होळीच्या अग्नीत सामाजिक दुर्गंधीचा अंत- संदीप महाजन

0

भारतीय संस्कृती ही सण-उत्सवांनी समृद्ध आहे. होळी हा त्यातील एक अत्यंत रंगीबेरंगी, उत्साही, पण त्याचवेळी अर्थपूर्ण असा सण आहे. होळी केवळ रंगांचा उत्सव नसून, तो असतो वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाचा विजय साजरा करण्याचा. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही होळी आपल्याकडे रंग आणि उर्जेचा झंकार घेऊन येत आहे. पण या वर्षी आपण या उत्सवाकडे केवळ रंगाच्या डबक्यातून नव्हे, तर वैचारिक परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून पाहूया का?
या वर्षीच्या होळीच्या निमित्ताने आपण

प्रत्येकाने काहीतरी वेगळं संकल्प करायचं आहे. फक्त रंग उधळायचे नाहीत, तर आपल्यातील काही नकारात्मक विचार, भावना, दृष्टिकोन, आचरण – यांचं दहन करायचं आहे.
जसे कोणीतरी म्हणाले,
“जमा करतोय आज तिरस्काराची लाकडं, मत्सराच्या गोवऱ्या, हेव्या-दाव्याचं गवत… होळीत दहन करायचं आहे, ज्वाला गगनास भिडवायच्या आहे..”
हा विचार एकट्या व्यक्तीचा न राहता, संपूर्ण समाजाचा झाला, तर खऱ्या अर्थाने होळीच्या अग्नीत होईल वाईट प्रवृत्तींचं समूळ उच्चाटन.
होळीचा सण प्राचीन काळापासून वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचं प्रतीक मानला जातो. होलिका दहन ही त्या दृष्टीने प्रेरणादायी परंपरा आहे. हिरण्यकश्यपूच्या दहशतीच्या विरोधात प्रल्हादाच्या श्रद्धेचा विजय, हा केवळ धार्मिक मिथक नाही, तो आजही समाजाच्या विविध अंगांना लागू पडणारा संदेश आहे. आजचा हिरण्यकश्यपू म्हणजे भ्रष्टाचार, मत्सर, जातीयवाद, दहशतवाद, विषमतावाद व सामाजिक विषमता. यांचं समूळ उच्चाटन करायचं असेल, तर आपण प्रत्येकाने प्रल्हादासारखी श्रद्धा, मूल्यनिष्ठा आणि संयम बाळगायला हवा.
होळीमध्ये आपण सर्व रंग एकत्र उधळतो — काळा, पांढरा, लाल, भगवा, निळा, हिरवा… हे फक्त रंग नसून विविध समाजघटकांचे प्रतिनिधी आहेत. एका रंगालाही वगळलं जात नाही — तसंच समाजातही कोणत्याही जाती, धर्म, वर्ग, समुदायाला वगळलं जाऊ नये.
आपण सारे या रंगांच्या संगमातून निर्माण झालेला मानवतावादाचा इंद्रधनुष्य आहोत. हे जाणवून घेणं हीच खरी आजच्या होळीची गरज आहे. “झाकायची आहे त्याच रंगात.. जात, धर्म, कर्म, अन् बरचस काही.. फक्त माणूस कळला पाहिजे, इतकीच सरळ अन् साधी मागणी आहे..”
हा संदेश केवळ काव्यात्मक न राहता वैचारिक परिवर्तनाचा आधार व्हायला हवा.
आजच्या समाजात आपण अनेक प्रश्नांनी ग्रस्त आहोत — भ्रष्टाचार, गरिबी, असमानता, अशिक्षा, अस्वच्छता, दहशतवाद, कट्टरवाद आणि मानसिक दुटप्पीपणा. होळीच्या अग्नीत या सर्वांचा नाश करण्याचा संकल्प करायला हवा. जर प्रत्येक नागरिक आपल्या मनातील एक तरी नकारात्मक भावना या अग्नीत अर्पण करेल, तर हे देश आणि समाजासाठी एक नवजीवन ठरेल. शुद्धीकरण केवळ शरीराचं नाही, तर विचारांचं, मनाचं आणि समाजाचं असावं — हीच होळीची खरी प्रेरणा ठरू शकते.
आपण रंग उधळतो, पण समाजात आजही काही रंग कायम ‘गळपटलेले’ आहेत — गरीब, वंचित, शोषित, दुर्लक्षित घटक आजही रंगीबेरंगी उत्सवांपासून कोसो दूर आहेत. त्यांच्या आयुष्यात आनंदाचे रंग पोचवणं ही आपल्या सणांची खरी पूर्तता आहे.
होळी साजरी करताना आपण फक्त आपल्या घरापुरता विचार न करता, गरजूंना रंग, मिठाई, प्रेम आणि स्नेहाचा वाटा दिला पाहिजे. कोणीतरी यथार्थ लिहिलं आहे — “होळी ही केवळ रंगांची नव्हे, तर मनांतील दुराव्यांच्या भिंती रंगवण्याची वेळ असते.”
सण-उत्सव ही केवळ मौजमजा नाही, ती मूल्यसंस्कारांची परंपरा आहे. आजची पिढी जेव्हा या सणांचे फक्त ‘फेस्टिव्ह सेलिब्रेशन’ म्हणून डिजिटल पोस्टमध्ये फोटो टाकते, तेव्हा त्या मागे असलेला भावनिक व सांस्कृतिक वारसा कुठे हरवतोय असं वाटतं.
आपल्याला पुढच्या पिढीसाठी केवळ उत्सव नव्हे, तर त्यामागचा आशय, विचार आणि सामाजिक संदेशही पोहोचवावा लागेल. होळीच्या निमित्ताने आपल्या मुलांना, विद्यार्थ्यांना ‘सामाजिक समरसता’, ‘सांस्कृतिक एकात्मता’ आणि ‘मूल्याधिष्ठित जीवन’ यांचे धडे दिले पाहिजेत
होळी केवळ समाजिकदृष्ट्या नव्हे, तर वैयक्तिकदृष्ट्याही एक सुवर्णसंधी आहे. आपण आपल्या मनात दडलेली नकारात्मकता, द्वेष, अपमान, कटुता, सूडबुद्धी, तुलना, मत्सर — याचंही दहन या निमित्ताने केलं पाहिजे.
एक शुद्ध, समजूतदार, संयमी व्यक्तिमत्व घडवणं ही आपल्या जीवनाची प्राथमिक जबाबदारी आहे. आपण बदललो तरच समाज बदलेल. प्रत्येकाने आपल्या जीवनात सकारात्मकतेचा रंग उधळण्याची सुरुवात केली, तर एक नवं सामाजिक चित्र साकार होईल.
सणांच्या माध्यमातून समाजातील समस्यांवर भाष्य करणं ही फक्त लेखकांची जबाबदारी नाही, तर राजकीय, सामाजिक, शैक्षणिक नेतृत्वानेदेखील त्यात सक्रिय सहभाग घ्यायला हवा.
सणांचा राजकारणासाठी उपयोग न करता, समाजजागृतीसाठी केला गेला, तर देश घडेल. ‘होळीच्या दहना’त राजकारणातील फूट, लोकांना भडकवणारी भाषा, सामाजिक विद्वेष, जातीयवाद, खोटं प्रस्थापित करणारी प्रचारयंत्रणा – यांचंही उच्चाटन झालं पाहिजे. “होळीच्या पवित्र अग्निमध्ये भ्रष्टाचार, गरीबी, निरक्षरता, अस्वच्छता आणि दहशतवाद, कट्टरवाद, दुटप्पीपणा यांचे दहन होवो, अणि सर्वांना आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो..”
या इच्छेने आपण ही होळी एक नवसंकल्प म्हणून साजरी करूया.
सण असतो आनंदाचा, पण तो आनंद केवळ क्षणिक नसून, दीर्घकालीन सामाजिक परिवर्तनाचा स्त्रोत ठरावा.
आणखी काय हवे?
थोडी सहानुभूती, थोडा समंजसपणा, थोडं विवेकाचं गवत आणि सत्यतेची ज्योत.
या होळीच्या निमित्ताने फक्त रंग उधळू नका, तर विचारही उधळा… प्रेमाचे, समतेचे, सौहार्दाचे!
झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजच्या सर्व वाचकांना होळी आणि धुलीवंदनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here