Home Blog Page 73

व्हॉइस ऑफ लाईफ’ व्याख्यानमालेचा प्रभावी प्रारंभ : अंमली पदार्थविरोधी जागरूकतेसाठी महत्त्वपूर्ण शैक्षणिक उपक्रम

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : २६ जून २०२५ रोजी साजऱ्या झालेल्या अंमली पदार्थांचे गैरवापर आणि बेकायदेशीर तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त, श्रीमती एम. एम. पी. शाह महिला कला आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) आणि इंडियन असोसिएशन ऑफ लाईफ स्किल्स एज्युकेशन (IALSE), चेन्नई यांच्या संयुक्त विद्यमाने “व्हॉइस ऑफ लाईफ” या व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

आभासी माध्यमातून पार पडलेल्या या सत्रामध्ये, अंमली पदार्थांच्या गैरवापराबाबत जनजागृती वाढवणे, प्रतिबंधात्मक उपायांना प्रोत्साहन देणे आणि जीवन कौशल्यांच्या माध्यमातून या जागतिक समस्येच्या निराकरणासाठी सकारात्मक भूमिका घेणे, हा केंद्रबिंदू होता. यंदाच्या जागतिक मोहिमेची संकल्पना होती – “इनव्हेस्ट इन प्रीव्हेन्शन” आणि “स्टॉप ऑर्गनाइझड क्राईम”.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्राचार्या आणि व्याख्यानमालेच्या प्रमुख समन्वयक डॉ. अर्चना पत्की यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. IALSEचे अध्यक्ष डॉ. ए. राधाकृष्णन नायर यांनी अध्यक्षीय भाषणातून जीवनकौशल्य शिक्षणाची वाढती गरज अधोरेखित केली. यानंतर, सेवा मंडळ शिक्षण संस्थेचे मानद सचिव डॉ. भरत पाठक यांनी आपल्या विशेष भाषणात तरुणाईसमोरील व्यसनाधीनतेच्या वाढत्या समस्येवर चिंतनपर दृष्टिकोन सादर केला.

कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केरळ आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) मोहनन कुन्नुम्मेल यांच्या प्रमुख व्याख्यानाने झाले. “ड्रग अ‍ॅब्यूज प्रिव्हेन्शन अँड मिटिगेशनला सक्षम करणारे जीवन कौशल्य” या विषयावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण सादरीकरणात, त्यांनी अंमली पदार्थांच्या सामाजिक दबावांशी प्रभावीपणे लढण्यासाठी जीवनकौशल्य शिक्षणाचे सामर्थ्य अधोरेखित केले.

IALSEच्या सचिव सुश्री रमा भिडे यांनी सत्राचे सुत्रसंचालन केले. तर IALSEच्या उपाध्यक्षा डॉ. गौरी हर्डीकर यांनी सह-यजमानपद भूषवले आणि कार्यक्रमाचे प्रभावी संयोजन करत समृद्ध चर्चेला चालना दिली.

‘व्हॉइस ऑफ लाईफ’ व्याख्यानमाला ही एक दीर्घकालीन शैक्षणिक व सामाजिक उपक्रममालिका असून, कल्याण, कौशल्याधिष्ठित शिक्षण आणि गंभीर सामाजिक विषयांवरील सक्रिय संवादाला चालना देणे हा तिचा प्रमुख उद्देश आहे.

या उद्घाटन सत्रातून जीवनकौशल्यांद्वारे समाजप्रबोधनाच्या दिशेने एक ठोस पाऊल टाकले गेले. आयोजकांनी पुढील सत्रांतून विद्यार्थ्यांचा अधिक सक्रीय सहभाग आणि व्यापक सामाजिक संवाद घडवून आणण्याचा विश्वास व्यक्त केला.

‘झेप : एक पाऊल कौशल्याकडे’ – विद्यार्थ्यांसाठी आत्मविकासाचा प्रेरणादायी मंच

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “उंच झेप घेण्यासाठी संधीचे सोने करून वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करा. समाज माध्यमांवर वेळ वाया घालवण्याऐवजी मोबाईलचा उपयोग शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी करा. नकारात्मकतेवर मात करून स्वतःला घडवा,” असे प्रबोधनपर आणि प्रेरणादायी विचार मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना व्यक्त केले.

‘झेप : एक पाऊल कौशल्याकडे’ या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथील बॅचलर ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स विभाग तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पत्की यांनी सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीची माहिती दिली व प्रमुख उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत, तसेच उद्योग जगतातील मार्गदर्शक विश्राम बापट यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात कौशल्याधिष्ठित कामगिरीसाठी हिरल परमार, फैझा खान, प्रियंका जोगदंड आणि सिद्धी गीते या विद्यार्थिनींचा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

विश्राम बापट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शासकीय कौशल्य विकास उपक्रमांची माहिती दिली तसेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘गुरुसूत्र’ ॲप विषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात विद्यार्थिनींसोबत प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधण्यात आला. तसेच बॅचलर ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरणावर आधारित नाटिका सादर केली.

संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. रश्मी शेट्ये-तुपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विभाग समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे यांनी केले.

‘झेप’ उपक्रमातून केवळ कौशल्यांची नव्हे, तर आत्मविश्वास, विचारप्रवणता आणि सामाजिक भान यांचीही पेरणी झाली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणास्थान ठरला.

यशवंत चांदजी महिला गोविंदा पथकाचा दशकपूर्ती सराव शुभारंभ उत्साहात संपन्न!

0

Loading

भांडुप (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंत चांदजी स्पोर्ट्स क्लबच्या महिला गोविंदा पथकाने आपल्या गौरवशाली दशकपूर्ती वर्षात प्रवेश करत गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी, एक खास सराव शुभारंभ कार्यक्रम भांडुप येथील यशवंत चांदजी सावंत विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या पटांगणात मोठ्या उत्साहात साजरा केला.

परिसर रांगोळ्यांनी, पारंपरिक देखाव्यांनी आणि सजावटीने नटलेला होता. सनईच्या मंगलध्वनीत, कार्यक्रमाची सुरुवात झाली. दीपज्योतीने सर्व गोपिकांचे औक्षण करून त्यांचे मैदानात आत्मीय स्वागत करण्यात आले.

या विशेष सोहळ्याला नयना श्याम तावडे अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. श्याम तावडे, मा. नगरसेविका जागृतीताई पाटील, निकिता घाडीगावकर, राहुल जाधव यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती नोंदवली.

कार्यक्रमात छत्रपती महाराणी ताराबाई भोसले प्रतिष्ठानच्या लहान मुलींनी सादर केलेले लाठी-काठीचे प्रात्यक्षिक हे विशेष आकर्षण ठरले. या मुलींचे मोफत प्रशिक्षण हेच मैदान देत आहे, याची माहिती यावेळी देण्यात आली.

यानंतर मोठ्या गोपिकांनी लहान गोपिकांना खांद्यावर घेऊन घातलेली प्रदक्षिणा आणि नंतर आत्मविश्वासाने दिलेली ४ थरांची सलामी आणि ५ थरांची सुसंघटित रचना, हे दृश्य प्रेक्षकांसाठी रोमहर्षक ठरले. टाळ्यांचा कडकडाट आणि “रणरागिणीं”साठी उस्फूर्त जल्लोष वातावरणात भर टाकत होता.

कार्यक्रमात सर्व मान्यवर व गोपिकांचा विशेष सत्कार करण्यात आला. जागृतीताई पाटील यांनी आपल्या मनोगतातून “ही कौशल्ये प्रत्येक स्त्रीने आत्मसात केली पाहिजेत – ही काळाची गरज आहे” असे स्पष्टपणे सांगितले आणि दशकपूर्तीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रा. आरती कोकाटे-केसरकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आत्मीयतेने व ओघवत्या शैलीत करत संपूर्ण कार्यक्रमात रंग भरले.

कार्यक्रमाची सांगता आनंद, गर्व आणि प्रेरणा अशा वातावरणात झाली. यशवंत चांदजी महिला गोविंदा पथकाच्या या दशकपूर्ती सराव शुभारंभाने केवळ कसरती नव्हे, तर नारीशक्तीचा भव्य जागर घडवून आणला!

कर्तृत्वाचा गौरव… सेवाभावी कुस्तीपटू काकासाहेब पाटील यांचा निरोप समारंभ भावुक वातावरणात संपन्न

0

Loading

बांबरुड -ता. पाचोरा गावाच्या सामाजिक, क्रीडा, आणि विकास कामांमध्ये नेहमी अग्रेसर राहून आपल्या सेवाभावी आणि कर्तृत्वशील कार्यशैलीने समाजमनात आदराचे स्थान निर्माण करणारे काकासाहेब कृष्णराव पाटील यांचा निरोप समारंभ महादेवाचे बांबरुड येथे रविवार, १३ जुलै २०२५ रोजी अत्यंत उत्साही आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला. बजाज ऑटो कंपनी, छत्रपती संभाजीनगर येथे तब्बल ३५ वर्षे क्वालिटी कंट्रोलर इन्स्पेक्टर पदावर निष्ठेने सेवा बजावणाऱ्या या कुस्तीवीर सेवकाचा गौरव करण्यासाठी संपूर्ण गाव एकत्र आले.
कार्यक्रमाचे आयोजन पद्माई सिमेंट प्रॉडक्ट्स व महादेवाचे बांबरुड ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या गौरव समारंभाचे प्रमुख आकर्षण म्हणजे यामध्ये सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आप्पासाहेब किशोर पाटील (आमदार, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघ) होते. तर माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ, आरटीओ इन्स्पेक्टर दादासाहेब हेमंत शिवाजी पाटील (जळगाव), भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेशअण्णा परदेशी, भडगाव शेतकरी संघाचे चेअरमन भैय्यासाहेब पाटील, आणि माजी प्राचार्य सुनील आबा पाटील यांची विशेष उपस्थिती कार्यक्रमास लाभली. या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ, हितचिंतक, नातेवाईक, मित्रमंडळी, महिला मंडळ, तरुण वर्ग अशा विविध स्तरातील शेकडो लोकांनी उपस्थित राहून काकासाहेबांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप महाजन यांनी केले. काकासाहेबांचा विस्तृत परिचय सुधाकर सोनवणे यांनी सुस्पष्ट शब्दांत मांडला. त्यांनी केवळ नोकरीत निष्ठा ठेवली नाही तर आपल्या मूळगावी बांबरुड येथे सतत शासनदरबारी पाठपुरावा करत विकासकामे, योजना, क्रीडांगण सुधारणा व युवा प्रोत्साहनासाठी मोठे योगदान दिले, हे विशेषत्वाने उपस्थितांना पटवून दिले.कार्यक्रमात काकासाहेब पाटील आणि त्यांच्या सौ. सुषमाताई पाटील यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि गौरवपत्र देऊन सन्मान करण्यात आला. संपूर्ण समारंभात एक आगळीच जिव्हाळ्याची आणि आदरभावाची भावना अनुभवायला मिळाली. त्यानंतर बबनराव पाटील व संगीता पाटील यांचा देखील ‘शिलेदार ग्रामसेवक’ पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. या सत्काराने गावातील ग्रामपंचायतीच्या गुणवत्तापूर्ण सेवकांच्या कार्याची दखल घेतल्याचे निदर्शनास आले.
कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
आमदार आप्पासाहेब किशोर पाटील यांनी काकासाहेबांच्या प्रामाणिक सेवेला दाद देत त्यांच्या साध्या पण प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे वर्णन केले. “अशा व्यक्ती गावाचा गौरव असतात. सेवेत असतानाही त्यांनी गावासाठी अनेक योजनांची जोड मिळवून दिली आणि सेवा निवृत्तीनंतरही ते समाजाच्या केंद्रस्थानी राहतील,” असे त्यांनी सांगितले.
माजी आमदार भाऊसाहेब वाघ यांनी त्यांच्या कुस्तीप्रेमी कार्यकर्तृत्वाचा विशेष उल्लेख करत गावातील युवा पिढीने त्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्यावी, असे मत मांडले.
इन्स्पेक्टर दादासाहेब पाटील यांनी एक उत्कृष्ट कर्मचारी आणि सामाजिक भान असलेली व्यक्ती म्हणून त्यांच्याशी असलेल्या सहवासाचे अनुभव शेअर केले. गुरुवर्य प्रा मालोजीराव भोसले,
गणेशअण्णा परदेशी, भैय्यासाहेब पाटील आणि सुनील आबा पाटील यांनी देखील त्यांच्या कार्यकर्तृत्वाचे स्मरण करून दिले. या सोहळ्याचा मुख्य भाग ठरला तो काकासाहेब पाटील यांचे भावनिक उत्तर भाषण. त्यांनी आपल्या सेवाकाळात आलेल्या अनुभवांचे निवेदन करत ग्रामस्थ, कंपनीतील सहकारी, आणि कुटुंबियांचे आभार मानले. “नोकरी ही केवळ उपजीविकेचे साधन नव्हे तर समाजहिताचा पूल ठरतो, हे मी नेहमी लक्षात ठेवले. गावासाठी काही करावे ही भावना मनात होती आणि ती पूर्ण करण्यासाठी शासनदरबारी सातत्याने आवाज उठवला,” असे त्यांनी नम्रतेने सांगितले. भाषणादरम्यान उपस्थितांच्या डोळ्यांतून आसवे ओघळताना दिसली. समारोपाच्या भागात स्नेहींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये बांबरुडच्या विकासात मोलाचा वाटा उचलणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा ग्रामस्थांच्यावतीने गौरव करण्यात आला. यानंतर सर्व मान्यवर, ग्रामस्थ व उपस्थित पाहुण्यांसाठी स्नेहभोजनाची मनोहर व्यवस्था करण्यात आली होती. भोजन सोहळ्याने कार्यक्रमाचा उत्कर्ष गाठला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धर्मा महादू पाटील यांच्यासह बांबरुड ग्रामस्थांनी संयोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे नियोजन, सुसंवाद, आणि सामूहिक सहभागामुळे संपूर्ण कार्यक्रम उत्तमरीत्या पार पडला. हा केवळ सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नव्हता, तर एका संपूर्ण पिढीला प्रेरणा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा सार्वजनिक गौरव होता.आजच्या धावपळीच्या युगात स्वतःची सेवा बजावत असतानाच आपल्या गावासाठी सातत्याने झटणारी माणसे विरळाच. काकासाहेब पाटील यांचा प्रवास हेच अधोरेखित करतो की – एकच आयुष्य जगायचे असेल तर ते समाजासाठी झिजवावे. बांबरुड ग्रामस्थांनी याच विचाराने त्यांचा गौरव करत, त्यांच्या योगदानाला सामूहिक मान्यता दिली. कार्यक्रमानंतर संपूर्ण गावभर या समारंभाबद्दल कौतुकाचे सूर आणि अभिमानाचे भाव उमटले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सी एन चौधरी तर आभार सुधाकर सोनवणे यांनी मानले

आज दि.13/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आजच्या ग्रहस्थितीत तुमच्या मेहनतीला मान्यता मिळेल. आर्थिक व प्रतिष्ठात्मक क्षेत्रात वाढ होऊ शकते. निर्णय घेताना थोडी सावधगिरी आवश्यक.
शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल

वृषभ
भावनांच्या बाजूने थोडे अस्थिरता येऊ शकतात, त्यामुळे निर्णय मागे घेण्याचा विचार करा. कामात समर्पण नेहमी प्रमाणे फायदेशीर ठरेल.
शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी

मिथुन
मानसिक ताण जाणवेल आणि कामातील जबाबदाऱ्या वाढतील. दिवसभर संयमाने वागल्यास काम सुगम होईल.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा

कर्क
आजचा दिवस सर्जनशील व व्यावसायिक दोन्ही बाबतीत सकारात्मक ठरू शकतो. प्रवास किंवा संभाषणातून फायदा होईल.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा

सिंह
तुमच्या नेतृत्वगुणांना बल मिळेल. कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास आत्मविश्वासातून पावले टाका; आरोग्यावर ताण टाळा.
शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी

कन्या
विरोधकांच्या दबावाखाली येऊ शकता; परंतु योग्य नियोजनाने तो मात करता येईल. खर्चात संयम ठेवा.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा

तुला
आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी आवश्यक आहे. प्रिय व्यक्तींसोबत संवादातून समाधान मिळेल.
शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक
आज आर्थिक लाभ आणि खर्च दोन्ही दिसणार आहेत. परंतु अनावश्यक खर्च टाळायला हवे.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा

धनु
शारीरिक आणि मानसिक उर्जा चांगली राहील. पण खर्चाविषयी जागरूक रहा. प्रवास किंवा शिक्षणाची संधी लाभदायक राहील.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी

मकर
आज वक्री शनीचा प्रभाव तुम्हाला कठोर निर्णयांची शक्यता देऊ शकतो. कारकिर्दीत सुधारणा तर होतच, पण संयम आवश्यक राहील.
शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा

कुंभ
सभोवताली सामाजिक वातावरण सकारात्मक राहील. जुनी गुंतवणूक वा कामातून स्थिरता लाभेल.
शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा

मीन
शासन आणि आर्थिक समतोल साधण्याचा योग दिसतोय. परंतु खर्च आणि भावनिक दोन्हीकडे नियंत्रण आवश्यक.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

‘निलम गार्डन व बिअर बार’चे डेग मटन – पंचक्रोशीतील खवय्यांसाठी स्वादिष्ट आकर्षण

0

Loading

पाचोरा-भडगाव रोडवरील ‘निलम गार्डन व बिअर बार’ हे फक्त एक बिअर बार किंवा पारंपरिक भोजनगृह नसून, आज पंचक्रोशीतील मटनप्रेमी खवय्यांसाठी खास ‘डेग मटन’साठी प्रसिद्ध ठिकाण ठरले आहे. येथील चव, दर्जा, पारंपरिक भट्टीतील स्वयंपाक व योग्य किंमत यामुळे खवय्यांची पावले दर आठवड्याला येथे वळताना दिसतात. या ‘निलम गार्डन व बिअर बार’मध्ये खास करून रविवार, मंगळवार, बुधवार, शुक्रवार व शनिवार या दिवशी फक्त मर्यादित प्रमाणात ‘डेग मटन’ उपलब्ध असते. विशेष म्हणजे येथे मिळणाऱ्या मटनाची चव ही कुठल्याही इतर हॉटेलपेक्षा वेगळी आणि अस्सल असल्यानेच हे ठिकाण पंचक्रोशीतील खवय्यांसाठी मेजवानीचे केंद्र बनले आहे. या व्यवसायाच्या यशामागे प्रमुख हातभार आहे निलम गार्डन व बिअर बारचे संचालक प्रदीपशेठ मराठे यांचा. त्यांनी मटणासाठी लागणाऱ्या बोकडांची खरेदी स्वतः गोंदेगाव, बनोटी, अजिंठा-सातमाळा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामीण भागातून थेट केली जाते. हे बोकड नैसर्गिक चराईवर वाढलेले असल्याने त्यांचे मटन अतिशय चविष्ट आणि आरोग्यदायी असते. अशा प्रकारच्या मेहनतीमुळे आज ‘निलम गार्डन व बिअर बार’ने या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. डेग मटनसाठी लागणारे सर्व मसाले बऱ्हाणपूर येथून खास मागवले जातात. तेथे तयार होणारे मसाले हे पारंपरिक आणि उच्च प्रतीचे असल्याने मटनाच्या चवीत एक नैसर्गिक खोबळ आणि तीव्रता निर्माण होते. शिवाय मटन शिजवण्यासाठी वापरण्यात येणारे शुद्ध शेंगदाण्याचे तेल एरंडोल येथील नामांकित ‘बालाजी ब्रँड’चे मागवले जाते. ही दोन गोष्टी – बऱ्हाणपूरचे मसाले आणि बालाजी ब्रँडचे शेंगदाण्याचे तेल – यांच्या संगमामुळे तयार होणाऱ्या मटनाच्या प्रत्येक घासात दर्जा, शुद्धता आणि स्वादाची सुसंगती जाणवते. ‘निलम गार्डन व बिअर बार’मध्ये भट्टीवर पारंपरिक पद्धतीने झाकून शिजवलेले मटन तयार केले जाते. लोखंडी डेगमध्ये ४–५ तास मंद आचेवर मटन मसाल्यांसह शिजवले जाते. यामुळे मसाले मटनामध्ये पूर्णपणे शोषले जातात आणि चव अगदी खोलवर उतरते. शिजवण्याची ही पद्धत फक्त चवच नव्हे तर आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही फायदेशीर आहे, कारण ती चरबी वितळवते व अन्न हलके आणि पचायला सोपे बनवते. ‘निलम गार्डन व बिअर बार’मध्ये केवळ पाचोरा व भडगावच नव्हे, तर चाळीसगाव, पारोळा, चोपडा, एरंडोल, नांदगाव, साळसुदा, वडगाव, वणी, तामसवाडे येथून देखील खवय्ये आवर्जून भेट देत आहेत. शनिवार व रविवारच्या संध्याकाळी येथे भरगच्च गर्दी दिसते. अनेक ग्राहक आपापल्या कुटुंबियांसह, मित्रमंडळींसह येथे येऊन स्वादाचा आनंद लुटतात. आजच्या काळात दर्जा, चव, स्वच्छता आणि सेवाभाव या सर्वांची सांगड घालणारे ठिकाण शोधणे कठीण असते. मात्र निलम गार्डन व बिअर बार ही अपवादात्मक जागा आहे. येथील आसनव्यवस्था प्रशस्त असून, हॉटेलचा परिसर स्वच्छ आणि शांत आहे. स्वयंपाकघर व कर्मचारी वर्ग देखील सुशिक्षित, विनम्र आणि ग्राहकाभिमुख आहे. येथील बिअर बार हे स्वतंत्रपणे नियंत्रित केलेले असून, जेवणासाठी आलेल्या ग्राहकांना आवश्यक असल्यास निवांत वातावरणात मद्यसेवनाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, संपूर्ण परिसरात सभ्यतेची चौकट कायम ठेवली गेली आहे, हे विशेष. या संपूर्ण उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रदीपशेठ मराठे यांनी केवळ व्यावसायिक दृष्टीकोन ठेवून नव्हे, तर खवय्यांच्या समाधानासाठी गुणवत्ता आणि चव याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. स्थानिक ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावत त्यांनी बोकडपालकांशी थेट संपर्क साधला आहे, स्थानिक कामगारांना रोजगार दिला आहे, आणि पाचोऱ्याला चविष्ट ओळख मिळवून दिली आहे. ‘निलम गार्डन व बिअर बार’ हे आज पंचक्रोशीतील केवळ एक भोजनगृह किंवा मद्यगृह नसून, एक खाद्यसंस्कृती आणि अनुभवाचे केंद्र बनले आहे. पारंपरिक पदार्थांची अस्सल चव, दर्जेदार सेवा, शुद्धतेचा आग्रह आणि सभ्य वातावरण यामुळे येथे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समाधान मिळते. आणि म्हणूनच ‘डेग मटन’ म्हटलं की, खवय्यांचे पहिले पाऊल ‘निलम गार्डन व बिअर बार’कडेच वळते.

आ.किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णापुरी येथे भांडेसंच वितरणातून सक्षमीकरण

0

Loading

पाचोरा – कृष्णापुरी येथील मारोती मंदिर परिसरात बांधकाम कामगारांसाठी सेफ्टी किट (पेटी) आणि गृह उपयोगी भांडे संच वितरणाचा भव्य कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्धतेने पार पडला. हा कार्यक्रम म्हणजे फक्त भांडेसंच वाटप नव्हे, तर समाजाच्या आधारस्तंभ असलेल्या श्रमिक वर्गाच्या सन्मानाचे व त्यांच्या गरजांची दखल घेण्याचे प्रत्यक्ष उदाहरण ठरले.
ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांनी सेफ्टी किट आणि गृह उपयोगी भांडे संचसाठी अर्ज केले होते. या योजनेचा उद्देश म्हणजे बांधकामाच्या कठीण आणि धोकादायक कामात राबणाऱ्या कामगारांचे संरक्षण, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणे. विशेष म्हणजे कृष्णापुरी भागातीलच नव्हे तर परिसरातील इतर नोंदणी केलेल्या कामगारांनाही याच ठिकाणी संच देण्यात आले.
या वितरणाचा मुख्य कार्यक्रम कृष्णापुरी येथे आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दिसून आली होती. वाटपाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले होते, जेणेकरून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला योग्य ती मदत वेळेवर पोहोचवता येईल.
या सामाजिक उपक्रमाचे मार्गदर्शन सन्माननीय आमदार किशोरआप्पा पाटील यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखाली भागातील अनेक विकासकामे गतिमान झाली आहेत. समाजातील वंचित, श्रमिक, आणि दुर्लक्षित घटकांसाठी ते सदैव कार्यरत असतात, आणि हा भांडेसंच वितरण कार्यक्रम त्याच सामाजिक बांधिलकीची साक्ष देणारा होता. आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या सहकार्यामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला, असे उपस्थित बांधकाम कामगारांनी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आणि लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली. विशेषतः प्रदिप वाघ, मयुर महाजन, सुरज शिंदे, संतोष महाजन, रविंद्र पाटील, सुदर्शन सोनवणे, शरद गिते, हेमंत चव्हाण, प्रशांत धनगर, कन्हैया देवरे, सुनंदाताई महाजन, सुनील महाजन, मयुर चव्हाण, गणेश पाटील या सर्वांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले. त्यांनी लाभार्थ्यांची यादी तयार करणे, वाटपाच्या आधी संचांची तपासणी करणे, वितरणाच्या दिवशी गर्दी नियंत्रण करणे यांसारखी महत्त्वाची कामे पार पाडली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित बांधकाम कामगारांना या योजनेविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर लाभार्थ्यांना एकामागून एक रांगेत उभे करून व्यवस्थितरित्या भांडे संच व सेफ्टी किटचे वाटप करण्यात आले. प्रत्येक संचामध्ये एक कुकर, कढई, तवा, वाटी, पातेली, डबे इत्यादी उपयोगी भांडी समाविष्ट होती.
या प्रसंगी अनेक लाभार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि कृतज्ञतेचा भाव होता. “आमच्यासाठी कोणी तरी विचार करतंय ही भावना खूप मोलाची आहे,” असे अनेकांनी व्यक्त केले. काही महिलांनी तर अश्रूंनी डोळे पुसत “हे भांडे संच आम्हाला नवसंजीवनीसारखे मिळाले आहेत, गरज असताना मिळालेली मदत मनाला स्पर्शून गेली,” अशी प्रतिक्रिया दिली.
सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने पाहता असे उपक्रम केवळ वस्तू वाटपापुरते मर्यादित राहत नाहीत तर समाजाला एक सकारात्मक संदेश देतात. बांधकाम कामगार हा समाजाचा हृदय असतो, त्यांच्या हातून इमारती, पूल, रस्ते, शाळा, रुग्णालये उभी राहतात; पण या श्रमिकांचा विचार सहसा दुर्लक्षितच राहतो. अशा पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम कामगारांचे सक्षमीकरण व त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरला.
या कार्यक्रमामुळे समाजातील इतर घटकांनाही श्रमिक वर्गाबद्दल संवेदनशीलता निर्माण होईल, असे अनेक ज्येष्ठ नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे होते या भांडेसंच वितरण कार्यक्रमातून एक गोष्ट निश्चितपणे अधोरेखित होते की, सामाजिक विकासाची खरी सुरुवात ही गरजूंच्या हातात काहीतरी मोलाचे आणि उपयुक्त देऊन होते. या कार्यक्रमाचे यश हे केवळ भांडे वाटपामुळे नसून, समाजाच्या आधारस्तंभ असलेल्या कामगारांप्रती दर्शविलेल्या आपुलकीमुळे आणि मान्यवरांच्या सक्रिय सहभागामुळे आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेमागील प्रत्येक व्यक्तीने कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता निष्कलंक समाजसेवा करण्याची भावना ठेवली. हा उपक्रम भविष्यात इतरही भागांत राबवावा, अशी मागणी अनेक कामगारांनी उपस्थित मान्यवरांकडे केली. त्यामुळे अशा प्रकारच्या उपक्रमांनी समाजात एक वेगळी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. या कार्यातून केवळ भांडीच नव्हे तर आपुलकी, आत्मसन्मान आणि समाजाबद्दलची विश्वासाची साखळी बांधली गेली, हे निश्चित!

सहकार पॅनलच्या पत्रकास सभासदांच्या विचारांसाठी काही प्रश्न… एक सुसंवादी उत्तर – डॉ निलेश मराठे

0

Loading

प्रिय सभासद बांधव,
दि पाचोरा पीपल्स बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनेलच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या परिपत्रकात काही गोष्टी मांडण्यात आल्या आहेत. त्या वाचून एक जबाबदार सभासद म्हणून आमच्या मनात काही प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. तेच प्रश्न तुमच्यासमोर सादर करत आहोत. हे उत्तर विरोधासाठी नाही, तर विचारासाठी आहे.
सहकार पॅनेलने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामांचा यथायोग्य गौरव आम्ही करतो. मात्र, कामगिरीचा खरा लेखाजोखा फक्त आकड्यांमध्ये नव्हे, तर पारदर्शकतेत आणि प्रत्येक सभासदाला मिळालेल्या न्यायात असतो.
१. ठेवी वाढल्या, पण खातेदार समाधानी आहेत का?
ठेवी दुपटीपेक्षा जास्त वाढल्या, हा चांगला आर्थिक निर्देशांक आहे. पण यामागे जनतेचा विश्वास आहे की एखाद्या संस्था/कर्मचाऱ्यांवर दबाव? वाढीच्या आकड्यांमागे किती स्थिर ठेवी आहेत आणि किती केवळ नावापुरत्या ठेवी आहेत? सभासदांना हेही विचारायचं आहे की, वाढलेल्या ठेवींबरोबर त्यांचं आर्थिक हित कितपत जपलं गेलं?
२. एन.पी.ए. नियंत्रण हे प्रशंसनीय, पण मार्ग कोणता?
ग्रॉस एन.पी.ए. ४०% वरून ४.५% आणि नेट एन.पी.ए. ३२% वरून ०% हा मोठा बदल आहे. पण हे कर्ज वसुलीतून झालं का की जुनं कर्ज राइट ऑफ करून किंवा नव्या पद्धतीने वर्गवारी करून? रिझर्व बँक निर्बंध उठवते म्हणजे धोका दूर झाला, असं म्हणता येईल. पण भविष्यात पुन्हा तो धोका निर्माण होणार नाही, याची खात्री काय?
३. तांत्रिक सुविधा, पण सामान्य माणूस किती जोडला गेलाय?
कोअर बँकिंग, मोबाईल बँकिंग, RTGS, NEFT, UPI, QR कोड या सुविधा नक्कीच आधुनिकतेच्या दिशेने पावले आहेत. मात्र, ग्रामीण व निमशहरी भागातील सामान्य सभासदाला या सुविधा वापरण्यास कितपत प्रशिक्षण दिलं गेलं? सेवा सुरू झाली म्हणजे त्याचा लाभ सर्वपरिचित आहे, असं होत नाही.
४. शाखा वाढली, पण सेवा दर्जा काय?
पाच जिल्ह्यांपर्यंत कार्यक्षेत्र वाढवणं हे महत्वाकांक्षी पाऊल आहे. नाशिक व शेंदुर्णी येथील उपक्रम योग्यच. पण सध्याच्या शाखांमधील सेवा सुविधा, मनुष्यबळ आणि समाधानाचे प्रमाण काय? नव्या १५ शाखा उघडण्याचा निश्चय करताना जुन्या शाखा सक्षम आहेत का?
५. नफा वाढला, पण पारदर्शकतेने वाटला का?
६० लाखांवरून ३ कोटी ४१ लाख असा नफा वाढलेला दाखवला जातो, पण त्याच वेळी सभासदांना लाभांश फक्त १०% इतकाच दिला गेला. यामधील तफावत, प्रशासकीय खर्च, प्रचार व सत्तेतील खर्च हे कुठे आणि किती?
६. डिव्हिडंड स्थिर, पण इतर फायदे कोणते?
१०% डिव्हिडंड हे समाधानकारक वाटते, पण बँकेचा एकूण नफा बघता हा डिव्हिडंड अधिक असायला हवा होता. सभासदांना वैयक्तिक सेवा, कर्ज मर्यादा, व्याजदर, अर्ज सुलभीकरण, तक्रार निवारण यातील सुधारणांची आकडेवारी कोठे आहे?
७. महत्वाकांक्षी योजना – पण अंमलबजावणी कधी?
महिला गटांसाठी, लघुउद्योगांसाठी, उद्योजकांसाठी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. CGTMSE, PMEGP, CMEGP अशा योजनांचा लाभ मिळवून देण्याची भूमिका आश्वासक आहे. पण आतापर्यंत किती सभासदांना खरेच याचा लाभ मिळाला? आकडे कुठे?
८. विकास म्हणजे सभासदांचा आत्मसन्मान, तो जपलाय का?
विकास हा एकतर्फी नफा-तोट्याचा किंवा शाखा-तांत्रिकतेचा विषय नसतो. तो सभासदांच्या संवादाचा विषय असतो. शाखांमधील कर्मचारी किती उत्तरदायी? तक्रारींचं निराकरण किती वेळेत होतं? व्यवहारात पारदर्शकता आहे का?
सहकार पॅनेलने केलेल्या काही कामगिरीचं आम्ही स्वागत करतो. मात्र, केवळ आकड्यांवर, तांत्रिकतेवर आणि विस्तारावर आधारित आत्मप्रशंसेच्या आधारावर मतदान मिळावं, हे योग्य नाही. सभासदांना हक्काने प्रश्न विचारता यावेत, त्यांना उत्तरं मिळाली पाहिजेत, त्यांना पर्याय मिळाले पाहिजेत.
सभासदांनी जागरूकपणे विचार करून, सर्व उमेदवारांचा अभ्यास करून मत द्यावं, हीच आमची विनंती.

गुरूवंदना प्रेरणोत्सवाने उजळली श्री गो.से. हायस्कूलची परंपरा

0

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा या शाळेत वर्षभर विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन होत असते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी उपलब्ध करून देणाऱ्या या संस्थेत शाळेचे मुख्याध्यापक एन आर ठाकरेसर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा हे पावन पर्व यंदाही प्रेरणादायी आणि संस्कारक्षम वातावरणात साजरे करण्यात आले.
सण, उत्सव आणि विविध उपक्रमांचे माध्यम करून शाळा विद्यार्थ्यांमध्ये मूल्यशिक्षण रुजवते आणि त्यातून एक जबाबदार, सुसंस्कारित पिढी घडवण्याचा प्रयत्न सातत्याने करते. गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील गुरू-शिष्य परंपरेचा अत्यंत पवित्र दिवस. या दिवशी ज्ञानदात्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा आहे. त्या अनुशंगाने श्री गो.से. हायस्कूलमध्ये एक आकर्षक आणि आशयघन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पर्यवेक्षिका ए. आर. गोहील या होत्या. त्यांनी आपल्या भाषणातून गुरुंचे विद्यार्थ्यांच्या जीवनात असलेले स्थान, त्यांच्या मार्गदर्शनाचे महत्त्व आणि शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या घडणीत होणारा मौल्यवान सहभाग यावर सखोल प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर पर्यवेक्षक रहीम तडवी सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख बोरसे सर, ज्येष्ठ शिक्षक पी. एम. पाटील तसेच अरुण कुमावत हे मान्यवर शिक्षक उपस्थित होते. या सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे उत्साहवर्धन करत त्यांच्याकडून होत असलेल्या सर्जनशील उपक्रमांची प्रशंसा केली. विशेषतः विद्यार्थ्यांनी घेतलेले पुढाकार आणि आयोजन कौशल्य यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमात एक वेगळेपण ठळकपणे जाणवले ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पाचवी ‘क’ वर्गातील विद्यार्थ्यांकडे सोपविण्यात आले होते. शाळेने विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवून त्यांना संधी दिली आणि त्या संधीचे सोनं करत विद्यार्थ्यांनी अतिशय नेटके, शिस्तबद्ध आणि रचनात्मक कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.
विद्यार्थ्यांनी फलक आणि वर्गसजावट यात अतिशय कल्पकतेने काम केले. शाळेच्या भिंतींवर विविध गुरूवंदना, सुविचार, रंगीत फलक आणि हस्तकला वस्तूंनी सजावट करण्यात आली होती. शाळेच्या संपूर्ण परिसराला एक भक्तिभावपूर्ण आणि सुसंस्कारित साज चढवण्यात आला होता. गुरूंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले आणि विद्यार्थ्यांनी गुरूंच्या पायावर पुष्प अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भाषणांचे सादरीकरण झाले. एकूण पाच ते सहा विद्यार्थ्यांनी आपल्या शब्दांत गुरूंचे महत्त्व आणि त्यांच्या जीवनातील अनुभव मांडले. यातील अनेक भाषणे अर्थपूर्ण, भावनिक आणि मनाला भिडणारी होती. त्यात बिल्दी (ता. पाचोरा) येथील पाचवी ‘क’ चे विद्यार्थी समर्थ भूषण धनगर यांचे मनोगत विशेषत्वाने उल्लेखनीय ठरले. समर्थने आपल्या भाषणात आपल्या जीवनात आलेल्या शिक्षकांच्या प्रभावाची कथा सादर केली. त्यांनी शिक्षकांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन, समजावून सांगितलेली शिकवण, आणि कठीण प्रसंगी दिलेला आधार याचे वर्णन अतिशय भावनिक आणि प्रभावी भाषेत केले. त्याच्या भाषणाने उपस्थित सर्व शिक्षक भारावून गेले. त्याच्या भाषणातील काही ओळी विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या ठरल्या. जसे की — “आई वडिल जन्म देतात पण गुरू जीवन घडवतो… आई-वडिलांनी आपले जीवन सुरू केलं पण गुरूने त्याला दिशा दिली.” अशा ओळींच्या माध्यमातून त्याने गुरूच्या अस्तित्वाचे असामान्य महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात काही विद्यार्थ्यांनी गुरूवंदना गीत, श्लोकपठण सादर केले. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी घेतलेला सहभाग, आत्मीयता, शिस्त, वेळेचं व्यवस्थापन आणि टीमवर्क यामुळे सर्व शिक्षक भारावून गेले.
या उपक्रमामुळे केवळ गुरुपौर्णिमा साजरी झाली नाही तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सर्जनशीलता, जबाबदारीची भावना, आणि टीमवर्क यांचा विकास झाला. एकंदरीत, शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नातं दृढ करणारा, परंपरेला आधुनिकतेची जोड देणारा आणि संस्कृतीची ओळख पटवणारा कार्यक्रम ठरला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाचवी ‘क’ वर्गातीलच दोन विद्यार्थ्यांनी समर्थपणे केले. त्यांनी आपल्या छोट्याशा वयात देखील सहजता, शुद्ध उच्चार आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सूत्रसंचालनात प्रगल्भता दर्शवली.
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख बोरसे सर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करत शिक्षकांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पर्यवेक्षक रहीम तडवी सर यांनी विद्यार्थ्यांना उदात्त उद्दिष्ट ठेवण्याचे आणि शिक्षणासोबत सांस्कृतिक व सामाजिक जाणिवा ठेवण्याचे आवाहन केले.
श्री गो.से. हायस्कूलच्या या उपक्रमातून दिसून आले की, शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून ते जीवनातील मूल्यांची शिकवण आहे. शाळेने विद्यार्थ्यांना सक्रिय सहभागाची संधी देत ‘गुरुपौर्णिमा’चा कार्यक्रम एक प्रेरणादायी पर्वणी ठरवली. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी घडतात, विचार पक्के होतात, आणि मूल्यांची बीजे खोलवर रोवली जातात हे निश्चित. पाचवी ‘क’ वर्गाच्या या उपक्रमाचे संपूर्ण शाळेत उदाहरण म्हणून उल्लेख होत असून, यामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही अशा संधींसाठी उत्साह आणि प्रेरणा वाढली आहे.
शेवटी हेच म्हणावेसे वाटते की –
“गुरु म्हणजे केवळ शिकवणारे नव्हे, तर घडवणारे असतात… आणि अशा गुरुंसाठी कृतज्ञतेचे शब्द अपुरेच असतात!”

आज दि 12/07/2025 चे सर्व राशीचे भविष्य व शुभ अंक व रंग

0

Loading

मेष
आज स्वविकासाच्या संधी दिसतील; जुन्या प्रयत्नांचे फळ मिळू शकते, परंतु एखाद्या निर्णयात ताण येऊ शकतो.
शुभ अंक: १ • शुभ रंग: लाल

वृषभ
गुरु-उदय आणि मालव्य राजयोगामुळे काम-व्यवसायात आणि आर्थिक क्षेत्रात स्थैर्य आणि वाढ दिसेल.
शुभ अंक: ६ • शुभ रंग: गुलाबी 

मिथुन
आज तुमची बुद्धिमत्ता आणि संवादकौशल्य उपयोगी ठरेल. पण ग्रह गोचरामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो — संयम ठेवा.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: पिवळा

कर्क
मालव्य राजयोगामुळे करिअर आणि प्रवासाच्या संधी मिळतील; नवीन कल्पना राबवण्यासाठी अनुकूल.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: निळा

सिंह
राजयोगाचा परिणाम कुटुंब व व्यवसायात दिसून येईल, पण आरोग्य व संयम याचा विचार करा.
शुभ अंक: ९ • शुभ रंग: सोनेरी 

कन्या
आज कार्यप्रकारात स्पर्धा आणि विरोध होऊ शकतो; निर्णयात सतर्कता आवश्यक.
शुभ अंक: ५ • शुभ रंग: हिरवा

तुला
वर्तमान गोचरात संभाषण आणि आर्थिक बाबींमध्ये सतर्कता गरजेची आहे; घडामोडी नियंत्रणात ठेवा.
शुभ अंक: २ • शुभ रंग: गुलाबी 

वृश्चिक
मालव्य राजयोग आणि शनि वक्री यांच्या परिणामी आर्थिक वाढ, पण खर्चावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: काळा 

धनु
आज प्रवास, शिक्षण किंवा नवकल्पनांमध्ये फायदा मिळू शकतो; याचवेळी, खर्च नियंत्रणात ठेवा.
शुभ अंक: ३ • शुभ रंग: नारिंगी 

मकर
शनि वक्रीमुळे काही आव्हाने असली तरी, करिअर व आर्थिक योजनांमध्ये बळकट निर्णय घेण्याची संधी राहील.
शुभ अंक: ८ • शुभ रंग: निळा 

कुंभ
मालव्य राजयोगामुळे सामाजिक प्रतिष्ठा व करिअरमध्ये प्रगती होईल, पण मानसिक शांती राखण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: ४ • शुभ रंग: जांभळा 

मीन
शनि वक्रीच्या परिणामामुळे आर्थिक स्थैर्य व प्रगती दिसून येईल, पण खर्चावर लक्ष द्या.
शुभ अंक: ७ • शुभ रंग: पांढरा

वाचकांनी वरील भविष्यवाणीचा अर्थ अचूक भविष्यवाणी म्हणून न लावता केवळ आत्मपरीक्षण आणि सकारात्मक प्रेरणा म्हणून घ्यावा.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!