पाचोरा – शहरातील सिद्धिविनायक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे मतदानास प्रोत्साहन देण्यासाठी अनोखी मोहीम राबवली जात आहे. भडगाव येथील महाराणा प्रताप चौकात स्थित हे हॉस्पिटल, डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील आणि डॉ. ग्रिष्मा स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्वाखाली, विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करीत आहे.
दि. 21 ते 22 नोव्हेंबर 2024 या दोन दिवसाच्या कालावधीत आयोजित या शिबिरात बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
या तपासण्यांमध्ये छातीचा एक्स-रे, ईसीजी (कार्डियोग्राम), रक्तातील साखर, रक्तदाब तपासणी, तसेच आवश्यक त्या रक्त तपासण्यांचा समावेश आहे.
या सुविधांचा लाभ घेण्यासाठी मतदारांनी मतदान केल्याचे प्रमाण म्हणून बालकांसाठी पालकांच्या व स्वतःसाठी डाव्या हाताच्या बोटावरील शाईची खूण दाखवावी लागणार आहे. हा उपक्रम फक्त मतदान केलेल्या नागरिकांसाठी मर्यादित असून, त्यातून मतदानास प्रोत्साहन देण्याचा उद्देश आहे.
डॉ. स्वप्निल पाटील आणि डॉ. ग्रिष्मा पाटील यांच्या मते, “लोकशाहीची जपणूक करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. मतदानाद्वारे आपण आपले हक्क बजावतो आणि देशाच्या प्रगतीत योगदान देतो. मतदानाची टक्केवारी वाढावी आणि नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता मिळावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.” सिद्धिविनायक मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलने यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या वेळीही अशाच प्रकारची मोहीम राबवली होती, ज्याला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. त्या अनुभवावरूनच यंदा देखील मतदानास प्रोत्साहन देण्यासाठी हाच मार्ग अवलंबण्यात आला आहे. या उपक्रमाद्वारे स्थानिक नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होईल, तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. “सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.
नागरिकांनी मतदान करावे आणि आरोग्य तपासणीसाठी या सुविधांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन डॉ. पाटील दाम्पत्याने केले आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.