नागपूर, दि. 18:माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे तंत्रज्ञान अधिक माहिती सक्षम होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाच्या मर्यादा आता AI च्या साहाय्याने कमी होत आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेपासून दूर न राहता त्याचे तंत्रज्ञान समजून घेणे आणि आपल्या कामात त्याचा योग्य उपयोग करून घेणे ही आपली जबाबदारी आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी केले.नागपूर प्रेस क्लब आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर कार्यालयाच्या वतीने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ या विषयावर आयोजित व्याख्यानात श्री. ब्रिजेश सिंह बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार तथा माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे होते.कार्यक्रमाला नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे, माहिती संचालक किशोर गांगुर्डे, तसेच दयानंद कांबळे उपस्थित होते.
तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या कमी होत नाहीत, नवीन संधी निर्माण होतात – ब्रिजेश सिंह
श्री. ब्रिजेश सिंह यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, कोणतेही नवीन तंत्रज्ञान आले की नोकऱ्या कमी होण्याची भीती व्यक्त केली जाते. मात्र, तंत्रज्ञानामुळे नेहमीच नवीन संधी निर्माण होतात, याचा अनुभव आपण याआधीही घेतला आहे. AI च्या संदर्भातही अशी भीती व्यक्त होत आहे. मात्र, या तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग केला गेला नाही तर नोकऱ्या गमावण्याचा धोका अधिक आहे.
AI च्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीस गांभीर्याने पडताळून, तिचे नैतिक आणि संवैधानिक दृष्टिकोनातून परीक्षण करूनच वापरावे, असेही त्यांनी सुचवले.
भ्रमित संदेश आणि आर्थिक फसवणूक यापासून सावधगिरीची गरज
विविध समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे लोक चुकीच्या संदेशांना बळी पडत आहेत. यामुळे आर्थिक फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने सावधगिरीने AI चा उपयोग केला पाहिजे, असे सांगत श्री. ब्रिजेश सिंह यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करताना मानवतेच्या दृष्टीकोनातून संवेदनशीलता राखण्याचे महत्त्वही अधोरेखित केले.
AI च्या उपयोगासाठी पत्रकारांनी अधिक सक्षम होणे गरजेचे – राहुल पांडे
अध्यक्षीय भाषणात माजी राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे म्हणाले की, भारत विरोधी कृत्ये टाळण्यासाठी भारतीय पद्धतीने AI विकसित करणे गरजेचे आहे. मराठी भाषेलाही AI शी जोडून अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. पत्रकारांनी आपल्या गुणवत्तेसोबतच AI चा योग्य वापर करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागपूर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी केले. संचालन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक डॉ. गणेश मुळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माहिती संचालक दयानंद कांबळे यांनी मानले.
जळगावमधील पत्रकारांसाठी ऑनलाइन व्याख्यानाचा लाभ
जळगाव जिल्हा नियोजन कार्यालयात या व्याख्यानाचे ऑनलाइन प्रक्षेपण करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध पत्रकारांनी याचा लाभ घेतला. या व्याख्यानावर जळगावमधील प्रतिनिधींनी आपली मते मांडली.
प्रतिनिधींच्या प्रतिक्रिया
किशोर पाटील, जळगाव, ब्युरो, टी 9 मराठी:
“खूप छान व्याख्यान ऐकायला मिळाले. पत्रकारितेत कशा पद्धतीने बहुआयामी बदल होत आहेत आणि त्याला अनुसरून AI किंवा इतर सर्व या गोष्टी महत्वपूर्ण आहेत. त्या आत्मसात करण्याची गरज आहे. सरांचे मार्गदर्शन ऐकल्यावर आपण खरंच खूप मागे पडलो आहोत, असे जाणवले. काळासोबत राहण्यासाठी खूप मोलाचे मार्गदर्शन सरांकडून मिळाले. पत्रकारितेतील आणि त्याला अनुरूप तंत्रज्ञानातील होणारे बदल समजले. यासाठी वेळोवेळी अशा व्याख्यान आणि कार्यक्रमांची मोठी गरज आहे.”
गौरव राणे, मीडिया कर्मी, जळगाव:
“AI सोबत पत्रकारिता गेल्या दीड वर्षापासून अनुभवत आहे. जय महाराष्ट्र, टाईम्स नाऊ मराठी, News18 लोकल सोबत काम करत असताना AI चा नाव समोर आले. हळूहळू काही सॉफ्टवेअरच्या माध्यमातून काम शिकायला मिळाले. पण त्यापेक्षा AI खूप मोठे आहे! हे समजून घेऊन पत्रकारिता पुढे न्यावी लागेल. अनेक नवीन बाबी समजल्या, अर्थात पूर्ण बघू शकलो नाही, दिल्लीमध्ये असल्याने! पण सुंदर उपक्रम! धन्यवाद नव्या माहितीसाठी.”
मोहन दुबे, रिपोर्टर, News Nation/NEWS स्टेट महाराष्ट्र, जळगाव:
“खरं तर आजकाल पत्रकारितेची व्याख्या दिवसेंदिवस बदलत आहे. अशातच आता AI पद्धती येऊ घातल्या आहेत. नवीन तंत्रज्ञानासोबत पत्रकारिता करणे म्हणजे एक आव्हानच आहे. तंत्रज्ञानाशी जुळवून घेत येणाऱ्या काळात पत्रकारिता कशी करावी हे या व्याख्यानातून अवगत झाले. असे व्याख्यान होणे फार महत्त्वाचे आहे, ज्यामुळे आताच्या नवीन पिढीतील तरुणांना आणि पत्रकारांना योग्य ते मार्गदर्शन मिळेल. आपल्यातील पत्रकार जिवंत ठेवायचा असेल तर तंत्रज्ञानाला सोबत घेऊन योग्य ती माहिती मिळवून पत्रकारिता केलेली बरी.”
विजय पाठक, फ्री प्रेस जर्नल, जळगाव:
“आज तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा विषय सध्या चर्चेत आहे. विविध क्षेत्रांत याचा उपयोग केला जात आहे. पत्रकारिता क्षेत्रातदेखील या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर व्हायला सुरुवात झाली आहे. विषय तसा अत्यंत क्लिष्ट, पण अत्यंत सोप्या पद्धतीने ब्रिजेश सिंह साहेबांनी पत्रकारितेत याचा कसा वापर करायचा हे समजावले. एक चांगले भाषण ऐकण्याचा आज आनंद मिळाला. याच्यातून विषय कठीण नाही, तर सोपा आहे, हे लक्षात आले. धन्यवाद!”
नरेंद्र पाटील, दै. पुढारी, प्रतिनिधी, जळगाव:
“AI विषयक सरांचे मार्गदर्शन ऐकले. ऐकून खूप काही माहिती मिळाली. महत्त्वाचे म्हणजे आपण जे उच्चार करतो त्यामधून गूगल सर्च आपली प्रतिमा बनवून आपल्याला हवी तशी माहिती देते. म्हणजे आपल्या उच्चारांवर किती चांगला भर द्यावा, हे समजले. दुसरी गोष्ट, AI ची माहिती पडताळून घ्यावी, जसे 300 किंवा 1000 वर्षांपूर्वीची पुस्तके गूगलवर दिसतात, पण त्यांची सत्यताही पडताळून पाहावी, असे सरांनी सांगितले. आपल्या भाषेतून काही माहिती ट्रान्सलेट करावी, तिचा योग्य उपयोग कसा करावा, याचे मार्गदर्शन मिळाले. अनेक टूल्स समजले व त्यांचा उपयोग कसा करावा हे शिकायला मिळाले.”
मनोज बारी, आवृत्ती प्रमुख, देशोन्नती, जळगाव:
“आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन जर्नालिझम’ या विषयावर ब्रिजेश सिंह यांचे अप्रतिम व्याख्यान अल्पकाळ असल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे एकत्र बघता आले. भविष्यकाळ AI चाच आहे, असे एकंदरीत चित्र आहे. सर्व पत्रकारांनी हे तंत्रज्ञान आत्मसात करणे देखील गरजेचे आहे. पुढील व्याख्यानाला नक्कीच पूर्णवेळ उपस्थित राहू. धन्यवाद जिमाका जळगाव.”
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.