पाचोरा – शहरातील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि CG Nephrocare & Dialysis Center यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या मोफत डायलेसिस सेंटरचे उद्घाटन रविवार, ६ जुलै २०२५ रोजी पाचोरा सेंट्रल येथील APMC कंपाउंडमधील पहिल्या मजल्यावर दुपारी ३ वाजता उत्साहात व भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या उद्घाटन पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या हस्ते या सेवाभावी आरोग्य उपक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी उपस्थित राहून संस्थेच्या कार्याची स्तुती केली. विघ्नहर्ता हॉस्पिटल व CG Nephrocare यांच्या वतीने सुरू करण्यात आलेले हे डायलेसिस सेंटर पाचोरा तालुक्यातील एकमेव आणि सर्वाधिक सुविधा असलेले केंद्र असून ते संपूर्णपणे मोफत आहे. अत्याधुनिक यंत्रणा, अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ आणि २४ तास तत्काळ सेवा या केंद्रात उपलब्ध करण्यात आली आहे. त्यामुळे मूत्रपिंड विकारांनी त्रस्त रुग्णांना आता मुंबई, पुणे, नाशिक किंवा औरंगाबाद सारख्या शहरांत जाण्याची गरज राहिलेली नाही. या कार्यक्रमाला पाचोरा शहर व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने कार्यक्रमाची शान वाढवली. विविध सामाजिक संस्था, महिला बचतगट, डॉक्टर्स, पत्रकार, नगरसेवक, व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची उपस्थिती उत्स्फूर्त आणि भावनिक होती. उपस्थित सर्वांना या डायलेसिस सेंटरची सविस्तर माहिती देण्यात आली. उद्घाटनानंतर डायलेसिस तज्ज्ञांच्या उपस्थितीत एक विशेष मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये पाचोरा आणि परिसरातील ५० पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. मधुमेह, उच्च रक्तदाब, किडनीचे विकार, मूत्रपिंडाच्या कार्यक्षमतेसंबंधी तपासण्या आणि सल्ला यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरात रुग्णांना योग्य आहार, जीवनशैली, औषधोपचार पद्धती यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. “रक्तदाब आणि साखरेवर नियंत्रण ठेवल्यास किडनीसारख्या महत्त्वाच्या अवयवाचे संरक्षण होऊ शकते” असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी यावेळी व्यक्त केले. CG Nephrocare & Dialysis Center ही संस्था देशभरात आरोग्य सेवेत अग्रेसर असून, त्यांनी अनेक राज्यांमध्ये दर्जेदार डायलेसिस सेवा सुरू केली आहे. आता पाचोरा शहरात त्यांनी अत्याधुनिक सुविधा आणि जागतिक दर्जाची सेवा पोहोचवली आहे, ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे. या संस्थेने उपलब्ध करून दिलेल्या सुविधेमुळे ग्रामीण भागातील रुग्णांनाही शहरी भागासारख्या सुविधा मिळणार आहेत. या प्रसंगी बोलताना आमदार किशोर आप्पा पाटील यांनी विघ्नहर्ता हॉस्पिटल व CG Nephrocare यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “स्वतःला आरोग्यसेवेसाठी वाहून घेतलेल्या डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत हे सेंटर सुरू करून गरजूंसाठी खऱ्या अर्थाने पाचोरा शहरात आणखी एक वरदान निर्माण केले आहे. ही केवळ वैद्यकीय सुविधा नसून गरिबांसाठी दिलासा देणारी एक आशा आहे.” त्यांनी केंद्र शासनाच्या ‘आयुष्मान भारत’ योजनेंतर्गत ग्रामीण भागात अशी केंद्रं उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली. “आरोग्याची काळजी घेणं म्हणजे कुटुंब, समाज आणि राष्ट्राची सेवा करणं,” असेही त्यांनी स्पष्ट केले. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी आपल्या भाषणात सांगितले, “गावागावातून रुग्ण मोठ्या शहरांमध्ये प्रवास करत असतात. त्यात वेळ, पैसा, आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो. पण विघ्नहर्ता हॉस्पिटलने हे सगळं पाचोऱ्याच्या दारात आणलं आहे. हे आरोग्यदूतच आहेत.” त्यांनी रुग्णांच्या भावना समजून घेत, समाजहिताची दृष्टी ठेवून केलेल्या कार्याची प्रशंसा केली. या उद्घाटन सोहळ्याला काही कारणास्तव संजयदादा गरुड उपस्थित नव्हते मात्र ते संस्थेच्या परिवारातील ज्येष्ठ आणि पूजनीय सदस्य आहेत, म्हणून त्यांच्या शुभाशीर्वादांचे महत्त्व कार्यक्रमात अधोरेखित करण्यात आले. विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या तर्फे बोलताना व्यवस्थापनाने सांगितले की, “आरोग्य हीच खरी सेवा या तत्त्वाला अनुसरूनच आम्ही हे केंद्र उभारले आहे. गरीब, गरजू व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आरोग्यसेवा परवडणारी व्हावी यासाठी आमचा प्रयत्न असतो.” संस्थेच्या वतीने पुढेही अशी सामाजिक सेवा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. उद्घाटन सोहळ्यापासून ते तपासणी शिबिरापर्यंत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा विशेष उल्लेखनीय ठरला. रुग्णांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या प्रतिक्रिया अतिशय सकारात्मक होत्या. “माझे वडील दर आठवड्याला बाहेरगावी डायलेसिससाठी जात होते. आता घराजवळच मोफत सुविधा मिळाल्याने आमच्यावरचा खर्च आणि मानसिक त्रास खूपच कमी होईल,” असे एका रुग्णाच्या मुलाने सांगितले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या डॉक्टर, नर्सेस, स्टाफ, व्यवस्थापन आणि CG Nephrocare टीमने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे व्यवस्थापन, स्वागत, माहिती सेवा, तपासणी शिबिराचे आयोजन इत्यादी साऱ्याच बाबतीत उत्कृष्ट समन्वय दिसून आला. या डायलेसिस सेंटरबाबत अधिक माहितीसाठी आणि लाभ घेण्यासाठी नागरिकांनी 9529428691 किंवा 9096545920 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, www.cgnephrocare.com या वेबसाइटवरूनही सर्व तपशील मिळू शकतो. विघ्नहर्ता हॉस्पिटल आणि CG Nephrocare यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेले मोफत डायलेसिस सेंटर ही केवळ वैद्यकीय सुविधा नसून ती सामाजिक बांधिलकीचा आणि मानवतेच्या सेवेचा आदर्श ठरली आहे. पाचोरा शहरातील गरजूंना आता आपल्या गावातच उपचार मिळणार असल्यामुळे त्यांच्यासाठी ही सेवा एक वरदान ठरणार आहे. असेही प्रास्ताविकात डॉ सागरदादा गरुड यांनी बोलताना सांगितले “सेवा परमो धर्म:” या मूल्याची जाणीव या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली असून, पाचोऱ्याच्या आरोग्य क्षेत्रातील ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.