पाचोरा विधानसभा मतदारसंघातील बदलते राजकीय समीकरणात विजय कोणाचा ?

0

पाचोरा विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच राजकीय चढाओढीचा केंद्रबिंदू राहिला आहे. विविध जाती, समाज आणि त्यांच्या राजकीय निष्ठा यांचं गणित इथं नेहमीच निर्णायक ठरतं. यंदाच्या निवडणुकीत, मराठा समाजाने घेतलेल्या जागृतीमुळे आणि समाजातील बदललेल्या समीकरणामुळे, तसेच पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्याकडून झालेली शिवीगाळ & त्यांच्या समर्थकांनी केलेली मारहाण या विषयाला जवळजवळ सर्वच उमेदवारांनी प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवल्यामुळे मतदारसंघाचा इतिहास नव्यानं लिहिला जाण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाचा वाढता प्रभाव

पाचोरा विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे मतदार जवळपास १,४०,३२४ इतके आहेत. यापैकी अंदाजे १,१०,००० मते प्रभावी ठरतील, असा अंदाज आहे. मागील निवडणुकीत या समाजाचा प्रभाव मत विभागणीमुळे कमी प्रमाणात दिसून आला होता, मात्र यावेळी मराठा समाज अधिक जागृत झाला आहे. त्यांनी आपली ताकद निवडणुकीत दाखवण्याचा निर्धार केलेला दिसतो. विजयी उमेदवाराच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर झुकलेली ही मते यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात.

अमोलभाऊ शिंदे: प्रबळ दावेदार

मागील निवडणुकीत तब्बल ७२,००० मते मिळवून अल्प मताने पराभुत झालेले अमोलभाऊ शिंदे दुसऱ्या स्थानावर होते. यावेळी सतत संपर्क व त्यांच्या कामगिरीमुळे त्यांना जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला होता. यंदा, मराठा समाजाकडून त्यांना किमान ५०,००० मते मिळण्याची शक्यता आहे. यामुळे ते एक मजबूत उमेदवार म्हणून उभे राहिले आहेत. अमोलभाऊंच्या नेतृत्वगुणांवर आणि मतदारसंघातील प्रभावी उपस्थितीवर मराठा समाजाचा मोठा विश्वास आहे.

वैशालीताई सूर्यवंशी: महिला नेतृत्वाची ताकद

या निवडणुकीत खुद्दार शिवसेना गटाच्या वैशालीताई सूर्यवंशी या विजयाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. महिला उमेदवार असल्यामुळे त्यांना महिलांकडून विशेष पाठिंबा मिळत आहे. त्यांचे वडील, स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील, यांनी मतदारसंघाला १० वर्षे निष्कलंक नेतृत्व दिलं होतं. त्यावेळच्या त्यांच्या विकासकामांमुळे आजही मतदारसंघातील लोक तात्यासाहेबांना आदरानं आठवतात. याशिवाय, मुस्लीम आणि दलित समाजाने एकतर्फी वैशालीताईंना पाठिंबा दिलेला दिसत होता हे यंदाच्या निवडणुकीतील महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या घटकांमुळे त्यांची विजयाची शक्यता अधिक मजबूत झाली आहे. तसेच, मतदारसंघातील “पैसे घेणाऱ्या” घटकाने सर्व उमेदवारांकडून पैसे घेतले असले, तरी अंतिमतः मते कोणाला दिली, हे मतदारच जाणतात.

किशोर पाटील: अधोरेखित आव्हाने

दुसरीकडे, किशोर पाटील हे गेल्या निवडणुकीतील विजयी उमेदवार होते. त्यावेळी दिवंगत तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांची सहानुभूती आणि निर्मल सिड्ससारख्या स्थानिक उद्योगांचा पाठिंबा त्यांना मिळाला होता. शिवाय राजपूत समाजानेही एकजुटीने त्यांना साथ दिली होती. या सर्वांचा मिळून ३०,५०० मतांवर प्रभाव होता, जो यावेळी विभागलेला दिसतो.

शिवाय, मागील निवडणुकीत शिवसेना एकसंघ होती, त्यामुळे त्यांना सर्वसमावेशक पाठिंबा मिळाला होता. मात्र यावेळी शिवसेनेत फूट पडल्याने ‘खुद्दार’ आणि ‘गद्दार’ गटांमध्ये मते विभागली गेली आहेत. यामुळे त्यांची लोकप्रियता कमी होण्याची शक्यता आहे.

जनतेचा बदलता कल

किशोर पाटील यांच्या लोकाभिमुख स्वभावामुळे मागील निवडणुकीत सर्वसामान्य लोक त्यांच्यासोबत होते. मात्र यावेळी परिस्थिती बदललेली आहे. त्यांच्या मवाळ भाषेच्या जागी आक्रमक आणि अप्रिय वक्तव्ये आली आहेत. त्यांच्यावर गुंड प्रवृत्तीचे लोक सोबत असल्याचा आरोपही झाला आहे. खोक्यांमुळे आणि इतर विवादांमुळे जनतेत नाराजी पसरलेली दिसते.

स्व मुकुंदआण्णा यांची उणीव

या निवडणुकीतील सर्वांत मोठा बदल म्हणजे स्व मुकुंदआण्णा सारख्या दिलदार मित्राची अनुपस्थिती. खुल्या मनाचा आणि सर्वसमावेशक विचार करणाऱ्या या नेत्याची उणीव मतदारसंघाला मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यांनी नेहमीच शांततेत आणि सामंजस्याने निर्णय घेतले होते, त्यामुळे मतदारसंघात एकप्रकारचं स्थैर्य होतं.

शिवसेनेतील फूट: महत्त्वाचा घटक

शिवसेनेतील फूट हा या निवडणुकीतील प्रमुख मुद्दा आहे. खुद्दार आणि गद्दार असे दोन गट निर्माण झाल्यामुळे शिवसेनेचं पारंपरिक मताधिक्य विभागलेलं आहे. किशोर पाटील यांना याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे. या फूटीनं मतदारसंघातील राजकीय समीकरणं पूर्णतः बदलून टाकली आहेत.

मराठा समाजाचा एकजूट निर्धार

मराठा समाजातील वाढलेली जागरूकता यंदाच्या निवडणुकीतील निर्णायक मुद्दा ठरणार आहे. समाजातील विविध गटांनी आपल्या ताकदीचं भान ठेवत एका दिशेनं मतदान करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. यामुळे इतर समाजांनाही त्यांचा विचार करावा लागणार आहे.

पाचोरा विधानसभा मतदारसंघातील या निवडणुकीत प्रचलित समीकरणं बदलत असल्याचं चित्र आहे. अमोलभाऊ शिंदे यांची वाढती लोकप्रियता, वैशालीताई सूर्यवंशी यांचं प्रबळ महिला नेतृत्व, मराठा समाजाचा एकत्रित पाठिंबा, आणि शिवसेनेतील फूट यामुळे या निवडणुकीत नवा इतिहास घडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, किशोर पाटील यांना त्यांच्या कामगिरीसह बदललेल्या परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

ही निवडणूक फक्त उमेदवारांमधील लढाई नाही, तर पाचोरा मतदारसंघाच्या राजकीय समीकरणातील मोठ्या बदलांची नांदी ठरणार आहे. मतदारांची भूमिका आणि त्यांच्या निर्णयांचा परिणाम काय होईल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. परंतु परीवर्तन होणार हे निश्चित

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here