महाराष्ट्र प्रदेश, विजयजी जोशी, सचिव, स्वयंसिद्धा फाउंडेशन, डॉ. तेजस्वी शिंदे, पोलीस निरीक्षक, शरदजी गांगल, बँक प्रकोष्ठ प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश, अध्यक्ष टीजेएसबी बँक, डॉ. आदित्य मानके, संचालक, संजीवनी कॅन्सर हॉस्पिटल, मधुसूदनजी पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश, आशा बिटाने, उद्योजिका, मंगेश पवार, महामंत्री, मुंबई प्रदेश, प्रवीण बुल्लाख, सह संगठन प्रमुख, राजू ठाणगे, कोकण विभाग प्रमुख, वीणा मोकाशी, कोकण विभाग सह प्रमुख, जया अलीमचांदानी, महिला सहकारी संस्था, महाराष्ट्र प्रदेश, अश्विनी बुल्लाख, हाउसिंग प्रकोष्ठ प्रमुख, महाराष्ट्र प्रदेश, भारती पवार, महिला सहकारी संस्था प्रमुख – महाराष्ट्र प्रदेश हेदेखील उपस्थित राहणार आहेत.
या भव्य उपक्रमात ५०० हून अधिक महिला उद्योजिकांचा सहभाग अपेक्षित असून, व्यावसायिक संधींबाबत सखोल मार्गदर्शन मिळणार आहे. महिलांना उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेसाठी प्रेरित करण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण मंच ठरेल. महिला उद्योजकांनी आणि इच्छुकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी स्वयंसिद्धाचै विश्वस्त मानसी जोशी, राजेश पाटील, संचाक मेघना गावडे, आराधी ठाकूर, दत्ताराम वाळवणकर, कल्पना उबाळे तसेच निलेश गोसावी, जिल्हा अध्यक्ष, जयेव वाडकर, जिल्हा महामंत्री, किशोर थिटे, जिल्हा संगठन प्रमुख, चारूशिला शेळके, जिल्हा महिला सह प्रमुख, मीरा खोस, जिल्हा बचत प्रमुख, मयुरी घाडगे, जिल्हा बचत सह प्रमुख, सुजाता सकपाळ, जिल्हा हाऊसिंग प्रमुख हे अथक परिश्रम घेत आहेत.
जळगाव – महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदी श्री अनिल महाजन यांची पुन्हा निवड झाल्याबद्दल राज्याच्या पर्यावरण, हवामान बदल, महिला व बालकल्याण मंत्री आणि ओबीसी समाजातील अग्रणी नेत्या श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या कार्यक्षम नेतृत्वाला सन्मानित
केले आहे. विधान भवन, मुंबई येथे प्रत्यक्ष भेटी दरम्यान त्यांनी श्री. महाजन यांना शुभेच्छापत्र देत पुढील कार्यासाठी प्रोत्साहन दिले. अनिल महाजन हे गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे कार्य प्रभावीपणे पार पाडत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सामाजिक समरसतेचा पुरस्कार करत, त्यांनी अनेक युवकांना रोजगार, शिक्षण व आरोग्याच्या दृष्टीने प्रोत्साहित केले आहे. माळी समाजासह इतर घटक समाजांमध्ये त्यांच्या कार्याची ठसठशीत छाप उमटली असून, पुन्हा निवड ही त्यांच्या नेतृत्वदायी क्षमतेवर समाजाने दाखवलेला विश्वास आहे. पंकजाताई मुंडे, या केवळ एक मंत्री नाहीत, तर ओबीसी समाजाच्या उन्नतीसाठी झगडणाऱ्या एक लढवय्या नेत्या म्हणून सर्वत्र परिचित आहेत. त्यांचे योगदान केवळ राजकीय मर्यादेत न थांबता समाजविकासाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करणारे आहे. ग्रामीण महिला सक्षमीकरण, स्वयंपूर्ण गाव विकास, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकास या सर्व क्षेत्रात त्यांचे कार्य प्रेरणादायी ठरले आहे. त्यांच्या हस्ते श्री अनिल महाजन यांना दिलेले अभिनंदन पत्र हे केवळ औपचारिक नाही, तर समाजात प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नेतृत्वाला दिलेली एक सन्मानाची पावती आहे. मुंबईतील विधान भवनात झालेल्या सदिच्छा भेटीत पंकजाताई मुंडे यांनी अनिल महाजन यांच्याशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या भविष्यातील कार्ययोजनांबद्दल उत्सुकता व्यक्त केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्र माळी समाज महासंघाच्या कार्यपद्धती व विस्तार याबाबतही माहिती घेतली. पंकजाताई मुंडे यांचे शुभेच्छापत्र हे केवळ शब्दांचा संग्रह नव्हता, तर समाजासाठी काहीतरी भव्य करण्याची उमेद आणि संकल्प दर्शवणारा दस्तऐवज होता. माळी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनिल महाजन यांनी शिक्षण, कौशल्यविकास, महिला सक्षमीकरण, आरोग्य सेवा, सामाजिक समरसता आणि आर्थिक स्वावलंबन यांसारख्या विषयांवर सातत्याने काम केले आहे. त्यांनी अनेक वेळा युवकांना स्वयंरोजगाराच्या संधी, शेती क्षेत्रात नवकल्पना आणि उद्योजकता याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यांचे नेतृत्व हे संघटनात्मक, प्रबोधनात्मक व परिवर्तनशील स्वरूपाचे असून, त्याचा लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचत आहे. पंकजाताई मुंडे व अनिल महाजन यांचे परस्पर सहकार्य ओबीसी समाजासाठी एक सकारात्मक उदाहरण ठरत आहे. सामाजिक चळवळी आणि राजकीय निर्णय यांचा संगम हा समाजाला भक्कम आधार देणारा असतो, आणि हे उदाहरण त्याचे प्रत्यक्ष दर्शन घडवते. या सहकार्यामुळे राज्यातील इतर समाज संघटनांनाही प्रेरणा मिळेल व सामाजिक समन्वय अधिक बळकट होईल, असे विविध सामाजिक नेत्यांचे म्हणणे आहे. अनिल महाजन यांनी या पुनर्नियुक्तीनंतर व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया अत्यंत सकारात्मक होत्या. त्यांनी सांगितले की, “ही निवड माझ्या कामगिरीची पावती नसून, ही जबाबदारी आता अधिक मोठ्या पातळीवर कार्य करण्याची प्रेरणा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही एक व्यापक यंत्रणा उभारणार आहोत.” ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील एक प्रेरणादायी घटना म्हणून लक्षात राहील. अनिल महाजन यांचे अभिनंदन हे त्यांच्या कार्याची दखल आहे, तर पंकजाताई मुंडे यांचा पाठिंबा समाजातील परिवर्तनासाठी उभ्या राहणाऱ्या नेतृत्वाचे बळ आहे. आज जेव्हा संपूर्ण राज्य सामाजिक समरसतेकडे वाटचाल करीत आहे, तेव्हा अशा कार्यकर्त्यांना राजकीय पाठिंबा मिळणे ही समाजासाठी एक सकारात्मक दिशा दर्शवते.
‘वेलकम बॅक सुनीताजी’ – हे शब्द केवळ एका अंतराळवीराच्या घरी परतण्याचं स्वागत नाही, तर संघर्ष, चिकाटी, विज्ञानप्रेम आणि स्त्रीशक्तीच्या महत्त्वपूर्ण विजयाचं अभिनंदन आहे. तब्बल 286 दिवस अंतराळात, 4576 वेळा पृथ्वीभोवती प्रदक्षिणा, आणि एका साहसी मोहिमेनंतर पुन्हा पृथ्वीवर आगमन करणाऱ्या सुनीता विल्यम्स या भारतीय वंशाच्या सुप्रसिद्ध अंतराळवीराने नव्या इतिहासाची नोंद केली आहे. सुनीता विल्यम्स यांचे हे अंतराळप्रवास केवळ अंतराळात फिरण्याचे नाही, तर शारीरिक, मानसिक आणि वैज्ञानिक कसोटीचा प्रवास होता. NASA च्या ‘Boeing Starliner Crew Flight Test Mission’ अंतर्गत त्यांनी आपल्या सहकारी अंतराळवीरासोबत अंतराळात अनेक प्रयोग, देखरेखीचे कार्य, आणि शारीरिक सहनशक्तीच्या सीमा गाठणारे अनुभव घेतले. या मिशनमध्ये त्यांना दीर्घकाळ सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये राहणे, शारीरिक स्नायूंवर होणारा परिणाम, मानसिक तणाव, आणि अनेक तांत्रिक आव्हाने पेलावी लागली. त्यांच्या या 286 दिवसांच्या मोहिमेत त्यांनी प्रत्येक 90 मिनिटांत पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण केली. एकूण 4576 प्रदक्षिणा म्हणजे जवळपास 20 लाख किलोमीटरहून अधिक अंतर – एक प्रकारे अवकाशात पृथ्वीच्या विविध ऋतूंचा साक्षीदार होण्याचा अद्भुत अनुभवच! अवकाशातून पृथ्वीवर परत येणं म्हणजे केवळ रॉकेटने खाली उतरणं नाही. यामध्ये वायूजन्य घर्षण, पृथ्वीच्या वातावरणात पुनर्प्रवेशाची प्रक्रिया, आणि स्पेस कॅप्सूलचे स्थिर लँडिंग ही अत्यंत संवेदनशील आणि अचूक गणितावर आधारित प्रक्रिया असते. सुनीता यांच्यासाठीही ही घडी सोपी नव्हती. कॅप्सूलमध्ये लागणारी गरम होणारी ढाल, अत्याधुनिक ‘parachute deployment system’, आणि शेवटी जमिनीवर नियंत्रित उतरणं — हे सर्व अत्यंत जोखमीचे आणि अचूक वेळेवर अवलंबून असलेले घटक होते. अनेक वेळा space capsule च्या parachute सिस्टममध्ये अडथळे, कमी ऊर्जा परिणाम, किंवा इलेक्ट्रॉनिक प्रणालीमध्ये अडचणी उद्भवू शकतात. पण सुनीता आणि त्यांच्या टीमने हे सर्व अडथळे पार करत यशस्वी लँडिंग पूर्ण केले. सुनीता यांचा जन्म अमेरिकेत झाला असला, तरी त्यांची आई गुजराती आणि वडील महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या जवळचे असल्याने त्यांच्या मनात भारताबद्दल नेहमी आपुलकी राहिली आहे. त्यांनी नौदल वैमानिक म्हणूनही कारकीर्द गाजवली असून, त्यानंतर NASA मध्ये वरिष्ठ अंतराळवीर म्हणून त्यांचा उत्कर्ष झाला. त्यांचे अंतराळातील प्रयोग आजही जैवविज्ञान, गुरुत्वाकर्षण संशोधन आणि मानवी आरोग्य प्रणालीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. सुनीता यांनी आपल्या मोहिमेदरम्यान अनेक वैज्ञानिक प्रयोग केले ज्यामध्ये: 1) मानवी रक्ताभिसरणावर सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा परिणाम 2) अवकाशात ध्वनी तरंगलहरींचा प्रभाव 3) वनस्पतींच्या वाढीवर परिणाम 4) अवकाश जीवनशैलीतील मानसिक तणावावर प्रयोग हे सर्व प्रयोग भविष्यातील मंगल आणि चंद्र मोहिमांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. आज भारतातील बेटी बचाओ, बेटी पढाओ मोहिमेच्या युगात सुनीता विल्यम्स सारख्या महिला प्रेरणा देणाऱ्या आहेत. STEM (Science, Technology, Engineering, Math) क्षेत्रातील मुलींना सुनीता यांचा आदर्श हे खऱ्या अर्थाने “गगनवेधक स्वप्न” दाखवतो. सुनीता यांची ही यात्रा अंतराळाची नव्हे तर आत्मविश्वासाची होती. त्यांच्या कर्तृत्वामुळे भारतालाही जागतिक विज्ञानदृष्टीचा नवा दृष्टिकोन मिळाला आहे. “वेलकम बॅक सुनीताजी” — हे शब्द आता केवळ एका अंतराळवीरासाठीच नाहीत, तर अनेक स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी दिलासा देणारी प्रेरणा आहेत.
प्रतिनिधी – सुनील बेलदार, नाशिक मालेगाव – तालुक्यातील देवळा परिसरातील शैक्षणिक इतिहासात एक आगळावेगळा आणि भावनिक सोहळा नुकताच संपन्न झाला. लोकनेते व्यंकटराव हिरे माध्यमिक विद्यालय, महाल पाटणे या विद्यालयातील इयत्ता दहावीच्या सन 2003-04च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम तब्बल वीस वर्षांनंतर, अत्यंत आनंदमय वातावरणात आणि भरगच्च सहभागासह पार पडला. ही खास भेट दि. 16 मार्च 2025, रविवार रोजी, मालेगाव तालुक्यातील चिंचावड येथील नव्याने सुरू झालेल्या “नीम व्हॅली हॉटेल व रिसॉर्ट” या निसर्गरम्य ठिकाणी पार पडली. एकत्र येण्याच्या आनंदात सहभागी होणाऱ्या माजी विद्यार्थ्यांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. अनेक वर्षांनी शालेय जीवनाच्या आठवणींना उजाळा देत, भावनिक ओलावा अनुभवण्याची ही एक सुवर्णसंधी होती. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन व समन्वय सुनील बेलदार यांनी अतिशय मेहनतीने आणि संवेदनशीलतेने पार पाडले. त्यांनी केवळ कार्यक्रमाचे आयोजनच नव्हे तर उपस्थित सर्वांच्या मनात पुन्हा शाळेची आठवण जागवण्याचा एक अनोखा प्रयत्न केला. सुनील बेलदार यांच्या या अतुलनीय प्रयत्नांमुळे या गेट-टुगेदरचा दर्जा केवळ एक सामाजिक समारंभ राहिला नाही, तर तो एक संवेदनशील भावबंधाचा सोहळा बनला. या गेट-टुगेदरमध्ये जेव्हा शाळेतील वर्गमित्र-मैत्रिणी एकमेकांना अनेक वर्षांनी प्रत्यक्ष भेटले, तेव्हा क्षणभर काळ जणू थांबून गेला. काही क्षणांसाठी सगळं वातावरण शालेय दिवसांमधील गोंधळ, खोडकरपणा, अभ्यास, शिक्षकांचे शिकवणं आणि परीक्षा यांचा जिवंत अनुभव देत होतं. एकमेकांना पाहताच सर्वजण भावुक झाले आणि गळाभेटींचा सुंदर प्रसंग घडला. कित्येकांच्या डोळ्यांत जुन्या आठवणींमुळे आनंदाश्रू उभे राहिले. शाळेतील गमती-जमती, अभ्यासाचे क्षण, सामूहिक खेळ, स्पर्धा आणि शिक्षणाचे दिवस पुन्हा आठवले. कार्यक्रमात शाळेतील आदरणीय शरद शेवाळे सर, श्रीराम निकम सर आणि शाळेतील सेवक राजेंद्र ठाकरे हेही खास आमंत्रणावर उपस्थित होते. या सर्व शिक्षकांनी त्या विद्यार्थ्यांच्या घडवणुकीमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करत, त्यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार केला. मनीषा बापू चव्हाण आणि ज्योती भरत खैरनार यांनी शरद शेवाळे सरांचा सत्कार केला. यावेळी त्यांनी सरांच्या शिकवणीच्या आठवणी भावूक होऊन सांगितल्या. सुरेखा बाळू काकुळते आणि रत्ना रामदास अहिरे यांनी निकम सरांचा सन्मान करत त्यांचे मार्गदर्शन आठवले. प्रतिभा रामकृष्ण काळे आणि भारती कारभारी पवार यांनी राजेंद्र ठाकरे यांचा सत्कार करत त्यांची शाळेतील सेवा आणि प्रेमभावनेने केलेली मदत आठवली. सत्कारप्रसंगी शरद शेवाळे सर, श्रीराम निकम सर आणि राजेंद्र ठाकरे यांनीही आपल्या जुन्या विद्यार्थ्यांबाबतच्या आठवणी शेअर केल्या. त्यांनी शाळेतील कालखंडातील आठवणींना उजाळा देताना, विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दलचा आनंद आणि अभिमान व्यक्त केला. शिक्षकांच्या बोलण्यातून गुरूशिष्य नात्याची गोडी आणि परिपक्व प्रेम प्रतीत होत होती अरुण शेलार, दिनेश सस्ते आणि मनीषा बापू चव्हाण यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव सांगताना त्या वेळचे शिक्षण, खेळ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत, अशा गेट-टुगेदरने दिलेल्या आनंदाची कबुली दिली. कार्यक्रमासाठी आलेल्या सर्वांसाठी वेलकम ड्रिंक, स्वादिष्ट नाश्ता आणि उत्तम दर्जाचे जेवण यांची खास सोय करण्यात आली होती. नीम व्हॅली रिसॉर्टचे निसर्गरम्य परिसर आणि शांत वातावरण या गेट-टुगेदरच्या अनुभवात भर घालत होते. उपस्थितांनी या भोजनाच्या आणि गप्पागोष्टींच्या वातावरणात एक वेगळी ऊर्जा अनुभवली. गप्पागोष्टींनंतर, जुन्या शाळकरी मित्रांनी एकत्र येऊन गाणी, नाच आणि हास्यविनोदाचे सत्र रंगवले. म्युझिक सिस्टीम चालकांचा देखील सत्कार करण्यात आला. सगळ्यांनी मिळून शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनाची आठवण जागवली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात नीम व्हॅली रिसॉर्टच्या व्यवस्थापनाची महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यांच्या सहकार्याबद्दल शरद शेवाळे सर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमताने ठरवले की, दरवर्षी संपूर्ण कुटुंबासह असा गेट-टुगेदर आयोजित केला जाईल. यामुळे सामाजिक संबंध वृद्धिंगत होतील, आणि जुन्या नात्यांची वीण अधिक घट्ट होईल. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांनी सुनील बेलदार यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे वीस वर्षांनंतरही सर्वांना एकत्र येण्याची ही अनमोल संधी मिळाली. हा गेट-टुगेदर केवळ एक भेट नव्हता, तर तो एका संस्कारांची, आठवणींची आणि कृतज्ञतेच्या भावनेची भावनिक गुंफण होती.
पाचोरा व पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत सर्वच अवैध व्यवसाय पुन्हा बहरत चालला आहे. शहराच्या विविध भागांमध्ये आणि आसपासच्या गावांत सर्वच सट्टा किंगचे एजंट सक्रिय असल्याची माहिती स्थानिक जनतेतून वारंवार समोर येत आहे. मात्र, यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे काही निवडक लोकांचेच नाव ते सुद्धा अर्धवट मुद्दामहून उचलून धरले जात आहे, संदीप सांकेतिक चिंन्ह टाकून गैरसमज – संभ्रम निर्माण करण्यापेक्षा थेट पुर्ण नांव टाकणे योग्य आहे तर इतर जास्त सक्रिय असलेल्या एजंटांकडे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना सामान्य जनतेत निर्माण झाली आहे. सध्या सट्टा व सर्वच अवैध व्यवसायाचे जाळे इतके विस्तारलेले आहे की, त्यामागे कार्यरत असलेले खरे सूत्रधार कोण आहेत, हे जनतेच्या देखील लक्षात येऊ लागले आहे. मात्र दुर्दैवाने, या प्रकरणांतून काही निवडक व्यक्तींनाच टार्गेट करून त्यांच्या विरोधात अर्धवट माहितीच्या आधारे बातम्या प्रसारित केल्या जात आहेत, आणि त्यातून लोकांमध्ये एक प्रकारचा गैरसमज निर्माण होत आहे. खरोखरच ज्यांना वाटत असेल असे हे सर्वच अवैध धंदे बंद व्हायला पाहीजे त्यांनी संर्व जंत्री म्हणजेच सर्व पुरावे फोटो ते घेऊन उद्या माझ्या सोबत चला आमची मुंबईची जेष्ठ पत्रकारांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी पत्रकारांचे अधीक्षक स्वीकृती कार्ड वेब न्यूज आणि युट्युब यांच्या समस्या यावर चर्चा होणार आहे त्यावेळी हे सर्वच पुरावे घेऊनआपण CM साहेबांकडे मांडू शकतो मग ना कोणता संदीप. ना कोणी अवैध धंदे होतील तर सर्वच बंद होतील गेल्या काही काळात एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरली आहे – ती म्हणजे संदीप नावाच्या एका व्यक्तीबाबत प्रसारित होणाऱ्या अर्धवट बातम्या. या बातम्यांमध्ये ना कोणते ठोस पुरावे दिले गेले, ना कायदेशीर कारवाई संदर्भातील तपशील. अशा बातम्यांमुळे त्या व्यक्तीबाबत समाजात एकतर्फी प्रतिमा तयार होत असून, सामाजिक प्रतिष्ठेवर परिणाम होत आहे. जर खरोखर एखाद्या व्यक्तीवर गंभीर आरोप करायचे असतील, तर पत्रकारिता हे माध्यम जबाबदारीने वापरले पाहिजे. कोणतेही वृत्त सत्यासहित, ठोस पुराव्यांसह, अधिकृत माहितीच्या आधारे दिले गेले पाहिजे. अन्यथा, हे केवळ वैयक्तिक द्वेषातून किंवा सामाजिक प्रतिमा खराब करण्यासाठीचे कटकारस्थान ठरते. सट्टा किंगचे मुख्य एजंट अनेक ठिकाणी कार्यरत आहेत. त्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस बळकट होत चालले आहे. मात्र, त्यांच्याविरोधात कारवाई होताना अनेकदा निवडक कारवाई केली जाते, जी केवळ राजकीय, सामाजिक किंवा व्यक्तिगत दबावामुळे घडते असे चित्र निर्माण झाले आहे. जर सर्वच अवैध धंद्यांना खरोखर आळा घालायचा असेल, तर तो सर्वच धंद्यांना सर्वच पातळ्यांवर समान नियमाने आणि एकसमान कार्यवाहीनेच शक्य आहे. निवडक लोकांवर कारवाई करून इतरांना मोकळं सोडणे, ही एक जुनी आणि अकार्यक्षम पद्धत ठरत आहे. ती केवळ जनतेचा रोष कमी करण्यासाठी केलेली दिखाऊ प्रक्रिया आहे, असाच याचा अनुभव आहे. पाचोराच काय व परिसरात नव्हे तर संपूर्ण राज्य व देशात सट्टा व्यवसायाच्या विरोधात यापूर्वीही अनेकदा बातम्या झळकल्या, आंदोलन झाली, निवेदने दिली गेली. मात्र, त्यातून फारसा काही परिणाम झाल्याचे पाहायला मिळत नाही. कारण, संपूर्ण यंत्रणेतच या व्यवसायाचा आडवा पाठिंबा असल्याची शंका जनतेच्या मनात खोलवर रुजली आहे. गेल्या दहा वर्षांतील अनुभव सांगतो की, अवैध धंद्यांविरोधात फक्त बातम्यांनी किंवा निवडक पोलिस कारवाईंनी काहीही साध्य होत नाही. कारवाईचे खरे स्वरूप वरून सुरू होऊन खालपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यात पक्ष, गट, व्यक्ती, जात, धर्म यांचा भेदभाव नसावा. जर एखाद्या व्यक्तीवर कारवाई करायची असेल, तर तो कायद्याच्या आधारे आणि पुराव्याच्या आधारेच होणे अपेक्षित आहे. निव्वळ समाजात दबाव निर्माण करणे, खोट्या बातम्यांमुळे व्यक्तीची समाजातील प्रतिमा डागाळणे, ही अत्यंत चुकीची आणि अन्यायकारक प्रवृत्ती आहे. “एकच नियम – एकच कायदा” हे तत्व सर्वच समाज घटकांवर लागू व्हावे, ही सर्वसामान्यांची मागणी आहे. मग तो कोणताही अवैध व्यवसाय असो – सट्टा, जुगार, गुटखा, गांजा, दारू, वेशवृत्ती, वाळू तस्करी – सर्वांवर एकसमान कारवाईच हवी. माध्यमांचा उपयोग हा समाजप्रबोधनासाठी असावा. पण आज अनेक पत्रकारिता करणारे पोर्टल्स, सोशल मीडिया चॅनल्स केवळ “Breaking News” ची स्पर्धा जिंकण्यासाठी अर्धवट माहिती देऊन लोकांच्या मनात चुकीची धारणा निर्माण करत आहेत. त्यामुळेच, वृत्त पत्रकारितेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. संदीप नावाच्या व्यक्तीबाबत बातम्यांमध्ये पुरावा नसताना केवळ त्याचे नाव वापरून अफवा पसरवणे, हे एक सामाजिक गुन्हाच आहे. पत्रकारांनी अशा गोष्टींची गंभीर दखल घेतली पाहिजे. खरोखर निस्वार्थ व कोणत्याही मतलब नसताना अवैध धंदे बंद करायचे असेल तर संपूर्ण समाज, पत्रकार, प्रशासन, पोलीस, राजकारणी व सर्व नागरी संघटनांनी एकत्र येऊन ठोस निर्णय घेण्याची वेळ आली आहे. निवडक लोकांवर आरोप करून समाजातील फूट वाढवण्याऐवजी, सट्टाच नव्हे तर संपूर्ण अवैध व्यवसायाला मुळासकट उखडून टाकण्याची गरज वाटत असेल तर यासाठी लोकशक्ती, प्रशासकीय इच्छाशक्ती आणि पत्रकारितेची निष्ठा एकत्र आली तरच खरे बदल घडू शकतात. अन्यथा, नेहमीसारखे – बातम्या झळकतील, लोक चर्चा करतील आणि सट्टा एजंट पुन्हा आपले जाळे वाढवत राहतील. आणि वाढणारच आहे संदीप नावाच्या व्यक्तीवर अर्धवट नावाने व अर्धवट बातम्यांच्या आधारे आरोप लावले जात असतील, तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. पत्रकार म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण सत्याचा पाठपुरावा करू, पुराव्यावर आधारित माहिती समाजासमोर ठेवू आणि कोणत्याही व्यक्तीची सामाजिक प्रतिष्ठा नष्ट होऊ देणार नाही. संपूर्ण समाजाने ही गोष्ट समजून घेतली पाहिजे – “जर अवैध धंदे बंद करायचे असतील तर सर्वच करा – निवडक नाही.” अन्यथा, अशा प्रकारच्या निवडक मोहिमा समाजात फक्त संभ्रम आणि फूट निर्माण करतील, समस्या सुटणार नाहीत. आणि पोलीसांनी देखील अशा अर्धवट बातम्या कडे व ब्रेकिंग कडे दुर्लक्ष केलेले बरे
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : इंडिया मास्टर्स संघाने वेस्ट इंडिज मास्टर्सवर ६ विकेट्सने विजय मिळवत आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी२० चे विजेतेपद पटकावले. रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियम येथे झालेल्या या अंतिम सामन्यात अंबाती रायडूच्या तडाखेबंद खेळीने इंडिया मास्टर्सचा विजय सुकर केला.
वेस्ट इंडिज मास्टर्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामीवीर ड्वेन स्मिथ (४५) आणि लेंडल सिमन्स (५७) यांनी ठोस सुरुवात केली. मात्र, ब्रायन लारा (६), विल्यम पर्किन्स (६), आणि चॅडविक वॉल्टन (६) लवकर बाद झाल्यामुळे संघ मोठी धावसंख्या उभारू शकला नाही.
लेंडल सिमन्सने ४१ चेंडूत ५७ धावा करत संघाचा डाव सावरला, तर ड्वेन स्मिथने ३५ चेंडूत ४५ धावा करत चांगली साथ दिली. डेनेश रामदीन (१२*) आणि रवी रामपॉल (२) यांनी काही धावा जोडल्या. त्यामुळे वेस्ट इंडिज मास्टर्सने २० षटकांत १४८/७ अशी धावसंख्या उभारली.
इंडिया मास्टर्सच्या गोलंदाजांनी प्रभावी कामगिरी केली. विनय कुमारने ३ बळी घेत २६ धावा दिल्या. शाहबाज नदीमने ४ षटकांत केवळ १२ धावा देत २ बळी घेतले. स्टुअर्ट बिन्नी आणि पवन नेगी यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला. या भेदक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिज मास्टर्सला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
१४९ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या इंडिया मास्टर्स संघाने दमदार फलंदाजी केली. सचिन तेंडुलकर (२५) आणि अंबाती रायडू (७४) यांनी संघासाठी महत्त्वाची भागीदारी रचली. सचिन तेंडुलकर बाद झाल्यानंतर गुरकीरत सिंग मान (१४) आणि युवराज सिंग (१३) यांनी रायडूला साथ दिली.अंबाती रायडूने ५० चेंडूत ७४ धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शेवटी स्टुअर्ट बिन्नीने ९ चेंडूत १६ धावा करत १७.१ षटकांत संघाला विजयी लक्ष्य गाठून दिले.
वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. अॅशले नर्सने ३.१ षटकांत २२ धावा देत २ बळी घेतले. सुलेमान बेन आणि टिनो बेस्ट यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
सचिन तेंडुलकरची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी:-
सचिन तेंडुलकरने या स्पर्धेत अनुभव आणि कौशल्याचा उत्तम मिलाफ दाखवला. त्याने संपूर्ण स्पर्धेत १८१ धावा (सरासरी ३०.१६) केल्या आणि एक अर्धशतक ठोकले. त्याच्या फलंदाजीने संघाला अनेक महत्त्वाच्या विजयांमध्ये मदत केली.
सचिन तेंडुलकरची स्पर्धेतली कामगिरी :-
१० (१२) विरुद्ध श्रीलंका मास्टर्स
३४ (२८) विरुद्ध इंग्लंड मास्टर्स
६ (१०) विरुद्ध दक्षिण आफ्रिका मास्टर्स
६४ (४०) विरुद्ध ऑस्ट्रेलिया मास्टर्स (साखळी सामना)
४२ (३२) विरुद्ध ऑस्ट्रेलिया मास्टर्स (उपांत्य फेरी)
२५ (१८) अंतिम फेरीमध्ये वेस्ट इंडिज मास्टर्सविरुद्ध
अंबाती रायडू (७४ धावा, ५० चेंडू) सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
इंडिया मास्टर्स संघाने वेस्ट इंडिज मास्टर्सला सहज पराभूत करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. अंबाती रायडूच्या अप्रतिम फलंदाजीने हा विजय सोपा केला, तर विनय कुमार आणि शाहबाज नदीम यांच्या प्रभावी गोलंदाजीने वेस्ट इंडिजला मर्यादित ठेवले. सचिन तेंडुलकरने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला पुढे नेले. त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील समृद्ध अनुभव आणि उत्कृष्ट तंत्रशुद्ध फलंदाजी संघासाठी मोठी ताकद ठरली. या शानदार विजयासह इंडिया मास्टर्सने आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग टी२० विजेतेपद पटकावले, आणि त्यांच्या चाहत्यांनी आनंदाने हा विजय साजरा केला!
पत्रकार, साहित्यिक व आदर्श शिक्षक : गुरुवर्य प्रा. जैमिनी शारदा कडू विसाव्या शतकातील सत्तरच्या दशकापासून अव्याहतपणे पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या निर्भय, घणाघाती व चौफेर शब्दाने आणि वाणीने युवकांच्या मनात आपले वेगळे आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या जैमिनी शारदा कडू उर्फ प्राध्यापक जैमिनी कडू यांचा जन्म व मृत्यू एकाच दिनांकास म्हणजे दिनांक 17 मार्च रोजी झाला. महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील तुळजापूर गढी (तालुका मोर्शी) या गावचे ते रहिवासी असले तरी जैमिनी कडू यांचा जन्म मात्र छत्तीसगडच्या किर्र जंगलातील एका आदिवासी महिलेच्या झोपडीत रात्री अकरा बाराच्या सुमारास झाला. शिक्षक वडील भाऊसाहेब कडू यांना 1942 च्या एका आंदोलनात गुन्हा नोंदविण्यात आला होता. पोलीसांकडून अटक होऊ नयेत म्हणून ते छत्तीसगड (म.प्र) राज्यातील रायगढ गावाजवळील जंगलात भूमिगत झाले होते. त्यांना भेटायला जैमिनीची माय शारदा पायी जात असतांनाच रात्री 11-12 वा पोटात प्रसववेदना सुरू झाल्या व तेथेच थांबून एका आदिवासी महिलेच्या झोपडीत त्यांचा जन्म झाला. जन्मापासूनच निसर्गाच्या सोबतीने वाढलेला जैमिनी नावाचा मुलगा पुढे पत्रकार म्हणून प्रसिद्ध झाला. तत्कालीन लोकमत मधील ‘युवास्पंदन’ नावाच्या स्तंभ लेखनाने त्यांनी त्यावेळी युवकांच्या मनावर अधिराज्य केले होते. मूळचे अमरावती जिल्ह्यातील तुळजापूर (गढी) येथील रहिवासी असलेले जैमिनी कडू यांनी आपले अमरावती येथील महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर नागपूर ला गेल्यानंतर त्यांना आपल्या पत्रकारितेच्या जीवनाची सुरुवात कवीवर्य सुरेश भट संपादित ‘बहुमत’ च्या संपादकीय विभागातून करण्याचे भाग्य जमिनींना लाभले. त्यांचे वडील शिक्षक असले तरी आर्थिक हालाकीच्या परिस्थितीत व साहित्याच्या ओढीमुळे ते नागपूरला गेले होते व पत्रकार म्हणून कामास सुरुवात केले आणि योगायोगाने नागपूर येथील मॉरिश कॉलेजमध्ये मराठीत डबल एम ए करण्यासाठी साठी त्यांनी प्रवेश घेतला. शब्दावर प्रचंड पकड असलेल्या जैमिनीच्या वक्तृत्व शैलीने तत्कालीन मॉरिश कॉलेज आताचे वसंतराव नाईक कला विज्ञान संस्था नागपूर येथे ते कमालीचे प्रसिद्ध झाले. त्यानंतर संपूर्ण विदर्भात आणि महाराष्ट्रात महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा च्या निमित्ताने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा परिचय झाला. महाविद्यालयीन जीवनात मॉरिश कॉलेजचे प्राचार्य प्राध्यापक मधुकर आष्टीकर, प्राध्यापक शरदचंद्र मुक्तीबोध, प्राध्यापक माणिक गोडघाटे उर्फ कवी ग्रेस, प्राध्यापक डॉक्टर मालती पाटील यांच्या मार्गदर्शनात जैमिनीचा विकास होत गेला आणि जैमिनी या नावाला वलय प्राप्त झाले. पुढे लोकमत मध्ये उपसंपादक म्हणून काम करतांनी ‘उमलत्या पिढीची स्पंदने’ व ‘युवा स्पंदन’ या स्तंभ लेखनाने तर ते युवक विद्यार्थी व साहित्यिक वर्गात प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचले. एवढेच काय जैमिनी या नावामुळे तो पुरुष की स्त्री यासाठी तरूण व तरुणीमध्ये शंका उपस्थित होत असल्याने त्यांना पाहण्यासाठी लोकमत मध्ये तरूण तरुणींच्या रांगा लागत होत्या. पुढे त्यांनी विदर्भ साहित्य संघाचे निवडणूक लढविल्यानंतर व प्रचंड मताने निवडून आल्यानंतर ते बहुजन असल्यामुळे त्यांना अस्पृश्यासारखी वागणूक मिळाल्यामुळे केवळ नामधारी सदस्य म्हणून राहणे पसंत नव्हते. त्यामुळे जैमिनीने विदर्भ साहित्य संघाचे जिल्हा साहित्य संमेलन नावाची साहित्य चळवळ सुरू केली होती. त्या काळात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्राध्यापक राम शेवाळकर हे होते. लोकमत मध्ये काम करीत असताना आपल्या शोध पत्रकारितेच्या शैलीमुळे राजकारणी व भ्रष्टाचारी अधिकारी लोकांमध्ये त्यांचा बद्दल भीती निर्माण झाली होती. 1970 ते 80 हे दशकच संपूर्ण भारतात चळवळीचे दशक म्हणून प्रसिद्ध झाले होते लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण क्रांती आंदोलन व अन्य छोट्या-मोठ्या चळवळी भारतामध्ये आकार घेत होत्या जैमिनीचे मन संवेदनशील असल्याने या चळवळीत ही ते अग्रस्थानी होते. महाविद्यालयात असतांनाच वक्तृत्वशैली व अभ्यासामुळे ते प्रसिद्ध झाले होते. पत्रकारितेमध्ये असताना त्यांनी अन्याय अत्याचार विरोधात आपली लेखणी प्रभावी शस्त्रासारखी राबविली. पुढे जैमिनी कडू यांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ‘श्रमिक पत्रकार पुरस्कार’ मिळाला. परंतु नागपूर मधील पत्रकारांना ते पचनी पडले नव्हते. त्यांना नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे कधीच पदाधिकारी होता आले नव्हते. मात्र महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पद त्यांना योगायोगाने मिळाले. या काळात बिहार प्रेस बिल विरोधी आंदोलनाचे त्यांनी नेतृत्व केले होते. त्यांनी ऑल इंडिया रिपोर्टर जर्न्यालिस्ट एन्ड नाॅन-जर्न्यालिस्ट युनियनच्या अध्यक्ष पदाची निवडणूक ही यशस्वीपणे लढविली होती. परंतु पत्रकारितेच्या काळात ब्राह्मण्य ही प्रवृत्ती किती विषारी आहेत असते याचा त्यांना अनुभव आला. तसेच ब्राह्मण या प्रवृत्तीचे गुलाम असलेल्या बहुजन सहकाऱ्यांच्या गुलामीचाही अनुभव त्यांना या काळात आला. 1972 ते 1989 हा काळ पत्रकारितेत घालविल्यानंतर नंतर त्यांच्या चाहत्या वाचक वर्गासोबत हितशत्रूंची संख्या ही वाढत होती. पुढे लोकमतचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अर्धवेळ प्राध्यापक म्हणून शिक्षकी पेशात प्रवेश घेतला. पुर्वी पासूनच त्यांनी दलित पॅंथरची चळवळ, वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखाली बामसेफ व पुरुषोत्तम खेडेकर यांच्या मराठा सेवा संघाच्या कार्यात मोलाचा हातभार लावला. बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा या संघटनेच्या अधिवेशनासाठी तर ते भारतभर फिरले. एक प्रभावी व्यक्ती म्हणून पुरोगामी चळवळीत परिवर्तनवादी म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती. जैमिनी कडू यांनी परिवर्तनाचा विचार केवळ फॅशन म्हणून स्वीकारला नाही तर प्रत्यक्ष जीवनातही अंमलात आणला. त्यांनी हुंडा विरोधी चळवळ राबविली आणि स्वतः हुंडा न घेता विवाह केला. तसेच जाती छोडो आंदोलनात सहभाग घेतल्यानंतर त्यांनी शिला भांडारकर पाटील या तरुणीशी आंतरजातीय विवाह केला. जीवनसाथी शीला भांडारकर-पाटील उर्फ शैल जैमिनी यांच्या व्यक्तिमत्व विकासापासून वैचारिक विकासापर्यंत तिला पूर्ण साथ दिली. जगाच्या पाठीवर केवळ हिंदू धर्मातच स्त्रियांच्या कपाळावर कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, नाकात नथ, पायात जोडवे, हातात बांगड्या आहेत या सर्व स्री दास्यत्वाच्या खुणा आहेत. त्यामुळे शैल जैमिनी हिने या स्त्री दास्यत्वाची चिन्हे फेकून दिली. परंतु यामुळे शैलला “तुझा नवरा मेला का?” अशी बोलणी त्या काळात ऐकावी लागली होती. त्यावर शैल व जैमिनी दोघेही “होय, माझा परंपरावादी नवरा मेला आहे आणि परिवर्तनवादी नवरा जिवंत आहे” अशी उत्तरे दिल्यानंतर लोकांची तोंडे बंद होत असत. जैमिनीच्या परिवर्तनवादी व स्पष्ट विचारामुळे त्यांना त्यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात प्राप्त झाला होता. त्यातूनच पुढे त्यांनी डॉक्टर राम कोल्हे, डॉक्टर दीपक केदार, सतिश पावडे, डॉक्टर दिनकर येवलेकर, विलास अवतारे, अशोक चोपडे, प्रभाकर पावडे, सी.एम.लोणारे, बळवंत भोयर, कांतीलाल वाघमारे, नरेश मित्र, रवी माडेवार, अश्रफ सैयद, आशू सक्सेना, संध्या राजूरकर, नुतन माळवी, मंजुषा शिंगरू, अर्चना अलोणी, जयश्री खवासे, मिनल येवले, विजय व छाया इमाने, विठ्ठल घोडे, चोपडा-नाशिक चे अनिल पालीवाल, मुंबई चे पारा. मनोहर, मनमाड प्रदीप गुजराथी, यांच्या सहकार्यातून ‘युवा साहित्य समाज’ (युसास) नावाची युवक विद्यार्थ्यांची साहित्य संघटना निर्माण केली. ‘युसास’ च्या नावाखाली त्यावेळी (1985-1992) या काळात विद्यार्थी युवकांचे पाच मराठी साहित्य संमेलन ही भरविण्यात आली. प्रस्तुत लेखक युसासच्या निर्मितीमुळे जैमिनीसोबत वैचारिक रित्या जुळले होते. जैमिनी कडू च्या वैचारिक प्रभावाने त्याकाळी युवा वर्गात सळसळीचे चैतन्य निर्माण झाले होते. नागपूर च्या रस्त्याच्या परिस्थितीवर पहिल्यांदाच प्रखर लेखन करणाऱ्या जैमिनींना दुर्दैवाने नागपुर येथील रस्ता अपघातात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यातच दिनांक 17 मार्च 2018 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांची जन्मतारीख 17 मार्च व मृत्यूचा दिनांक 17 मार्च हा एकच आहे. जन्म तारखेच्या दिवशीच मृत्यू होणाऱ्या या आगळ्या- वेगळ्या अवलिया ने मृत्यूच्या पूर्वी ‘बौद्ध धर्म’ स्वीकारला होता. परंतु अनेकांना ते माहित नसावे. मृत्यूनंतर त्यांचे देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास करण्यात आले. त्यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनास अलोट गर्दी झाली होती. त्यावेळी अनेक धर्माच्या प्रार्थना घेण्यात आल्यानंतर त्याच वेळी एक बौद्ध भन्ते तेथे उपस्थित होते. त्यांनी भितभितच बौद्ध धर्माची प्रार्थना म्हणण्याची परवानगी मागितली आणि जैमिनीच्या बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या योगायोगाने सर्वात शेवटी बौद्ध धर्माची प्रार्थना म्हटल्यानंतर त्यांचा देह वैद्यकीय महाविद्यालयाच्या हवाली करण्यात आला. या घटनेचे सुद्धा प्रस्तुत लेखक साक्षीदार आहेत. जन्माने अमरावती जिल्ह्यातील जैमीनी कडू यांची कर्मभूमी नागपूर असली तरी प्रबोधनाच्या कार्यक्रमासाठी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व भारतभर भ्रमंती केली होती. अमरावतीच्या मातीने सुरेश भट व जैमिनी कडू सारखे पत्रकार, साहित्यिक दिल्यामुळे जैमिनी कडू यांचे स्मारक अमरावती या ठिकाणी होणे आवश्यक आहे. दि 17 मार्च रोजी पत्रकार, साहित्यिक व शिक्षक दिवंगत जैमिनी कडू यांचा जन्मदिन व स्मृतिदिन आहेत. त्यानिमित्त त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा त्यांचे तत्कालीन सहकारी डॉ. दीपक केदार यांचा लेख -डाॅ.दीपक केदार 9860778227. निवृत्त सहसंचालक, लेखा व कोषागारे, अमरावती विभाग
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ‘‘स्पर्धात्मक युगात यशस्वी होण्यासाठी सतत शिकणे आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता समजून घेत तंत्रज्ञानाशी जुळवून घेतल्यास तुमचा विकास अनंत शक्यता उघडेल. महाविद्यालयीन शिक्षणानंतरही विद्यार्थी म्हणून टिकून राहा. तंत्रज्ञान हे केवळ साधन आहे, त्याचा उपयोग कसा करावा हे महत्त्वाचे आहे,’’ असे प्रतिपादन उच्चशिक्षण मुंबई विभागाचे सहसंचालक डॉ. रूपेश राऊत यांनी केले.
सेवा मंडळ सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाचा चौथा दिक्षांत समारंभ शनिवार, १५ मार्च २०२५ रोजी उत्साहात पार पडला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. दिलीप त्रिवेदी यांनी प्रमुख अतिथींसह उपस्थितांचे स्वागत केले.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. अर्चना पत्की यांनी २०२३-२४ वार्षिक अहवाल सादर केला. प्रमुख अतिथी डॉ. रूपेश राऊत यांचा परिचय परीक्षा विभाग प्रमुख डॉ. दर्शना बूच यांनी करून दिला. नंतर महाविद्यालयाच्या विश्वस्त मंडळींनी डॉ. राऊत यांना सन्मानित केले.
यानंतर कला आणि वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनींना पदवी बहाल करण्यात आली. चार विद्यार्थिनींना सुवर्णपदक, तर गुणवत्ताधारक २४ विद्यार्थिनींना त्यांच्या पालकांसह सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सरिता कासलकर यांनी मानले. या दिक्षांत समारंभाला महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई येथे पार पडलेल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) २०२५ च्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्स महिला संघाने दिल्ली कॅपिटल्सचा ८ धावांनी पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला, मात्र हरमनप्रीत कौरच्या उत्कृष्ट अर्धशतकाने मुंबईला विजयी आनंद मिळवून दिला.
दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधार मेग लॅनिंगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या वेगवान आणि फिरकी गोलंदाजांनी मुंबईला सुरुवातीपासूनच अडचणीत टाकले. सलामीवीर यास्तिका भाटिया (८) आणि हेली मॅथ्यूज (३) लवकरच बाद झाल्या, त्यामुळे मुंबईची धावसंख्या ५/२ अशी झाली. त्यानंतर नॅटली शिवर (३०) आणि हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरला.
हरमनप्रीतने आपल्या नैसर्गिक शैलीत खेळ करत शानदार ६६ धावा केल्या. तिच्या या खेळीत ९ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. तिच्या साथीला नॅटली शिवर हिनेही संयमी खेळ करत ३० धावांचे योगदान दिले. अखेरच्या काही षटकांत अमनजोत कौरने ७ चेंडूत १४ धावा फटकावून संघाला १४९ धावांपर्यंत पोहोचवले.
मुंबईच्या फलंदाजांना रोखण्यात दिल्लीच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी बजावली. अनुभवी मरिझान कॅपने ४ षटकांत केवळ ११ धावा देत २ बळी घेतले, तर अॅनाबेल सुथरलँड (१/२९), जेस जोनासेन (२/२६) आणि एनआर-श्री चरनी (२/४३) यांनीही प्रभावी मारा केला.
१५० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली. कर्णधार मेग लॅनिंग (१३) आणि शफाली वर्मा (४) स्वस्तात बाद झाल्या. त्यानंतर जेस जोनासेन (१३) आणि जेमिमा रॉड्रिग्ज (३०) यांनी थोडीशी लय पकडली, पण मुंबईच्या गोलंदाजांनी सतत बळी मिळवत सामना आपल्या हातात ठेवला.
दिल्लीकडून मरिझान कॅपने सर्वाधिक ४० धावा केल्या. अखेरच्या काही षटकांत निकी प्रसाद (२५) आणि मिनू मणी (४) यांनी काही फटके मारण्याचा प्रयत्न केला, पण तो अपुरा ठरला. दिल्ली संघाने निर्धारित २० षटकांत १४१/९ धावा केल्या आणि ८ धावांनी पराभव पत्करावा लागला.
मुंबईच्या गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करत दिल्लीच्या फलंदाजांना सहज फटके मारू दिले नाहीत. नॅटली शिवरने ४ षटकांत ३० धावा देत ३ बळी घेतले आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याशिवाय अमेलीया केर (२/२५), हेली मॅथ्यूज (१/३७), शबनिम इस्माइल (१/१५) आणि सायका इशाक (१/३३) यांनीही मोलाचे योगदान दिले.
सामनावीर : हरमनप्रीत कौर (६६ धावा, ४४ चेंडू, ९ चौकार, २ षटकार) मालिकावीर : नॅटली शिवर सर्वाधिक धावा: हरमनप्रीत कौर सर्वाधिक बळी: नॅटली शिवर
मुंबई इंडियन्सचे दुसरे विजेतेपद!
मुंबई इंडियन्स महिला संघाने २०२३ मध्ये पहिल्यांदा डब्ल्यूपीएलचे विजेतेपद मिळवले होते, आणि आता २०२५ मध्येही त्यांनी विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आणि महिला क्रिकेटमध्ये आपली ताकद दाखवून दिली. मुंबईच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी करत महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात दुसऱ्यांदा विजेतेपद मिळवले आणि आपल्या चाहत्यांना अभिमान वाटावा असा क्षण दिला!