![]()
भडगाव – एकाच पाचोरा तालुका सहकारी संस्थेमध्ये ३४ वर्षांची निष्ठेची व समर्पित सेवा देणारे, विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाचे दीप उजळवणारे, शिक्षक म्हणून कर्तव्यशीलता आणि मुख्याध्यापक म्हणून नेतृत्वगुण दाखवणारे सौ. सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख किशोर साहेबराव पाटील सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्ताने भव्य निरोप समारंभ आणि त्याचसोबत नवे मुख्याध्यापक अजय बी. अहिरे सर यांच्या स्वागतासाठी एक प्रेरणादायी सोहळा आयोजित करण्यात आला.
.पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा दिलीपभाऊ वाघ , संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या समारंभात परिसरातील मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात भरलेल्या या सोहळ्याचा प्रारंभ दीपप्रज्वलन व ज्ञानदेवतेच्या वंदनाने झाला. सरस्वती पूजन मान्यवरांच्या शुभहस्ते पार पडले आणि कार्यक्रमाला सुसंस्कृततेची आणि भावनिकतेची जोड मिळाली.
स्वागतगीताचे सुमधुर सादरीकरण श्रीमती पुनम पाटील मॅडम यांनी करून वातावरण भारावून टाकले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे चेअरमन आबासो दत्ताजी पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन बाबासो विनयजी जकातदार, उच्च माध्यमिक व्यवसाय विभागाचे चेअरमन नानासो विजयजी देशपांडे, ज्येष्ठ संचालिका श्रीमती ताईसो जयश्री पूर्णपात्री, भोजे शाळेचे स्थानिक चेअरमन दादासो योगेशजी पाटील, संस्था समन्वयक जिभाऊसो एस. डी. पाटील, पिताश्री साहेबराव पाटील, मातोश्री गुलाबराव पाटील, पर्यवेक्षक सि. व्ही. बिऱ्हाडे, शरद महाजन, माजी मुख्याध्यापक दादासो सुधीर पाटील, दादासो अरुण पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी केले. त्यांनी किशोर पाटील सरांच्या दीर्घ सेवेला नम्र अभिवादन करत त्यांच्या शाळेसाठी दिलेल्या योगदानाचा आढावा घेतला. किशोर पाटील सरांनी केवळ अध्यापनच नाही तर शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी झटून काम केले. त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, परीक्षा पद्धती, गुणवत्ता सुधारणा, शिक्षक संघटन, विद्यार्थ्यांच्या प्रगती कार्यक्रमात आपले नेतृत्व दर्जेदार पद्धतीने पार पाडले.
सेवानिवृत्तीच्या या प्रसंगी सौ. मनिषा पाटील यांचाही शालेय परिवारातर्फे विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ प्रदान करण्यात आले. यावेळी भावस्पर्शी मनोगत व्यक्त करताना पर्यवेक्षिका सौ. छाया बिऱ्हाडे, शिक्षक किरण पाटील आणि गुलाबराव पाटील यांनी किशोर सरांच्या व्यक्तिमत्त्वाची आणि कार्याची उजळणी केली. त्यांची सडेतोड भूमिका, समयसूचक निर्णयक्षमता, मुलांना प्रगतीच्या दिशेने नेताना घेतलेली मेहनत आणि शिक्षक व कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासाचे नाते, हे त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचे गूढ असल्याचे प्रतिपादन झाले.
व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, किशोर पाटील सर हे प्रामाणिकतेचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या कार्यशैलीत स्पष्टता, वक्तशीरपणा आणि कार्यतत्परता सदैव जाणवली. त्यांच्या नेतृत्वामुळे संस्थेच्या दोन शैक्षणिक विभागांचा विकास सुस्थितीत झाला आणि त्यांचा दूरदृष्टीचा उपयोग आजही संस्थेच्या धोरणामध्ये जाणवतो.
बाबासो विनयजी जकातदार यांनी देखील आपल्या भाषणातून किशोर सरांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सरांच्या संयमी, समंजस व सहकार्यशील स्वभावाचे कौतुक केले. त्यांनी आपल्या कार्यकाळात संस्थेतील प्रत्येक सदस्याला सन्मानाने वागवले, त्यांच्या निर्णयप्रक्रियेतील समावेशकता आणि नवकल्पनांचा आग्रह संस्थेला सतत प्रगतीपथावर नेत होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.
किशोर पाटील सर यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना भावनिक होत अनेक आठवणी शेअर केल्या. “माझ्या ३४ वर्षांच्या सेवायात्रेत अनेक उत्तम सहकारी लाभले. माझ्या आयुष्यात संस्थेचे अध्यक्ष भाऊसो दिलीप भाऊ वाघ, चेअरमन नानासो संजयजी वाघ, व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, मानद सचिव दादासो महेशजी देशमुख यांचे व संचालक मंडळाचे पाठबळ व सहकार्य लाभले म्हणूनच मी सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडू शकलो.” असे सांगताना त्यांनी अश्रुपूरित डोळ्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
ते पुढे म्हणाले की, “माझ्या शिक्षकी प्रवासाची सुरुवात कै. आप्पासाहेब ओंकार वाघ, कै. थेपडेसाहेब, कै. बापूसाहेब के. एम. पाटील यांनी विश्वासाने दिलेल्या संधीमुळे झाली आणि आज मी या कार्यकर्तृत्वाचा टप्पा पार करत आहे. हे माझ्यासाठी गौरवाचे आणि भावनिक क्षण आहेत.”
या कार्यक्रमात नवीन मुख्याध्यापक अजय बी. अहिरे यांचाही शालेय परिवारातर्फे जाहीर स्वागत करण्यात आले. त्यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकीर्दीची ओळख करून देत, पुढील वाटचालीसाठी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या नव्या पर्वासाठी त्यांनी नेतृत्व स्वीकारले असून त्यांच्याकडून सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अत्यंत सुबोध आणि प्रभावी शैलीत एन. के. सोनजे व सौ. रचना ठाकूर यांनी केले. त्यांच्या सुसंस्कृत शब्दफुलांनी कार्यक्रमात एकसंधता निर्माण केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कर्मचारीवर्ग, विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संपूर्ण समारंभात एकच सूर घुमत होता – “शिक्षक जात नाही, तो विचारात, संस्कारात आणि कार्यात जिवंत राहतो.” किशोर पाटील सरांच्या सेवानिवृत्तीने भलेही एक पर्व संपले असेल, पण त्यांनी दिलेले शिक्षण, संस्कार आणि मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये आणि संस्थेच्या कार्यपद्धतीत सदैव प्रभावी राहतील. नवीन मुख्याध्यापक अजय अहिरे सरांच्या माध्यमातून ही परंपरा नव्या तेजाने पुढे जाईल, अशी संपूर्ण शालेय कुटुंबाची भावना या समारंभातून व्यक्त झाली.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






