![]()
भारताचा स्वातंत्र्यदिन आपण दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा करतो. तिरंगा डौलाने फडकतो, देशभक्तीची गीते घुमतात, स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले जाते; मात्र या स्वातंत्र्याच्या मागे कोणाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले, कोणाच्या तारुण्याने तुरुंगाच्या भिंती पाहिल्या, कोणाची नोकरी गेली, कोणाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आणि

कोणाचा संसारच स्वातंत्र्यलढ्यातील सहभागामुळे तुटला, याचा विचार आपण किती वेळा करतो? पाचोरा तालुक्यातील शिंदाड येथील स्वातंत्र्यसैनिक श्रीपत दलपत तेली (चौधरी) यांच्या जीवनाकडे पाहिले तर स्वातंत्र्याची किंमत केवळ राजकीय संघर्ष नव्हती, तर ती व्यक्तिगत आयुष्याच्या अक्षरशः राखेतून उभी राहिलेली राष्ट्राची पहाट होती.
श्रीपत दलपत तेली यांचा जन्म १ डिसेंबर १९२० रोजी झाला. वडगाव मुलाणे येथे मराठी सातवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा सुरू केली. जीवनाची वाट स्थिर होत असतानाच १९४२ च्या ‘चले जाव’ आंदोलनाने त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण दिले. महात्मा गांधींच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्यांच्यासोबत वडगाव मुलाणे येथील स्वातंत्र्यसैनिक नथू महादू पाटील, बाजीराव सुरसिंग पाटील आणि हर्शसिंग नरसिंग पाटील यांनीही या क्रांतीत सहभाग घेतला आणि ब्रिटिश राजवटीची शिक्षा भोगली.
स्वातंत्र्याची ही वाट फुलांनी सजलेली नव्हती. ब्रिटिश सत्तेने श्रीपत दलपत तेली यांना तब्बल सोळा महिन्यांची सक्तमजुरी आणि पंचवीस रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. एका शिक्षकासाठी नोकरी गमावणे ही मोठी आर्थिक आणि सामाजिक शिक्षा होती; पण त्यांनी देशासाठी स्वीकारलेला मार्ग सोडला नाही. कारावासामुळे त्यांची शिक्षकाची नोकरी गेली, भविष्याची आर्थिक सुरक्षितता हिरावली गेली, तरी राष्ट्रस्वातंत्र्याचा संकल्प मात्र अधिक दृढ झाला. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रसेवादलाचे सर्व वेळ कार्य स्वीकारले. स्वातंत्र्य हे त्यांच्यासाठी केवळ राजकीय ध्येय नव्हते, तर जीवनाचा धर्म झाला होता.
त्यांच्या जीवनातील सर्वांत वेदनादायी अध्याय म्हणजे स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्यामुळे अक्षरशः त्यांचा वैवाहिक संबंध तुटणे. बालपणी वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी सारजा-बिल कायद्याच्या भीतीने आजोबांनी त्यांचे लग्न लावून दिले होते. त्यांच्या सासऱ्यांची सरकारी नोकरीतील तलाठी म्हणून सेवा होती. ब्रिटिश साम्राज्याची प्रचंड ताकद पाहता काँग्रेसची चळवळ, चरखा आणि स्वातंत्र्याचा संघर्ष इंग्रजांच्या सामर्थ्यापुढे टिकणार नाही, असा त्यांचा विश्वास होता. त्यामुळे श्रीपत दलपत तेली यांनी स्वातंत्र्यलढ्याचा मार्ग सोडावा, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या ध्येयाशी तडजोड करण्यास नकार दिला.
याची किंमत त्यांना स्वतःच्या संसारातून मोजावी लागली. श्रीपत दलपत तेली कारागृहात शिक्षा भोगत असतानाच त्यांच्या सासरच्या मंडळींनी त्यांच्याशी असलेला संबंध तोडला आणि त्यांच्या पत्नीचा दुसऱ्या व्यक्तीशी गंधर्व विवाह लावून दिला. कल्पना करा—एक तरुण देशासाठी तुरुंगात आहे, स्वातंत्र्यासाठी सोळा महिन्यांची सक्तमजुरी भोगत आहे आणि त्याच वेळी त्याचा संसार त्याच्यापासून हिरावून घेतला जात आहे. आजच्या पिढीला ही घटना कदाचित अविश्वसनीय वाटेल; परंतु त्या काळातील स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागले, याचे हे अत्यंत बोलके उदाहरण आहे.
तरीही श्रीपत दलपत तेली खचले नाहीत. त्यांनी स्वातंत्र्य मिळाल्याशिवाय संसाराचा विचार करणार नाही, अशी प्रतिज्ञा केली. वैयक्तिक आयुष्याचा आधार निसटला, कुटुंबीयांचा विरोध झाला, नोकरी गेली, तुरुंगवास भोगावा लागला; पण भारतमातेच्या स्वातंत्र्याच्या संकल्पातून ते ढळले नाहीत. त्यांच्या जीवनातील हा प्रसंग स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील केवळ भावनिक घटना म्हणून नव्हे, तर राष्ट्रासाठी केलेल्या सर्वोच्च वैयक्तिक त्यागाचे उदाहरण म्हणून पाहिले पाहिजे.
या संघर्षाच्या काळात पाचोरा परिसरात अनेकांनी स्वातंत्र्याच्या यज्ञात आपापली आहुती दिली. कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे, हिराजी पाटील, मिश्रिलाल झवर, सुकलाल गुर्जर, शहाबुद्दीन तांबोळी, लक्ष्मण कानोजी, हैद्राबादच्या संग्रामातील शहीद, हिरालाल जैसवाल, तुळशिराम जैसवाल, दगडू बाळा बलांडे, यादव बाळा बलांडे, तुकाराम वाघ, नामदेव वाधा, गोविंदा साबळे, किसनसिंग नथूसिंग, नथूसिंग राजपूत, विश्वनाथ राजहंस, भाऊराव कानडे, काशिनाथ म्हसके, सांडू सखाराम वाघ, जगन्नाथ भालेराव, गंगाधर येसकर, जगजीवन राम आणि रामचंद्र धंदेवार यांच्यासह असंख्य ज्ञात-अज्ञात देशभक्तांनी स्वातंत्र्याच्या संघर्षाला बळ दिले. त्यांच्या त्यागामुळेच ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा गावागावात आणि घराघरात पोहोचला.
श्रीपत दलपत तेली यांचे व्यक्तिमत्त्व केवळ स्वातंत्र्यसैनिक म्हणूनच मोठे नव्हते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेतीकडे वळून कष्ट, प्रयोगशीलता आणि आत्मविश्वासाची नवी कहाणी लिहिली. टेकड्या, खाचा आणि नाल्यांनी व्यापलेल्या अत्यल्प मूल्याच्या जमिनीचे सपाटीकरण करून तिचा उत्पादनक्षम वापर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. उन्हाळी भुईमुगाचे पीक घेण्याचा प्रयोग त्यांनी केला आणि तो यशस्वी करून दाखवला. स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांच्या सत्तेला आव्हान देणारी जिद्द आणि शेतीत अडचणींना सामोरे जाणारी प्रयोगशील वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची दोन रूपे होती.
त्यांच्या या कृषी कार्याची महाराष्ट्र शासनाने दखल घेतली आणि सन १९७० मध्ये त्यांना ‘शेतीनिष्ठ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. एका बाजूला देशासाठी तुरुंगवास आणि नोकरीचा त्याग, तर दुसऱ्या बाजूला स्वातंत्र्यानंतर मातीशी नाते जोडून शेतीत यश संपादन करण्याचा प्रवास—या दोन्ही गोष्टी त्यांच्या कर्तृत्वाची व्याप्ती सांगतात.

श्रीपत दलपत तेली आणि त्यांच्या धर्मपत्नी शांता मावशी यांच्याशी माझे आणि माझ्या कुटुंबाचे नाते केवळ परिचयाचे नव्हते; त्यांच्या सहवासातून इतिहास ऐकण्याचे आणि अनुभवण्याचे भाग्य मला लाभले. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक अण्णासाहेब दामोदर लोटन महाजन, श्रीपत दलपत तेली (चौधरी) आणि शांता मावशी यांच्यासोबत मी पत्रकार संदिप महाजन यांना तब्बल ४२ दिवस भारत भ्रमण करण्याचा योग मला आला. त्या ४२ दिवसांच्या प्रवासात केवळ देशदर्शन झाले नाही, तर त्यांच्यासाठी तो जणू चालता-बोलता इतिहासाचा धडा ठरला.
प्रवासादरम्यान स्वातंत्र्यचळवळीच्या अनेक आठवणी, ब्रिटिश काळातील प्रसंग, भूमिगत कार्यकर्त्यांचे संघर्ष, तुरुंगातील यातना, कुटुंबीयांचा विरोध, देशासाठी केलेले त्याग आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी सामान्य माणसाने सहन केलेल्या असंख्य वेदना यावर दीर्घ चर्चा होत असे. या चर्चेतून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली—आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य सहज मिळालेले नाही. त्यामागे असंख्य कुटुंबांचे अश्रू, हजारो तरुणांचे तारुण्य, कारागृहातील यातना, आर्थिक हालअपेष्टा, सामाजिक बहिष्कार आणि असंख्य बलिदाने आहेत.
आज श्रीपत दलपत तेली (चौधरी) आणि शांता मावशी दोघेही हयात नाहीत. त्यांचा स्वर्गवास झाला असला तरी त्यांच्या कार्याच्या आठवणी शिंदाड गावात आजही जिवंत आहेत. त्यांनी स्वतःच्या मालकीची जमीन शाळेसाठी आणि मंदिरासाठी दान केली. समाजासाठी काहीतरी देण्याची वृत्ती त्यांनी केवळ शब्दांत ठेवली नाही, तर आपल्या कृतीतून दाखवून दिली. त्यांच्या दानातून आणि सामाजिक बांधिलकीतून उभे राहिलेले शैक्षणिक कार्य आज मोठ्या वटवृक्षाचे रूप धारण करताना दिसते.
शिंदाड येथील ‘समाज विकास विद्यालय’ हे त्याच विचारांचे जिवंत प्रतीक आहे. एकेकाळी लावलेले इवलेसे रोप आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. या शाळेच्या परिसरात उभारलेला स्वर्गीय स्वातंत्र्यसैनिक श्रीपत दलपत तेली (चौधरी) यांचा पुतळा विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आणि संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिकांसाठी प्रेरणास्थान म्हणून उभा आहे. तो केवळ दगड-मातीचा पुतळा नाही; तो त्याग, संघर्ष, देशप्रेम, शिक्षणप्रेम आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा जिवंत इतिहास आहे.
आज आपण स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करताना या पुतळ्याकडे पाहिले पाहिजे आणि स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे—ज्यांनी देशासाठी आपले वैवाहिक जीवन गमावले, नोकरी गमावली, तुरुंगवास भोगला आणि सुखसोयींचा त्याग केला, त्यांच्या बलिदानाची खरी किंमत आपण जाणतो का? स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण केवळ पुष्पहार अर्पण करण्यापुरते मर्यादित राहता कामा नये. त्यांच्या जीवनातून प्रामाणिकपणा, राष्ट्रनिष्ठा, सामाजिक बांधिलकी आणि देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा घेतली पाहिजे.
श्रीपत दलपत तेली (चौधरी) यांची कहाणी ही एका स्वातंत्र्यसैनिकाची चरित्रकहाणी नसून स्वातंत्र्याच्या किंमतीचा आरसा आहे. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उभे राहण्यासाठी त्यांनी स्वतःचे आयुष्य पणाला लावले; तुरुंगवास स्वीकारला; शिक्षकाची नोकरी गमावली; कौटुंबिक संबंध तुटले; संसार हिरावला गेला; तरी देशावरील प्रेम कमी झाले नाही. स्वातंत्र्यानंतर त्यांनी शेतीत प्रयोग केले, समाजासाठी जमीन दिली आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास संघर्षापासून समाजनिर्मितीपर्यंत पोहोचतो.
अशा त्यागी स्वातंत्र्यसैनिकांच्या आठवणी जतन करणे ही आजच्या पिढीची नैतिक जबाबदारी आहे. कारण १५ ऑगस्टला फडकणाऱ्या तिरंग्यात केवळ तीन रंग नाहीत; त्यात श्रीपत दलपत तेली यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाचा रंग आहे, त्यांच्या रक्ताची साक्ष आहे आणि त्यांच्या स्वप्नातील स्वतंत्र भारताची आशा आहे. त्यांच्या स्मृतीसमोर नतमस्तक होताना मनात एकच भावना उमटते—देश स्वतंत्र करण्यासाठी ज्यांनी स्वतःचे आयुष्य अर्पण केले, त्या महान त्यागी स्वातंत्र्यसैनिकांना शतशः नमन!





























