![]()
पाचोरा – शहरातील रेल्वे स्थानक हे रोज हजारो प्रवाशांची वर्दळ असणारे महत्त्वाचे ठिकाण आहे. येथे प्रवाशांच्या सुविधा लक्षात घेता भारतीय स्टेट बँकेने ‘आपली बँक’ या योजनेअंतर्गत तिकीट घराच्या समोर एटीएम यंत्र उभारले आहे. मात्र, हे एटीएम गेल्या अनेक दिवसांपासून नादुरुस्त असून, केवळ शोभेच्या वस्तूप्रमाणे उभे आहे. या यंत्रातून पैसेच निघत नाहीत,परंतु अचानक सहरन वाजत असल्यामुळे येथून पैसे काढण्यासाठी आलेल्या नागरिकांची अक्षरशः धावपळ उडते. विशेषतः रात्रीच्या वेळेस गाड्यांची वेळ झाली की प्रवासी घाईघाईत एटीएमच्या दिशेने जातात. मात्र, यंत्र कार्यरत नसल्याने तातडीने पैसे काढण्याची गरज असलेल्या नागरिकांचे मोठे हाल होतात. त्यातच स्टेशन परिसरात दुसरे कोणतेही एटीएम नसल्याने प्रवाशांना बँक शोधत इतरत्र जाण्याची वेळ येते. ही स्थिती विशेषतः महिलांसाठी व वृद्धांसाठी अधिक त्रासदायक ठरते. अनेक वेळा प्रवाशांनी बँकेच्या स्थानिक शाखेला याबाबत तक्रारी केल्या असल्या तरी यंत्राची स्थिती कायमच बदललेली नाही.रेल्वे स्थानकावरच असलेले हे एटीएम प्रवाशांसाठी मोठा आधार ठरू शकतो. परंतु तेच जर कायम नादुरुस्त असेल, तर प्रवाशांचा अपेक्षाभंग होतो आणि भारतीय स्टेट बँकेसारख्या प्रतिष्ठित बँकेच्या कार्यपद्धतीबाबत शंका निर्माण होतात. बँकेकडून हा एटीएम सुरू असून असा देखावा निर्माण केला जातो, पण प्रत्यक्षात त्यातून पैसेच निघत नसल्याने बँकेच्या नावावर गालबोट लागत आहे.स्थानिक रहिवासी, व्यापारी आणि प्रवाशांच्या संघटनांनी यासंदर्भात एकमुखाने आवाज उठविला आहे. त्यांचा ठाम आग्रह आहे की –
१) सदर एटीएम जर कायमस्वरूपी निकामी असेल, तर तात्काळ ते स्थलांतरित करून तेथे उपयोगी जागा निर्माण करावी
२) अन्यथा सदर यंत्र तत्काळ दुरुस्त करून प्रवाशांच्या सेवेत कार्यान्वित करावे सध्या एटीएमवर कोणतीही सूचना फलक किंवा “ऑफलाईन” माहिती नसल्यामुळे अनेक नागरिकांची दिशाभूल होते. पैसे काढण्यासाठी थांबलेल्या प्रवाशांना अनेक वेळा अपमानास्पद व गैरसोयीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. बँक आणि रेल्वे प्रशासन यांची समन्वय नसल्याचे यावरून दिसून येते.भारतीय स्टेट बँकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी या बाबतीत तातडीने लक्ष घालून सदर एटीएमबाबत स्पष्ट निर्णय घ्यावा. जर बँकेच्या नियमानुसार यंत्र पुन्हा सुरू करणे शक्य नसेल, तर किमान प्रवाशांच्या व स्थानिकांच्या हितासाठी इतर ठिकाणी कार्यरत एटीएम बसवावे.नियमितपणे बँकेच्या ‘आपली बँक’ या उपक्रमाच्या जाहिराती प्रसारित होत असताना प्रत्यक्षात असे नादुरुस्त यंत्र नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवणारे ठरत आहे. बँकिंग सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या नावावर अशा प्रकारची निष्क्रिय व्यवस्था म्हणजे धोरणात्मक अपयश असून याबाबत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करून सार्वजनिक विश्वासाची पुनर्स्थापना करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.रेल्वे स्थानक हे सार्वजनिक दळणवळणाचे अत्यंत महत्त्वाचे केंद्र असल्याने तेथील प्रत्येक सुविधा ही नागरिकांच्या गरजांशी निगडित असते. त्यामुळेच या ठिकाणी असलेली यंत्रणा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. एकीकडे डिजिटल इंडिया, कॅशलेस व्यवहार, बँकेच्या सेवा दारात या घोषणा दिल्या जात असताना प्रत्यक्षात शहरातील रेल्वे स्थानकासारख्या मुख्य ठिकाणी असलेली सुविधा जर निकामी असेल, तर ह्या घोषणांचा कितपत फायदा होतो, असा सवाल उपस्थित होतो.यासंदर्भात बँक अधिकाऱ्यांना तक्रारी देऊनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या निष्क्रियतेमुळे अखेर प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आवाज उठवण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे. रेल्वे स्थानकावरील रात्री – बेरात्री सायरन वाजणारे एटीएम सुरू करण्यात यावे, अन्यथा नागरिकांच्या तीव्र नाराजीला सामोरे जावे लागेल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






