![]()
जळगाव : देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनाने, विरोधी पक्षांच्या सातत्यपूर्ण लढ्याने आणि जनतेच्या वाढत्या दबावामुळे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरात उत्साहपूर्ण विजय मार्च काढण्यात आला. बसस्थानक परिसरातून सुरू झालेला हा मार्च महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत घोषणाबाजी आणि तिरंगा हाती घेऊन मोठ्या उत्साहात पार पडला. या आंदोलनाचा केंद्रबिंदू ठरले जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. अविनाश भालेराव, ज्यांनी विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला काँग्रेसचा ठाम पाठिंबा असल्याचे स्पष्ट करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. मार्चमध्ये युवक, विद्यार्थिनी, महिला, ज्येष्ठ कार्यकर्ते आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या संघर्षामुळे देशभरात निर्माण झालेल्या वातावरणाचा गौरव करण्यासाठी विजय मार्चनंतर काँग्रेसच्या वतीने तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. संविधानिक मूल्यांचे रक्षण, शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी उभे राहिलेल्या युवकांचा हा सन्मान असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी बोलताना ॲड. अविनाश भालेराव यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचे स्वागत करत हा केवळ एका मंत्र्याचा राजीनामा नसून विद्यार्थी शक्ती, लोकशाही आणि जनआंदोलनाचा विजय असल्याचे मत व्यक्त केले. देशातील तरुणांनी दाखविलेली एकजूट ही सत्ताधाऱ्यांना उत्तरदायी बनविणारी शक्ती असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या धोरणांविरोधात काँग्रेस पक्ष यापुढेही रस्त्यावर उतरून संघर्ष करत राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त करत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. राजीनामा दिलेले धर्मेंद्र प्रधान तसेच या घडामोडींशी संबंधित इतर जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विद्यार्थी, युवक आणि पालकांची जाहीर माफी मागावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याचा आणि विद्यार्थिनींवर झालेल्या कथित अत्याचारांचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधित दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे वक्त्यांनी सांगितले. या विजय मार्चमध्ये प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रवीण सुरवाडे, माजी शहर जिल्हाध्यक्ष शाम तायडे, शहर जिल्हाध्यक्ष जमील शेख, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार, ज्येष्ठ नेते श्रीधर चौधरी, विजय कोसोदे, विजय वाणी, प्रदीप सोनवणे, बाबा देशमुख, ज्ञानेश्वर कोळी पटेल, दीपक सोनवणे, डॉ. संयोजिता नाईक, अरुणा पाटील, अर्चना गाडे, मीरा सोनवणे, चंद्रकांत राजपूत, जगदीश गाडे, किरण महाजन, मनोज चौधरी, जाकीर बागवान, नितीन सूर्यवंशी, अंकुश कटारे, मंगेश अग्रवाल, नितीन परदेशी, भगवान रणदिवे, विजय राजपूत, प्रभाकर महाजन, प्रा. राजू भोसले, प्रताप पाटील, मुक्तार शहा, सहिद तेली, रवी चौधरी, अनंत परिहार, शेख शकील, शेख इब्राहिम, देवा ठाकूर, उद्धव वाणी, मनोज वाणी यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते, विद्यार्थी, युवक आणि नागरिक सहभागी झाले होते. विजय मार्चदरम्यान संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी सुरू झालेला संघर्ष हा केवळ एका घटनेपुरता मर्यादित नसून देशातील शिक्षण व्यवस्था अधिक जबाबदार, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचा सूर उपस्थितांनी व्यक्त केला. संघर्ष, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवरील विश्वास यांचा विजय म्हणून या मार्चकडे पाहिले जात असून, विद्यार्थ्यांच्या हितासाठी काँग्रेसचा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील, असा विश्वास ॲड. अविनाश भालेराव यांनी व्यक्त केला.





























