Home Dhyeya News Special ‘झेप : एक पाऊल कौशल्याकडे’ – विद्यार्थ्यांसाठी आत्मविकासाचा प्रेरणादायी मंच

‘झेप : एक पाऊल कौशल्याकडे’ – विद्यार्थ्यांसाठी आत्मविकासाचा प्रेरणादायी मंच

0
16

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : “उंच झेप घेण्यासाठी संधीचे सोने करून वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करा. समाज माध्यमांवर वेळ वाया घालवण्याऐवजी मोबाईलचा उपयोग शासकीय योजनांची माहिती मिळवण्यासाठी करा. नकारात्मकतेवर मात करून स्वतःला घडवा,” असे प्रबोधनपर आणि प्रेरणादायी विचार मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना व्यक्त केले.

‘झेप : एक पाऊल कौशल्याकडे’ या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन श्रीमती मणिबेन एम. पी. शाह कला आणि वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालय, माटुंगा येथील बॅचलर ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स विभाग तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अर्चना पत्की यांनी सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटीची माहिती दिली व प्रमुख उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख अतिथी म्हणून मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त शैलेश भगत, तसेच उद्योग जगतातील मार्गदर्शक विश्राम बापट यांची उपस्थिती लाभली.

या कार्यक्रमात कौशल्याधिष्ठित कामगिरीसाठी हिरल परमार, फैझा खान, प्रियंका जोगदंड आणि सिद्धी गीते या विद्यार्थिनींचा जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

विश्राम बापट यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शासकीय कौशल्य विकास उपक्रमांची माहिती दिली तसेच श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ‘गुरुसूत्र’ ॲप विषयी सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमात विद्यार्थिनींसोबत प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधण्यात आला. तसेच बॅचलर ऑफ अकाउंटिंग आणि फायनान्स विभागाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनींनी महिला सक्षमीकरणावर आधारित नाटिका सादर केली.

संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मराठी विभागाच्या प्रमुख डॉ. रश्मी शेट्ये-तुपे यांनी केले, तर आभार प्रदर्शन विभाग समन्वयक प्रा. दत्तात्रय गावडे यांनी केले.

‘झेप’ उपक्रमातून केवळ कौशल्यांची नव्हे, तर आत्मविश्वास, विचारप्रवणता आणि सामाजिक भान यांचीही पेरणी झाली. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणास्थान ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!