Home Dhyeya News Special प्रवासी उतरली अन् लक्षात आले बॅग रेल्वेतच! ₹80 हजारांचा ऐवज आरपीएफ पाचोऱ्याने...

प्रवासी उतरली अन् लक्षात आले बॅग रेल्वेतच! ₹80 हजारांचा ऐवज आरपीएफ पाचोऱ्याने सुखरूप परत केला

0
79

Loading

पाचोरा : रेल्वे प्रवासातील क्षणिक विसरामुळे एका महिला प्रवाशाची तब्बल ₹80 हजारांची मौल्यवान मालमत्ता रेल्वेगाडीतच राहिली; मात्र आरपीएफ पाचोरा यांच्या सतर्कतेमुळे काही वेळातच हा ऐवज सुरक्षितपणे तिच्या हाती परतला. ‘ऑपरेशन अमानत’ अंतर्गत आरपीएफने केलेल्या या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 08.08.2026 रोजी डीएससीआर, भुसावळकडून प्राप्त झालेल्या रेल मदद सूचनेनुसार, गाडी क्रमांक 22177 डाउन ठाणे–चाळीसगावमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला प्रवाशाची काळ्या रंगाची बॅग रेल्वेच्या एस-6 कोचमध्ये राहून गेल्याची माहिती आरपीएफ पाचोरा यांना मिळाली. संबंधित महिला प्रवासी चाळीसगाव स्थानकावर उतरली होती. स्थानकाबाहेर गेल्यानंतर तिच्या लक्षात आले की, प्रवासादरम्यान सोबत असलेली बॅग रेल्वेतच राहिली आहे. बॅगेमध्ये मौल्यवान इलेक्ट्रॉनिक वस्तू असल्याने महिला प्रवाशाची चिंता वाढली होती. माहिती मिळताच आरपीएफ पाचोरा पथकाने तातडीने हालचाली सुरू केल्या. गाडी पाचोरा स्थानकावर पोहोचताच हेड कॉन्स्टेबल प्रकाश पाटील यांनी संबंधित एस-6 कोचची बारकाईने तपासणी केली. तपासणीदरम्यान महिला प्रवाशाने वर्णन केलेली काळ्या रंगाची बॅग आढळून आली. कोणतीही हयगय न करता बॅग ताब्यात घेऊन ती आरपीएफ चौकी, पाचोरा येथे सुरक्षित आणण्यात आली. त्यानंतर महिला प्रवाशाला तिचे सामान मिळाल्याची माहिती देण्यात आली. काही वेळाने सुश्री लीपक्षी शशिकांत गवले, वय 23 वर्षे, रा. धुळे, या आपले सामान घेण्यासाठी आरपीएफ चौकी, पाचोरा येथे उपस्थित झाल्या. सामानाची योग्य मालकी निश्चित करण्यासाठी आवश्यक ती पडताळणी प्रक्रिया राबविण्यात आली. सहाय्यक सुरक्षा निरीक्षक ए. के. सिंह यांनी पंचांच्या उपस्थितीत आवश्यक चौकशी व पडताळणी पूर्ण केली. त्यानंतर नियमानुसार सुपूर्दगी पंचनामा करून बॅग महिला प्रवाशाच्या स्वाधीन करण्यात आली. सदर बॅगेमध्ये HP कंपनीचा अंदाजे ₹65,000 किमतीचा लॅपटॉप आणि Motorola कंपनीचा अंदाजे ₹15,000 किमतीचा मोबाईल फोन होता. अशा प्रकारे एकूण ₹80,000 किमतीचा ऐवज सुरक्षितपणे संबंधित प्रवाशाला परत करण्यात आला. मौल्यवान सामान कोणतीही हानी न होता परत मिळाल्याने महिला प्रवाशाने आरपीएफ पाचोरा यांच्या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले. प्रवाशांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या अडचणीच्या काळात मदत करण्याची जबाबदारीही रेल्वे सुरक्षा दलाकडून प्रभावीपणे पार पाडली जात असल्याचे या घटनेतून दिसून आले. ‘ऑपरेशन अमानत’च्या माध्यमातून रेल्वेगाड्या व रेल्वे परिसरात प्रवाशांकडून विसरल्या जाणाऱ्या वस्तू शोधून त्या योग्य मालकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सातत्याने केले जाते. आरपीएफ पाचोरा यांच्या या कामगिरीमुळे प्रवाशांच्या मनात रेल्वे सुरक्षा दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला असून, कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि तत्पर सेवाभावाचे हे आणखी एक उल्लेखनीय उदाहरण ठरले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!