इतिहासाचे पुनर्लेखन म्हणजे सत्याचा शोध – डॉ. जयसिंगराव पवार

0

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सत्य इतिहासाचा शोध घेऊन जे पुनर्लेखन केलं जातं ते कायमचं टिकतं, असा विश्वास डॉ. जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केला. इतिहास संशोधक ‘मा. डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार’ यांना साहित्य व इतिहास संशोधनामध्ये दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरचे राज्यस्तरीय पारितोषिक प्रदान करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने देण्यात येणारे सन २०२४ चे राज्यस्तरीय पारितोषीक डॉ. जयसिंगराव भाऊसाहेब पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरदराव पवार यांच्या हस्ते स्वीकारले, त्यावेळी ते बोलत होते. यशवंतराव विचारांसाठी लढले. शाहू-फुलेंनी रुजविलेला सामाजिक समतेचा न्याय राज्यकारभार करताना अमलात आणावा असा विचार यशवंतरावांनी सांगितला. अत्याधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये चव्हाण साहेबांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते, असे ते पुढे म्हणाले. यशवंतराव इतिहासाचे जाणकार, अभ्यासक आणि भाष्यकारही असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

संभाजी राजांच्या हत्येनंतर मराठा साम्राज्य लयाला गेले पण थोड्याच काळात अनेक संताजी धनाजी उभे राहिले आणि जवळपास २६ वर्षे लढा देऊन पुन्हा राज्य उभे केले. असत्याविरुद्ध लढत राहाणं हा मराठ्यांचा स्थायीभाव असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. इथे मराठा हा शब्द जातीवाचक नसून गुणवाचक चैतन्यवाचक या अर्थाने आहे, असा खुलासा त्यांनी केला. महाराणी ताराबाई यांनी बलाढ्य असलेलेल्या औरंगजेबाशी सात वर्ष लढा दिला. जगाच्या इतिहासात असं उदाहरण बघायला मिळत नाही. अशा सामर्थ्यवान स्त्रीचं चरित्र लिहिण्याचं भाग्य लाभलं याचा अभिमान असल्याचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
 
शाहू महाराजांचं चरित्र देशात आणि परदेशात पोहोचविण्याचा प्रेरणाबिंदू शरद पवार आहेत असं ते म्हणाले. अनेक देशी आणि परदेशी भाषांमध्ये राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र भाषांतरित केले असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

डॉ. जयसिंगराव पवार यांनी इतिहासाच्या संशोधनातून इतिहासाचे वास्तविक चित्र जगासमोर मांडले, त्यांचे संशोधन नव्या पिढीसाठी मार्गदर्शक राहील, असे गौरवोद्गार चव्हाण सेंटरचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात काढले. यावेळी यशवंतराव चव्हाण यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाची त्यांनी माहिती दिली.

यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे दरवर्षी कृषी औद्योगिक समाज रचना, व्यवस्थापन प्रशासन, सामाजिक एकात्मता, विज्ञान-तंत्रज्ञान, ग्रामीण विकास, आर्थिक-सामाजिक विकास, मराठी साहित्य संस्कृती, कला, क्रीडा या क्षेत्रांपैकी कोणत्याही एका क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या व्यक्तीस किंवा संस्थेस हे पारितोषिक व स्मृतिचिन्ह देण्यात येते.

इतिहास म्हणजे फक्त सनावळ्या नव्हे तर त्या त्या वेळी घडलेल्या घटनांचे वास्तविक विवेचन असते असे विचार चव्हाण सेंटरचे उपाध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी आपल्या स्वागतपर भाषणात मांडले. सरचिटणीस हेमंत टकले यांनी डॉ. जयसिंगराव पवार यांना प्रदान करण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले.

यावेळी २०२४ चा ‘यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार’ही जाहीर करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी हा पुरस्कार विख्यात समाजसेवी दांपत्य डॉ. अभय आणि डॉ. राणी बंग यांना सामुदायिक आरोग्य संशोधन, विशेषत: आदिवासी क्षेत्रातील बालमृत्यू आणि बालरोग न्यूमोनिया नियंत्रित करण्यामध्ये दिलेल्या वैशिष्ट्यपूर्ण योगदानाबद्दल देण्यात येईल. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात, १२ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

सेंटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीप्ती नाखले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here