![]()
पाचोरा – हल्लीच्या यांत्रिक आणि स्पर्धात्मक जीवनशैलीत, अनेकदा आपल्याला अशी उदाहरणं पाहायला मिळतात की जिथे मुलं वडिलांच्या कमाईला हक्क समजतात आणि त्यांच्या कष्टांमागील किंमत जाणून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. मात्र, या आधुनिक जगात आजही काही अशी कुटुंबं आहेत, जिथे संस्कार, कष्टाची जाणीव आणि जबाबदारी या मूल्यांचा प्रकाश झळाळत आहे. याचं एक प्रत्ययकारी उदाहरण नुकतेच एका साध्या, परंतु मनाने मोठ्या ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकाबाबत पाहायला मिळाले.काल, एका अत्यावश्यक कामाच्या निमित्ताने स्थानिक पातळीवर कार्यरत असलेल्या छ शिवाजी नगर भागातील रहिवासी ड्रायव्हिंग स्कूलचे मालक अनिल नागणे यांच्याशी भेट झाली. पहिल्या भेटीतच त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रामाणिक हसू, कामाप्रती असणारी निष्ठा आणि जीवनात स्थैर्य मिळवण्यासाठी केलेले कष्ट नजरेत भरले. त्यांचं काम हे व्यवसाय म्हणून असलं तरी, तो त्यांच्यासाठी पोटाची खळगी भरण्याचा एकमेव साधन होता. हे पाहून लक्षात आलं की, हा माणूस नावाने व्यवसायिक असला तरी मनाने एक संघर्षशील पिता, ज्या वडिलांनी आपल्या लेकरांसाठी स्वप्न उराशी बाळगली आहेत.चहाच्या कपासोबत सुरू झालेली सौम्य चर्चा हळूहळू खोलवर जाऊ लागली. आपली दोन्ही मुलं उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी बी.टेक आणि NEET ची तयारी करत असल्याचे त्यांनी सांगितले. बोलता बोलता ते म्हणाले, “मी स्वतःच्या हाताने गिअर बदलत कार शिकवतो, पण माझी मुलं याच गिअरवर चढून पुढे जावीत म्हणून प्रयत्न करतो.” त्या वाक्यातील अभिमान आणि आशेचा सूर अजूनही मनात घुमतोय.
तेवढ्यात त्यांचा मोबाईल वाजला. त्यांच्या मोठ्या मुलाचा फोन होता. काही साधी चौकशी केल्यानंतर वडिलांनी विचारले, “काय करतोयस बेटा?” त्यावर मुलाने उत्तर दिलं, “पप्पा, आज रविवार आहे म्हणून मी रूमवरच आहे. माझे सगळे मित्र थिएटरला चित्रपट पाहायला गेलेत.” यावर वडिलांनी हसत विचारलं, “मग तू का नाही गेलास?” मुलाचं उत्तर ऐकून क्षणभर गप्प झालो…
“पप्पा, त्या सिनेमा थिएटरचं तिकीट साडेतीनशे रुपये होतं. मला वाटलं, त्या पैशात दोन दिवसाचं जेवण निघेल, म्हणून मी रूमवरच राहिलो.”
हे उत्तर केवळ संवाद नव्हता, तो एक जीवनमूल्यांचा आरसा होता. अशा काळात जिथे वडिलांच्या घामातून आलेल्या पैशाचा मुलं बेधडक उधळपट्टीसाठी उपयोग करतात, बाईकचे सायलेन्सर फोडतात, ब्रँडेड शूज-टीशर्ट घालतात, त्याच जगात हा मुलगा साडे तिनशे रुपयांची किंमत पोटभर जेवणाशी करतो, हे नुसतं ऐकूनही अंगावर काटा आला.
त्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी होतं. ते सांगत होते, “मी आयुष्यभर शिकू शकलो नाही, पण माझी मुलं शिकून आपल्याच बापाचं आयुष्य बदलणार, एवढंच स्वप्न आहे.” ते शब्द मनात घुसले. आजही काही बाप आपल्या मुलांच्या भविष्यासाठी स्वतःचा संसार दुसऱ्या क्रमांकावर टाकतात, स्वतःच्या हौशी मागे ठेवून, लेकरांना पुढे घेऊन जाण्याचा निर्धार करतात.
मुलगा सध्या बी.टेक करत असून त्याने आपल्या वडिलांच्या कष्टांची जाणीव मनात घट्ट रोवली आहे. त्याचं हे वागणं कोणत्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा कमी नाही. अशा उदाहरणांमधून समाजाला शिकायला हवं की, मोठं होण्यासाठी केवळ शिक्षण नव्हे तर वडिलांच्या कष्टांची जाणीव आणि कृतज्ञता ही खरी उंची ठरते.
आज समाजात अनेक पालक मुलांच्या मागे वाकून जात आहेत, त्यांना महागड्या मोबाईल्स, कपडे, गाड्या पुरवताना स्वतःच्या पायाखालची जमीन गमावून बसत आहेत. त्यात काही मुलं वडिलांचा अपमान करतात, त्यांचं शिक्षण संपवूनही त्यांना ‘अनपढ’ समजतात. पण इथे एका तरुणाने बापाच्या प्रत्येक रुपयाची किंमत ओळखून, एक आदर्श उदाहरण सादर केलं.
या प्रसंगातून हेही स्पष्ट होतं की, मूल्यं ही केवळ पुस्तकांत नसतात, ती घरातल्या रोजच्या वर्तनातून शिकवावी लागतात. त्या ड्रायव्हिंग स्कूलच्या मालकाने आपल्या मुलांना शिकवलं नाही की “तू किती खर्च कर,” तर शिकवलं – “पैसा कसा वाचव.”
आज आपल्याला अशा पालकांचं आणि अशा मुलांचं कौतुक करणं गरजेचं आहे. हे आदर्श प्रसंग समाजासमोर यायला हवेत, जेणेकरून इतर मुलांना, पालकांना प्रेरणा मिळेल.
हा अनुभव कोणत्याही ‘ब्रेकिंग न्यूज’पेक्षा मोठा होता, कारण यात संस्कार, प्रामाणिकपणा, कष्ट, आणि कुटुंबातील प्रेमाचं मूर्तिमंत दर्शन झालं. या छोट्याशा संवादातून एक मोठा संदेश साऱ्यांना मिळतो – की गरिबी म्हणजे मागे पडणं नव्हे, तर वडिलांच्या कष्टांचा आदर न करणं हे खऱ्या अर्थाने दिवाळखोरी आहे.
दोन माणसांचा हा संवाद माझ्या मनात कोरला गेला आहे. एक साधा ड्रायव्हिंग स्कूल मालक आणि त्याचा जबाबदार मुलगा… पण या दोघांच्या छोट्याशा संवादाने समाजात बदल घडवण्याची क्षमता आहे. त्या बापालाही सलाम आणि त्या मुलालाही – ज्याने बापाच्या घामाची किंमत ओळखली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






