Home Dhyeya News Special ‘विकसित भारत @2047’ राष्ट्रीय परिषदेत प्रा. सौ. जयश्री वर्मा वाघ यांना राष्ट्रीय...

‘विकसित भारत @2047’ राष्ट्रीय परिषदेत प्रा. सौ. जयश्री वर्मा वाघ यांना राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक

0
593

Loading

लोणी – (चेतना हिरे , वरखेडी ) लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कॉलेजच्या वाणिज्य विभागामार्फत ‘विकसित भारत @2047’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. ही परिषद दि. 13 व 14 फेब्रुवारी 2026 रोजी प्रवरानगर, ता. राहता, जि. अहिल्यानगर येथील APJ Abdul Kalam Seminar Hall येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. देशाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने शैक्षणिक व संशोधन क्षेत्रातून मोलाचे योगदान देणाऱ्या या परिषदेत विविध राज्यांतील अभ्यासक, प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सहसचिव भारत घोगरे यांनी ग्रामीण भारताच्या विकासाच्या संकल्पनेवर सखोल मार्गदर्शन केले. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागाचा विकास साधताना सहकाराच्या माध्यमातून उभारलेला प्रवरा परिसर आजही देशासाठी आदर्श ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ग्रामीण भारत सक्षम झाल्याशिवाय ‘विकसित भारत’ची संकल्पना पूर्णत्वास जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या राष्ट्रीय परिषदेसाठी महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, कर्नाटक आदी राज्यांतून एकूण 170 संशोधन निबंध प्राप्त झाले होते, त्यापैकी सुमारे 40 संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्रत्यक्ष सत्रात आपले संशोधन निबंध सादर केले. आर्थिक विकास, ग्रामीण-शहरी समतोल, शिक्षणाची भूमिका, उद्योग व नवोन्मेष, सामाजिक समावेश, नैतिक मूल्ये आणि मानवी दृष्टिकोन यांसारख्या विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा झाली. या परिषदेत श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील वाणिज्य विषयाच्या प्राध्यापिका सौ. जयश्री वर्मा वाघ यांनी सादर केलेल्या संशोधन निबंधाला विशेष दाद मिळाली. त्यांच्या सखोल अभ्यासपूर्ण, वास्तववादी आणि भविष्याभिमुख मांडणीमुळे त्यांना ‘बेस्ट रिसर्च पेपर प्रेझेंटेशन’ या प्रकारात राष्ट्रीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बोलताना प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांनी भारत विकसित राष्ट्र होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. देशाच्या विकासासाठी योगदान देताना सुरुवात स्वतःपासून करणे आवश्यक असून वैयक्तिक विकासातूनच समाज व देशाचा विकास साध्य होतो, असे त्यांनी नमूद केले. विकासाच्या प्रक्रियेत मानवतेची जपणूक होणे तितकेच महत्त्वाचे असून माणूस म्हणून माणसासारखे वागणे हीच खरी प्रगती असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. येत्या काळात भारत जागतिक महासत्ता बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या परिषदेत शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, K. B. P. कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. हर्षा गोयल, कर्नाटक येथील डॉ. विद्या जिरगे, मुंबई येथील डॉ. चंद्रशेखर देवरे, डॉ. श्याम साळुंखे, उपप्राचार्य डॉ. आर. ए. पवार, डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांच्यासह विविध विद्याशाखांतील तज्ज्ञ प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी डॉ. दीपक पाटील यांनी प्रास्ताविक करून परिषदेच्या उद्दिष्टांची माहिती दिली, तर डॉ. आर. ए. पवार यांनी महाविद्यालय व संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रमांची माहिती देत परिषदेचे महत्त्व विशद केले. संशोधन संस्कृती वृद्धिंगत करणे, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे आणि देशाच्या विकासात बौद्धिक योगदान देणे हा या परिषदेचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण परिषदेत अभ्यासपूर्ण चर्चा, प्रश्नोत्तर सत्रे आणि विचारविनिमयामुळे बौद्धिक वातावरण निर्माण झाले होते. सूत्रसंचालन डॉ. शांताराम चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विजय खर्डे यांनी केले. यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक वाणिज्य विभागाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले असून ‘विकसित भारत @2047’ या राष्ट्रीय परिषदेने संशोधनाला चालना देत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सामूहिक प्रयत्नांची दिशा निश्चित केली, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!