“कर्तृत्वाचा अमृतस्पर्श : नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्यसंधानाचा भव्य उत्सव”

0

पाचोरा ( सौ. शितल महाजन ) जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षण, सहकार आणि सामाजिक क्षेत्रात निखळ योगदान देत उत्तुंग प्रेरणास्थान ठरलेल्या नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्याचा अमृत महोत्सव आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळा दि. २७ एप्रिल २०२५ रोजी पाचोऱ्यातील श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीमध्ये अत्यंत उत्साही व सन्मानपूर्वक वातावरणात संपन्न होणार आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे विद्यमान व्हाईस चेअरमन म्हणून, तसेच जिल्ह्याच्या शैक्षणिक आणि आर्थिक सह ग्राहक चळवळीत सामाजिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या नानासाहेब जोशी यांच्या पंच्याहत्तरीचे औचित्य साधून हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी संपूर्ण तालुका आणि जिल्ह्यातील शैक्षणिक, सहकारी, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
नानासाहेब व्ही. टी. जोशी हे पाचोरा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील एक आदरणीय आणि श्रध्दास्थान असलेले नाव. कसे पाहिले तर त्यांनी अष्टपैलू क्षेत्रात कार्य केले आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपल्या कार्याची छाप निर्माण केली आहे मात्र पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार आणि सर्वसमावेशक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्धार केलेला आहे. केवळ व्यवस्थापनातील दक्षता नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक त्या सर्व पायाभूत सुविधांची निर्मिती, गुणवत्तापूर्ण शिक्षकवृंदाची नियुक्ती आणि शिक्षणसंस्थेच्या आर्थिक शाश्वततेची बांधिलकी यांनी त्यांनी पाचोऱ्यातील सहकारी शिक्षणाचा स्तर उंचावला आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाची उज्ज्वल जडणघडणच या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने साजरी होत आहे. या अद्वितीय सोहळ्याचे समारंभाध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांची उपस्थिती कार्यक्रमास विशेष गौरव प्रदान करणार आहे. अमृत महोत्सव सत्काराचे मानकरी म्हणून क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते नानासाहेबांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच गौरव ग्रंथ प्रकाशनाचा मान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. आर. डी. कुळकर्णी यांच्या हस्ते साध्य होणार आहे.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. के. बी. पाटील, शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन दादासो संजय गरुड आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दिलीप रामू पाटील यांची मान्यवर उपस्थिती राहणार आहे.
नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या जीवन कार्यावर आधारित एक दर्जेदार आणि अभ्यासपूर्ण गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचा या कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. “ज्ञानामृत” या शीर्षकाखाली सादर होणाऱ्या या ग्रंथाचे संपादन नानासो संजय ओंकार वाघ यांच्या मुख्य संपादकत्वाखाली संपन्न झाले आहे. प्रा. सी. एन. चौधरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली असून, प्रा. डॉ. वासुदेव वले आणि महेश कौंडिण्य यांनी सहसंपादक म्हणून मोलाची भूमिका बजावली आहे. या ग्रंथात नानासाहेबांच्या जीवनप्रवासाचे, त्यांच्या अष्टपैलू कार्यपद्धतीचे, सहकारी शिक्षण क्षेत्रासह जवळजवळ सर्वच क्षेत्रातील त्यांचं योगदान आणि सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी विचार मांडण्यात आले आहे
या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी नानासाहेब व्ही. टी. जोशी अमृत महोत्सव समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष भाऊसो दिलीप ओंकार वाघ, स्वागताध्यक्ष अॅड. दादासो महेश सदाशिवराव देशमुख, तसेच सदस्य म्हणून दादासो दुष्यंतभाई प्रवीणसागर रावल, बापूसो डॉ. बी. एन. पाटील, दादासो खलील दादामिया देशमुख, आणि आप्पासो सतीश नारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण संचालक मंडळ, सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने या आयोजनात पूर्ण समर्पणाने सहभाग घेतला आहे.
नानासाहेब व्ही. टी. जोशी यांनी केवळ शिक्षण संस्था चालविल्या नाहीत, तर शिक्षणाचे एक संस्कारीत आणि मूल्याधिष्ठित दर्शन घडविले आहे. त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात शिक्षणाविषयी जागृती निर्माण केली. त्यांनी सहकार्याच्या तत्त्वावर चालणाऱ्या संस्थांच्या माध्यमातून लोकांना शिक्षणाशी जोडले. त्यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिक्षण संस्थांनी गुणवत्तेच्या शिखरावर झेप घेतली आणि सामाजिक परिवर्तनात मोठे योगदान दिले आहे.
या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने संपूर्ण पाचोरा तालुक्यात एक स्फूर्तीचा आणि नवचैतन्याचा संचार झाला आहे. विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण झाली आहे, शिक्षकांना त्यांच्या योगदानाबद्दल अभिमान वाटतो आहे आणि पालकांमध्ये आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी नवा विश्वास निर्माण झाला आहे.
नानासाहेबांच्या कार्यगौरवाच्या निमित्ताने होत असलेला हा कार्यक्रम म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाचा, कष्टांचा आणि त्यागाचा सन्मान आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पिढ्यानपिढ्या शिक्षण – आर्थीक – सामाजीक क्षेत्रात नवनवीन आदर्श निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
अमृत महोत्सव साजरा करताना नानासाहेब व्ही. टी. जोशी यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र तरुण पिढीसाठी दीपस्तंभासारखे कार्य करणार आहे. त्यांच्या कार्यपद्धतीतील पारदर्शकता, सचोटी, दूरदृष्टी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन आजच्या व्यवस्थापन क्षेत्रासाठी आदर्श ठरले आहेत.
“ज्ञानामृत” या गौरव ग्रंथाच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्याचा एक अमूल्य दस्तऐवज समाजापुढे सादर होणार आहे. त्यांच्या कार्याची ही प्रेरणामयी गाथा प्रत्येक वाचकाला नवे बळ आणि नव्या संकल्पाची उर्जा प्रदान करणार आहे.
२७ एप्रिल २०२५ रोजी होणाऱ्या या अमृत महोत्सव आणि गौरव ग्रंथ प्रकाशन सोहळ्यास पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था, सर्व पदाधिकारी, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि सर्वच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून नानासाहेब व्ही. टी. जोशी यांच्या कार्याचा सन्मान करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
हा सोहळा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, एका कार्यसंस्कृतीचा, एका आदर्श नेतृत्वाचा आणि संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या प्रगल्भतेचा अविष्कार ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here