पाचोरा येथील १०० वर्ष परंपरा असलेला श्री दत्त जन्मोत्सव, पारायण आणि पालखी मिरवणुकीचा विशेष सोहळा

0

पाचोरा येथील श्री दत्त मंदिर संस्थान व सिनकर परिवाराच्या वतीने श्री दत्त जन्मोत्सव, पारायण प्रसाद व पालखी मिरवणुकीचा भव्य आणि भाविक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सर्व समाज बांधवांनी आणि भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जन्मोत्सवाचा कार्यक्रम:
श्री दत्त जन्मोत्सव मिती मार्गशीर्ष शुद्ध १४, शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० वाजता श्री दत्त मंदिरात साजरा होणार आहे. या पवित्र सोहळ्यात दत्त भक्तांनी सहभागी होऊन आपल्या श्रद्धेचे दर्शन घ्यावे.
पारायण प्रसाद कार्यक्रम: श्री दत्त पारायण प्रसादाचा कार्यक्रम मार्गशीर्ष पौर्णिमेच्या शुभदिनी, रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत संपन्न होणार आहे. या निमित्ताने प्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थित राहावे.
श्री दत्त पालखी मिरवणूक: श्री दत्त पालखी मिरवणूक ही रविवार, दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी रात्री ८.३० वाजता श्री दत्त मंदिर, वाणी गल्ली, पाचोरा येथून सुरू होईल. या मिरवणुकीत सहभागी होऊन आपला सहभाग नोंदवावा, ही विनंती आहे.
  भोजन व्यवस्था:श्री दत्त पारायण प्रसाद सोहळ्यानंतर रविवार, दि. १५ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी १२.०० ते २.०० या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
     स्थळ: श्री दत्त मंदिर, वाणी गल्ली, पाचोरा, जि. जळगाव.
  विश्वस्थ दत्त मंदिर संस्थान व सिनकर परिवार यांच्या संयोजनाखाली होणाऱ्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
   भाविक व समाज बांधवांसाठी ही पर्वणी असणार असून, या निमित्ताने एकत्र येऊन भक्तीमय वातावरणाचा आनंद घ्यावा. श्री दत्त मंदिर संस्थान व सिनकर परिवार आपले स्वागत करण्यासाठी तत्पर आहे.
    सर्वांना हार्दिक निमंत्रण! आयोजकांकडून करण्यात आले आहे
या संदर्भात ध्येय न्युज & साप्ता झुंज ने अधिक माहिती घेतली असता
   प्राचीन श्री दत्त मंदिर संस्थान, पाचोरा: ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा परिचय असा प्राप्त झाला
श्री दत्त मंदिर, पाचोरा हे जळगाव जिल्ह्यातील एक प्राचीन व ऐतिहासिक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. वाणी गल्लीतील विठ्ठल मंदिराशेजारी स्थित हे मंदिर पाचोरा शहरातील सर्वांत जुने व प्राचीन देवालय मानले जाते. शके १८४६ मध्ये बांधले गेलेले हे मंदिर त्या काळातील श्रीमंत वाणी कुटुंबीयांच्या उदारतेचा व श्रद्धेचा प्रतिक आहे.
कै. चिंतामण कृपारामशेठ वाणी यांच्या स्मरणार्थ कै. के. बळवंत इच्छारामशेठ व कै. शंकर इच्छारामशेठ वाणी यांनी हे मंदिर बांधून श्री दत्त चरणी अर्पण केले आहे. मंदिराच्या स्थापनेचा उल्लेख आजही मंदिरावरील शिलालेखातून पाहता येतो. मंदिराच्या वार्षिक खर्चासाठी कृष्णापुरी शिवारातील शेती (सर्वे नं. १२/१३) बहिरम नावाने दान करण्यात आली आहे.
       मंदिराचे स्थापत्य व वैशिष्ट्ये
श्री दत्त मंदिर हे स्थापत्यदृष्ट्या दगडी बांधकामाचा उत्कृष्ट नमुना आहे. संपूर्ण मंदिर चौकोनी आकाराचे असून घडीव दगडांनी बांधण्यात आले आहे. गाभाऱ्याच्या वरील भागावर भव्य व उंच कळस आहे, ज्यावर पूर्वी आकर्षक नक्षीकाम होते. मात्र, आधुनिक काळात त्यावर प्लास्टर केल्यामुळे नक्षीकाम लुप्त झाले आहे.
  मंदिरासमोर विस्तीर्ण ओटा आहे, ज्यावर सुमारे ५०० माणसे बसू शकतात. हा ओटा भजन, कीर्तन, व इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी नियमित वापरला जातो. मंदिराच्या आवारात भाविक, वाटसरू, व पदयात्री यांना विश्रांतीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते, ही परंपरा जुनी आहे.
धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम
श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम पार पडतात. त्यापैकी प्रमुख उत्सव रामनवमी, गोकुळाष्टमी, व दत्त जयंती आहेत. विशेषतः मार्गशीर्ष शुद्ध १५ रोजी होणाऱ्या दत्त जयंती उत्सवाला मोठे महत्त्व आहे.
दत्त जयंतीचा मुख्य सोहळा सायंकाळी ६ वाजता दत्त जन्मोत्सवाने सुरू होतो. यावेळी प्रवचन, कीर्तन, व भक्तिमय कार्यक्रम आयोजित केले जातात. दुसऱ्या दिवशी दत्त पारायण सोहळा संपन्न होतो, त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. रात्री श्री दत्त पालखी  वाजत गाजत मिरवणुक निघते
विशेष कार्यक्रम आणि यज्ञसोहळे
इ.स. १९७९ मध्ये, दत्त जयंती निमित्ताने श्री शतचंडी स्वाहा:कार यज्ञ सोहळा संपन्न झाला. हा सप्ताहभर चालणारा कार्यक्रम पाचोरा व आसपासच्या भाविकांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आळंदी येथील वे.शा.सं.१०८ श्री विष्णू ज्ञानेश्वर चक्रांकित महाराज यांच्या प्रवचनामुळे या कार्यक्रमाला अध्यात्मिक उंची प्राप्त झाली. यावेळी भगवान दत्तात्रेयाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक व लघुरुद्र सोहळा पार पडला, ज्याने भक्तांची मनोभावे पूजेसह श्रद्धा दृढ झाली. मंदिर व्यवस्थापन व देखभाल
श्री दत्त मंदिराची व्यवस्थापन व देखभाल श्री दत्त देवस्थान ट्रस्टद्वारे केली जाते. या ट्रस्टचे सदस्य म्हणजे श्री. भरत सिनकर, श्री. रत्नाकर सिनकर, व त्यांच्या कुटुंबीयांनी मंदिराची सेवा व व्यवस्था काळजीपूर्वक पार पाडली आहे. त्याचप्रमाणे, मंदिरातील पूजाअर्चा आणि धार्मिक विधींची जबाबदारी श्री. चंद्रकांत वसंत जोशी व त्यांच्या कुटुंबीयांवर आहे.
दररोजच्या धार्मिक क्रियाक्रमांत दत्तात्रेयास नैवेद्य, प्रसाद व आरतीचा समावेश होतो. भक्तांची उपस्थिती व भाविकांची श्रद्धा हे या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे.
   श्री दत्त मंदिराचे समाजातील स्थान
हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून पाचोरा शहरातील सामाजिक व सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वाटसरू व भाविकांसाठी विश्रांती, उपासनेचे केंद्र, व नियमित धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनामुळे हे मंदिर भक्तगणांसाठी महत्त्वाचे ठिकाण बनले आहे.
उपसंहार
श्री दत्त मंदिर, पाचोरा हे केवळ एक प्राचीन देवालय नाही तर इतिहास, धर्म, व सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे. मंदिराचा स्थापत्यशास्त्रातील कलात्मक नमुना, धार्मिक परंपरा, व श्रद्धेने परिपूर्ण वातावरण यामुळे ते भाविकांचे आकर्षण ठरले आहे.
या मंदिराची सेवा व देखभाल करणाऱ्या व्यक्तींचे योगदान, तसेच भाविकांच्या श्रद्धेमुळे श्री दत्त मंदिर हे अजूनही सन्मानपूर्वक उभे आहे. हे मंदिर भाविकांसाठी केवळ उपासनेचे ठिकाण नाही, तर सामाजिक ऐक्याचा व परंपरेचा स्त्रोत आहे. भाविक व इतिहासप्रेमींनी या मंदिराला नक्कीच भेट द्यावी, कारण हे ठिकाण श्रद्धा व इतिहास यांचे अनोखे दर्शन घडवते.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here