पत्रकारांवरील हल्ल्याला न्यायाची झुंज : संदीप महाजन यांच्या संघर्षाला न्यायालयीन मान्यता, जिल्ह्यातील पहिल्या प्रकरणाची नोंद

0

Loading

भडगाव – तालुक्यातील गोंडगाव घेथे येथील एका निरागस बालिकेच्या अत्याचारानंतर निर्घृण हत्येने संपूर्ण जिल्हा हादरून गेला. या प्रकरणात आरोपीवर जलद आणि कठोर कारवाई व्हावी म्हणून सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने 4 ऑगस्ट 2024 रोजी भडगाव तहसील कार्यालयावर भव्य मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या मोर्चाची प्रमुख मागणी होती की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा आणि सरकार पक्षातर्फे सुप्रसिद्ध फौजदारी वकील अँड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी. मात्र या आंदोलनानंतरही कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. याबाबत झुंज वृत्तपत्राचे व ‘ध्येय न्यूज’चे संपादक संदीप महाजन यांनी बातमी प्रकाशित करत बातमीच्या शीर्षकात वापरलेल्या ‘मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी’ या शब्दामुळे विद्यमान आमदार किशोरआप्पा पाटील यांनी चिडून त्या रात्री 8.30 वाजता संदीप महाजन यांना फोन करून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर त्यांनी स्वतः ही शिवीगाळ केल्याचे नंतर प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर मान्य केले आणि “होय, रेकॉर्डिंग माझेच आहे” असे जाहीर वक्तव्य दिले.
संदीप महाजन यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या ‘कै. स्वातंत्र्यसैनिक आण्णासाहेब दामोदर लोटन महाजन चौकात’ त्यांच्यावर 9 ऑगस्ट 2024 रोजी हल्ला करण्यात आला. तोंडावर रूमाल टाकून त्यांना गाडीवरून खाली पाडण्यात आले व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याचा थरकापजनक व्हिडीओ काही वेळातच अजय जैस्वाल (कुरंगी) या व्यक्तीने स्वतःच्या वॉट्सऍप ग्रुपवर प्रसारित केला. व चॅटींग या मारहाणीची तक्रार दिल्यानंतरसुद्धा पोलिसांनी गंभीर गुन्हा दाखल न करता केवळ एनसी (नॉन कॉग्निझेबल) दाखल केली व आरोपींना भादंवि कलम 107 अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करून मुक्त केले.
विशेष बाब म्हणजे या हल्ल्यातील आरोपी शरद युवराज पाटील व सुमित रविंद्र सावंत यांच्या विरोधात आधीपासूनच पाचोरा आणि जळगाव न्यायालयांमध्ये गुन्ह्यांसंदर्भातील एनबीडब्ल्यू म्हणजेच नॉन बॅलेबल वॉरंट्स प्रलंबित होते. परंतु तरीही पोलिसांनी दुर्लक्ष केले. अखेर संदीप महाजन यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर (औरंगाबाद ) खंडपीठात क्रिमिनल रिट पिटीशन क्रमांक 1422/2023 दाखल केली. यात संदीप महाजन यांना मा. उच्च न्यायालयाने दिलासा देत यासंबंधी नोटीस काढली. तर दुसऱ्या मुद्द्यावर “कलम 156 (3) अन्वये कनिष्ठ न्यायालयात संधी उपलब्ध आहे” असा निर्देश दिला.
यास अनुसरून संदीप महाजन यांनी भारतीय दंड संहिता कलम 156 (3) नुसार पाचोरा न्यायालयात अर्ज दाखल केला. हा अर्ज नामंजूर करण्यात आला. तरीही त्यांनी हार न मानता जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात क्रि. रे. अपील क्रमांक 31/2024 या क्रमांकाने अपील दाखल केला. सदर अपील प्रकरण सत्र न्यायाधीश आर. एस. पवार यांच्या समोर सुनावणीस आले. दोन्ही पक्षांचे युक्तिवाद ऐकून 14 नोव्हेंबर 2024 रोजी निकाल देण्यात आला. या निकालात मा. सत्र न्यायालयाने स्पष्ट आदेश दिला की विद्यमान आमदार किशोर धनसिंग पाटील, अजयकुमार देविदास जैस्वाल (कुरंगी), शरद युवराज पाटील, शिंदे गटाचे शिवसेना शहरप्रमुख सुमित रविंद्र सावंत आणि चरणसिंग प्रेमसिंग पाटील (वडगाव सती, ता. भडगाव) यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 323 (मारहाण), 504 (उत्तेजक व अपमानकारक शब्द), 506 (जीव घेण्याची धमकी), 120 (ब) (कट रचणे), 34 (सामूहिक हेतू) आणि “प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य व मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध)” अधिनियम 2017 चे कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा.
या निर्णयाच्या आधारे पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन सदरचा तपास डीवायएसपी धनंजय वेरूळे यांनी पूर्ण करून अजय जैस्वाल, शरद पाटील, सुमित सावंत आणि चरणसिंग पाटील यांच्या विरोधात आरोपपत्र ठेवत मा. न्यायालयात चार्जशीट दाखल केले. मात्र आमदार किशोरआप्पा पाटील यांचा अर्ज सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या छ.संभाजीनगर (औरंगाबाद ) खंडपीठात प्रलंबित असल्यामुळे त्यांची चौकशी थांबवण्यात आली आहे. अन्य आरोपींविरुद्ध कोर्टात आरोपपत्र दाखल झाले. ही जळगाव जिल्ह्यातील पहिली केस आहे जी पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. एवढेच नव्हे तर ‘चार्जशीट’सुद्धा सरकारच्या नवीन तपास यंत्रणेनुसार करण्यात आलेली ही पहिली घटना ठरली आहे. या संपूर्ण लढ्यात अर्जदार संदीप महाजन यांच्यावतीने विविध न्यायालयीन स्तरांवर प्रतिष्ठित वकिलांनी काम पाहिले. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात अॅड. परेश आर. पाटील (मो. 8625034444) यांनी प्रभावी कामगिरी बजावली, तर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅड. मंगला वाघे (मुंबई) आणि अॅड. हर्षल रणधिर (मो. 9766399885) यांनी महत्त्वाची भूमिका बजावत पत्रकार महाजन यांच्या न्याय हक्कासाठी ठोस पावले उचलली. याशिवाय, या प्रकरणात मुंबई प्रेस क्लब तर्फेही महाजन यांना विनामूल्य न्यायालयीन सहकार्य करण्यात आले. या सहकार्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार व अॅड. ए. के. जैन, ज्येष्ठ पत्रकार गीता मॅडम , आणि अॅड. मंगला वाघे यांनी कायदेशीर मार्गदर्शन करून या लढ्यात खंबीर पाठबळ दिले. ही संपूर्ण घटना केवळ एका पत्रकारावर झालेला हल्ला नसून, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे. या लढ्याने केवळ पत्रकार संदीप महाजन यांना न्याय मिळवून दिला नाही, तर महाराष्ट्रातील पत्रकार क्षेत्रात एक ऐतिहासिक आदर्श निर्माण केला. अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या पत्रकारांसाठी ही घटना एक प्रेरणास्त्रोत ठरणारी आहे. यासाठी मुंबई सह देशभरातील तब्बल 16 स्वाभिमानी व खुद्दार पत्रकार संघटना एकत्रित येऊन पाठीशी उभ्या राहिल्या.
पत्रकार संदीप महाजन यांची प्रतिक्रिया :
“मी पत्रकार म्हणून गेल्या 35 वर्षांपासून जनतेच्या प्रश्नांना आवाज देण्याचे कार्य करत आलो आहे. गोंडगाव येथे घडलेल्या बालिकेवरील अमानुष अत्याचारानंतर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या दुर्लक्षावर मी बातमी प्रकाशित केली, यामुळेच माझ्यावर राजकीय पातळीवर संताप व्यक्त करत अपमानास्पद भाषेचा वापर करण्यात आला आणि नंतर माझ्यावर शारीरिक हल्ला देखील झाला. हा केवळ माझ्यावरचा नाही, तर संपूर्ण पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरचा हल्ला होता.
माझा उद्देश कुणावरही व्यक्तिगत टीका करणे नव्हता, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेकडे समाजाचे लक्ष वेधणे हा होता. पण जेव्हा सत्तेच्या बळावर विरोधाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा न्यायालय हा शेवटचा आणि सर्वोच्च आधार उरतो. मी न्यायसंस्थेवर विश्वास ठेवून लढा दिला आणि आज मला समाधान वाटते की माझ्या संघर्षाला न्यायालयीन आधार मिळाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पत्रकार संरक्षण कायद्यानुसार नोंदवलेला हा पहिलाच गुन्हा असून, यामुळे इतर पत्रकार बांधवांनाही दिशा मिळेल अशी आशा आहे. हा लढा वैयक्तिक नव्हता, तर हा संघर्ष होता पत्रकारांच्या हक्कांचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि लोकशाही मूल्यांचा.
या लढ्यात माझ्या पाठीशी उभ्या राहिलेल्या राज्यातील आणि जिल्ह्यातील तब्बल १६ पत्रकार संघटनांप्रती तसेच मुंबई प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ आणि माझ्या कायदेशीर लढ्यात साथ देणाऱ्या अॅड. परेश आर. पाटील (मो. 8625034444), अॅड. मंगला वाघे (मुंबई), अॅड. हर्षल रणधिर (मो. 9766399885), अॅड. ए. के. जैन आणि अॅड. गीता मॅडम यांच्यासह ज्या ज्ञात – अज्ञात व्यक्तींनी मला प्रत्यक्ष – अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांचे मी मन:पूर्वक आभार मानतो.
या निकालामुळे कुठलाही पत्रकार दबाव, धमकी वा हल्ल्यांमुळे गप्प बसणार नाही, हे ठामपणे सिद्ध झाले आहे. यापुढेही मी अन्यायाविरुद्ध आणि सत्यासाठी निःपक्षपाती पत्रकारिता करत राहीन. हा विजय केवळ माझा नाही, तर संपूर्ण चौथा स्तंभ आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here