![]()
पाचोरा – सध्या सोशल मीडियावर “२९ मे ते २ जून दरम्यान तापमान ४५ ते ५५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल” असा एक अलर्ट मोठ्या प्रमाणावर फिरत आहे. या संदेशात, नागरिकांनी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोकळ्या जागी बाहेर न जाण्याचा सल्ला देण्यात आला असून, मोबाईल फटण्याचा धोका, वाहनांमध्ये वस्तू ठेवण्यावर निर्बंध यासह विविध सूचना दिल्या आहेत.
तथापि, भारतीय हवामान विभाग (IMD) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्याकडून यासंबंधी कोणताही अधिकृत हाय अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.
IMD च्या माहितीनुसार, काही भागात तापमान ४५ अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचण्याची शक्यता असून, यासाठी सामान्य सतर्कतेचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे, मात्र ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमानाचा कोणताही अधिकृत अंदाज किंवा धोक्याचा इशारा अद्याप जारी झालेला नाही.
मोबाईल फोन फटण्याचा धोका, नागरिक सुरक्षा महासंचालनालय नावाने जारी सूचना अशा बाबी देखील सत्यावर आधारित नाहीत. भारतात “नागरिक सुरक्षा महासंचालनालय” नावाचा कोणताही स्वतंत्र सरकारी विभाग अस्तित्वात नाही. या प्रकारचे मेसेज मुख्यतः अफवा पसरवण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढे निश्चित हवामान विभागाने काही काळजी घेणे आवश्यक सांगीतले आहे, जसे की भरपूर पाणी पिणे, थेट सूर्यप्रकाश टाळणे, घरात वायुवीजन राखणे आणि गरज नसल्यास दुपारी बाहेर न जाणे. हे वेळोवेळी ऋतुनुसार काळजी घेणे आवश्यक असते पण यासाठी भीती पसरवण्याची गरज नाही.
तसेच, कारमध्ये ज्वलनशील वस्तू उष्णतेत ठेवू नयेत, टायरमध्ये गरजेपेक्षा अधिक हवा भरू नये अशा सामान्य खबरदाऱ्या उन्हाळ्यात नेहमीच घ्याव्यात, असे तज्ञांनी सुचवले आहे. मात्र, कोणतीही गॅस स्फोटाची भीती किंवा मोबाइल आपोआप फुटण्याचा विशेष इशारा अधिकृत यंत्रणांनी दिलेला नाही. सर्व नागरिकांनी सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही अशा संदेशाची शहानिशा करावी आणि फक्त अधिकृत शासकीय यंत्रणांकडून प्राप्त होणाऱ्या सूचनांवर विश्वास ठेवावा सध्याच्या सोशल मीडियावर फिरणारा “हाय अलर्ट” संदेश फेक आहे. तापमान वाढ होत असले तरी भीती निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता, योग्य काळजी घेऊन सुरक्षित राहावे एवढेच झुंज वृतपत्र व ध्येय न्युजचे आवाहन आहे
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






