चाळीसगाव – शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा धागा पकडत स्थानिक गुन्हे शाखा जळगावच्या पथकाने मोठी यशस्वी कारवाई करत एकूण तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून सुमारे २ लाख ४५ हजार रुपये किमतीच्या चोरीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. अटकेत असलेले आरोपी हे रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्यांच्या विरोधात जळगाव, नाशिक व धुळे जिल्ह्यात चोरी, जबरी चोरी, दरोडा यासारख्या गुन्ह्यांचे एकूण १३ प्रकरणे दाखल आहेत.या संपूर्ण प्रकरणात गुन्ह्याची सुरुवात झाली ती चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा र.नं. १३४/२०२५ भादंवि कलम ३७९ (२) अंतर्गत. या गुन्ह्यातील चोरीस गेलेली दुचाकी शोधण्यासाठी स्थानीक गुन्हे शाखेचे पथक प्रयत्नशील होते. अशातच पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे एक अट्टल गुन्हेगार भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ (रा. सोनगाव, ता. मालेगाव) हा आपल्या साथीदारांसोबत मोटारसायकल चोरी करत असल्याचे समजले. सदर माहितीच्या आधारे पोलीसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. भगवान करगळ यास प्रथम जळगाव फाटा, निफाड येथे शोधून काढण्यात आले. त्याचा पहिला साथीदार आकाश गोविंद गायकवाड (रा. जळगाव फाटा, निफाड, ता. निफाड, जि. नाशिक) यास सटाणा येथून अटक करण्यात आली, तर दुसरा साथीदार दादु संजय सोनवणे (रा. दरेगाव, ता. मालेगाव, जि. नाशिक) यासही त्याच्या गावी शोधून ताब्यात घेण्यात आले.तिघांनाही अटक केल्यानंतर विश्वासात घेऊन केलेल्या सखोल चौकशीत या तिघांनी मिळून चाळीसगाव शहर व तालुका भागात चोरी केलेल्या तीन मोटारसायकलींची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेल्या मोटारसायकली बाबत पुढील माहिती दिल्यानंतर सदर दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. पुढील तपासात असेही निष्पन्न झाले की, त्यांनी गुन्हा करताना आणखी एक दुचाकी वापरली होती, ती दुचाकी देखील पोलिसांनी जप्त केली. एकूण चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या ज्यांची अंदाजे किंमत २ लाख ४५ हजार रुपये इतकी आहे. या आरोपींनी जे गुन्हे केले आहेत त्यामध्ये खालीलप्रमाणे प्राथमिक गुन्हे नोंदवलेले आहेतः
१) चाळीसगाव शहर पो.स्टे.ला गु.र.नं. १३४/२०२५ भा.न्या.सं. ३०३(२)
२) चाळीसगाव शहर पो.स्टे.ला गु.र.नं. १३५/२०२५ भा.न्या.सं. ३०३(२)
३) मेहुणबारे पो.स्टे.ला गु.र.नं. ८८/२०२५ भा.न्या.सं. ३०३(२)
या सर्व गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांना हेही लक्षात आले की आरोपी भगवान उर्फ लंगड्या सिताराम करगळ याच्यावर जळगाव, नाशिक, व धुळे जिल्ह्यात जबरी चोरी, साधी चोरी, तसेच दरोड्यासारख्या गंभीर स्वरूपाच्या एकूण १३ गुन्ह्यांची नोंद आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असून पूर्वी देखील त्यास अशाच स्वरूपाच्या गुन्ह्यांतून अटक करण्यात आले होते. मात्र जामिनावर सुटल्यावर पुन्हा एकदा तो गुन्हेगारीकडे वळला आणि आपल्या साथीदारांसह मोटारसायकल चोरीचा कट रचून प्रत्यक्ष चोरी करून मोटारसायकलींना विकण्याचा उद्योग सुरू केला.चोरीस गेलेल्या मोटारसायकलची व आरोपींच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुप्त माहितीचे सूत्र नेटाने वापरून पोलिसांनी केवळ आरोपींना अटक केली नाही, तर चोरी गेलेली मालमत्ता ताब्यात घेऊन मूळ गुन्ह्यांशी संबंधित तिन्ही गुन्ह्यांमध्ये जोडणी केली आहे. सदर गुन्ह्यांची रचना व तपास यामध्ये पोलिसांचे नियोजन आणि कार्यक्षमता ठळकपणे दिसून येते.या संपूर्ण कारवाईस पोलीस अधीक्षक जळगाव मा. डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव मा. कविता नेरकर, स्थानीक गुन्हे शाखा निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्यक्ष कारवाईमध्ये पोउपनिरीक्षक श्री. शेखर डोमाळे, पोह. मुरलीधर धनगर, पोना. महेश पाटील, पोका. भुषण शेलार, पोका. सागर पाटील, पोका. मिलिंद जाधव, पोका. दीपक चौधरी, पोह. भारत पाटील (सर्व नेम. स्थागुशा जळगाव) यांनी उल्लेखनीय सहभाग घेतला.या कारवाईमुळे केवळ एक मोठी चोरी उघडकीस आली नाही तर अट्टल गुन्हेगार व त्याच्या गुन्हेगारी टोळीच्या पुढील कारवायांनाही मोठा लगाम बसला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या या प्रयत्नामुळे चाळीसगाव व परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे. पोलिसांच्या या जलद आणि अचूक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर आरोपींविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १३४/२०२५ भा.न्या.सं. ३०३(२) अन्वये कारवाई करण्यात आलेली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी पोलीस त्यांची कस्टडी घेऊन आणखी चोरीचे गुन्हे दाखल उघडकीस येतात का याचा शोध घेत आहेत.
या घटनेने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, गुन्हा कितीही लपवण्याचा प्रयत्न झाला तरी पोलिसांची तपास यंत्रणा दक्ष आणि सतर्क असल्यास कोणताही गुन्हेगार अटळपणे पकडला जातो. पोलिसांची ही शिस्तबद्ध आणि योजनाबद्ध कार्यपद्धती भविष्यातही गुन्हेगारीला रोखण्यासाठी प्रभावी ठरेल, अशी नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली आहे.





ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.