पुरस्काराच्या नावाने पैसा गोळा; पाचोऱ्यात बोगस पत्रकारांची भोंदू बाजारपेठ

0

पाचोरा- पत्रकारिता ही मूल्याधारित, समाजोपयोगी आणि जबाबदारीची भूमिका बजावणारे क्षेत्र असले तरी, पाचोरा शहरात या क्षेत्राचा केवळ वापर नव्हे, तर बेधडक गैरवापर सुरू आहे. केवळ ‘पत्रकार संघटना’ या नावाचा बुरखा पांघरून काही बोगस आणि स्वयंघोषित पत्रकारांनी आता नव्या पद्धतीने लोकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली आहे. पत्रकारितेशी दूरदूरचा संबंध नसलेले काही लोक आणि संघटना आता ‘पुरस्कार वितरण’ या नावाखाली संपूर्णपणे व्यावसायिक आणि फसवणुकीचा प्रकार सुरू करत आहेत. हा एक नव्याने उगम पावलेला गोरखधंदा असून ‘मागच्या दाराने पैसे घ्या आणि पुढच्या दाराने सन्मान द्या’ या तत्त्वावर तो सर्रास चालतो आहे.या तथाकथित पत्रकार संघटना पुरस्कारासाठी कोणताही निकष निश्चित करत नाहीत. ना त्यामागे कोणती मान्यताप्राप्त संस्था असते, ना अभ्यास, ना निवड समिती. केवळ ठराविक शुल्क वसूल करून कोणालाही मंचावर बोलावून माणसाला हातात स्मृतीचिन्ह देऊन फोटो काढला की झालं — पुरस्कार प्रदान! आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की, पुरस्कारासाठी हपापलेल्या काही मंडळींनी आता शिक्षण, प्रतिष्ठा आणि मूल्यांचा विचारही करणे सोडून दिले आहे. कोण देतोय? कशासाठी देतोय? याचा विचारही न करता या तथाकथित ‘पत्रकार संघटनां’च्या रंगीत बॅनरसमोर उभं राहून, हसऱ्या चेहऱ्याने ‘मी पुरस्कारप्राप्त’ असल्याचा आव आणणं हेच जणू नवे सामाजिक स्टेटस बनू लागले आहे. या बोगस पुरस्कारांचे स्वरूप ठरलेले असते. आधी निवडलेल्या ‘पुरस्कारार्थी’ व्यक्तींची यादी तयार केली जाते, आणि त्यांच्याशी ‘आम्ही तुम्हाला राष्ट्रीय/राज्य/जिल्हा पुरस्कार देणार आहोत’ असे सांगून गोडगोड भाषण केले जाते. मग शुल्क सांगितले जाते — ५०० रुपये ते ५००० रुपये, प्रसंगी त्याहूनही अधिक. या रकमेच्या मोबदल्यात स्मृतीचिन्ह, सर्टिफिकेट, एका व्यासपीठावर दोन फोटो, आणि पुढे सोशल मीडियावर ‘पुरस्कार प्रदान सोहळा’ असे कॅप्शन. बस्स. ना त्या व्यक्तीच्या कार्याचा तपशील, ना कसलीच निवड प्रक्रिया, ना पारदर्शकता. ही एकप्रकारची ‘पुरस्कार विक्री प्रक्रिया’ आहे, जी पुरस्काराच्या पवित्रतेचा घोर अपमान करत आहे.
या पत्रकार संघटनांचे दुसरे सत्य म्हणजे — यांचे स्वतःचे कोणतेही माध्यम नाही, ना कार्यालय, ना मान्यता. केवळ छापील बॅनर, एका यूट्यूब चॅनलचा लोगो, आणि काही मूठभर भंपक कार्यकर्ते यावर त्यांचा डोलारा उभा असतो. पुरस्कार देण्याच्या नावाखाली ते सभागृह, शाळा, मंगल कार्यालय, याठिकाणी कार्यक्रम आयोजित करतात. प्रत्यक्षात यामागचा उद्देश असतो फक्त पैसा गोळा करणे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी स्थानिक व्यापारी, शिक्षक, लघुउद्योजक, काही वेळा सरकारी कर्मचाऱ्यांनाही अशा कार्यक्रमात समाविष्ट करून ‘पुरस्कार’ देऊन ते त्यांच्याच माध्यमातून स्वतःचा सामाजिक दबाव वाढवतात या सगळ्या प्रकाराला दुसरीकडे समाजाची चूकही कारणीभूत आहे. काही मंडळी स्वतःहून अशी बोगस मंडळी शोधतात. “काहीही करून माझा पुरस्कार लावा”, ” तालुका, जिंल्हा, विभाग,राज्यस्तरीय, राष्ट्रीय काहीही चालेल”, अशी विनवणीही केली जाते. मग त्या संघटनेचे लोकही ‘ठीक आहे, १५०० रुपये द्या, तुम्हाला जिल्हा गौरव पुरस्कार देतो’ असे सांगतात. एकप्रकारे हे ‘सन्मानासाठी हपापलेल्या’ लोकांची बाजारपेठ तयार झाली आहे. आणि या बाजारात बोगस पत्रकारांचा मुजोर गट दलाली करत फिरतो आहे.विशेष म्हणजे यातील बहुतांश तथाकथित पत्रकार हे ना पत्रकारितेचे शिक्षण घेतलेले आहेत, ना त्यांनी कधी खरे पत्रकारितेचे काम केले आहे. त्यांचे संपूर्ण लक्ष ‘पत्रकार’ या ओळखीचा वापर करून फोटो काढणे, बॅनरवर नाव छापणे, आणि त्या माध्यमातून समाजात एक खोटा दरारा निर्माण करण्याकडे असतो. त्यातही आता ‘पुरस्कार वितरण’ ही नवी शाखा त्यांच्या ब्लॅकमेलिंग नेटवर्कमध्ये जोडली गेली आहे. ‘पुरस्कार मिळालेला’ व्यक्ती मग कोणत्याही क्षेत्रात ‘आपल्याला सन्मानित केले आहे’ असे सांगून अधिक सामाजिक प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि खरे पुरस्कार घेणारे, खरे कार्य करणारे मात्र दुय्यम ठरतात.या पार्श्वभूमीवर खर्‍या पत्रकार संघटनांनी, मान्यताप्राप्त माध्यमांनी आणि प्रशासनाने सजग होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. बोगस संघटना कोणत्या आहेत, त्यांचे पत्रकार कोण आहेत, त्यांच्या कार्याची पारदर्शक चौकशी व्हायला हवी. पत्रकारिता ही माणसाला सन्मान मिळवून देणारी प्रक्रिया आहे, सन्मान विकायचा धंदा नाही.
पुरस्कार देणे ही एक अत्यंत जबाबदारीची गोष्ट आहे. पुरस्काराचा एक विशिष्ट दर्जा असतो. त्यामागे अभ्यास, तपासणी, निरीक्षण, आणि कार्याचे मूल्यमापन अपेक्षित असते. पण सध्या पाचोऱ्यात जे सुरू आहे, ते म्हणजे ‘दे पैशे आणि घे पुरस्कार’ अशा वृत्तीचा विस्तार. ही सवय समाजाच्या नैतिक अध:पतनाचे लक्षण आहे.
या बातमीच्या माध्यमातून पाचोऱ्यातील जनतेला, समाजसेवकांना, खऱ्या पत्रकारांना आणि स्थानिक प्रशासनाला साद घालण्यात येते की, अशा फसव्या, बोगस, लाजीरवाण्या आणि पत्रकारितेच्या पवित्रतेला काळिमा फासणाऱ्या संघटनांचा आणि त्यांच्या गोरखधंद्याचा निषेध करा. जर आज आपण मौन बाळगले, तर उद्या खऱ्या पत्रकार आणि पुरस्कार यांची किंमतच उरणार नाही.पुरस्कार हा स्वकर्तृत्वाने मिळायला हवा; विकत घेता येणारा नसावा. कारण खरी सन्मानाची किमया ही त्यामागील कार्यातून निर्माण होते, पैशातून नव्हे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here