पाचोरा बस स्थानकात गोळीबार : सीसीटीव्ही बंद, ड्युटीवरील पोलिसांच्या भूमिकेवर संशय; चौकशी व निलंबनाची मागणी

पाचोरा तालुक्यातील प्रमुख सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी समाविष्ट असलेल्या पाचोरा एसटी बस स्थानक परिसरात सायंकाळच्या सुमारास घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेत आकाश मोरे (वय अंदाजे २५) या युवकाचा मृत्यू झाला असून, परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत गजबजलेल्या व प्रवासी गर्दीच्या ठिकाणी दिवसा ढवळ्या अशा प्रकारचा हिंसाचार होणे ही गंभीर बाब असून, त्यामुळे पोलीस यंत्रणा व एसटी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर बस स्थानक परिसरात याआधीच लाखो रुपये खर्चून बसवण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा निष्क्रिय असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. सदर कॅमेरे अनेक महिन्यांपासून बंद किंवा नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे गोळीबाराच्या या गंभीर घटनेचा तपास करताना कोणतेही दृश्य पुरावे उपलब्ध झालेले नाहीत. पोलिसांना केवळ प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावर अवलंबून राहावे लागत आहे. गोळीबाराच्या घटनेत आकाश मोरे याला गोळ्या लागल्याने तो जागीच कोसळला. परिसरात क्षणार्धातच एकच गोंधळ उडाला. ऑनड्युटी पोलीस वगळता प्रवासी, दुकानदार, वाहनचालक यांनी घटनास्थळावर धाव घेतली. काही वेळ वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण होते. घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमीला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेक नागरिक, प्रवाशी व स्थानिक व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर संताप व्यक्त केला असून, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसवलेली यंत्रणा जर वेळेवर चालू ठेवण्यात आली असती, तर किमान गुन्हेगाराच्या ओळखीचे धागेदोरे सापडले असते, असे म्हणणे आले आहे. मात्र सदर कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिसांना या घटनेबाबत ठोस दृश्य पुरावा मिळू शकलेला नाही. या घटनेबाबत स्पष्टच बोलायचे म्हटले तर आणखी गंभीर बाब म्हणजे पाचोरा बस स्थानकावर शोसाठी व पोलिसांना सेल्फी काढण्यासाठी स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्यात आली आहे या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस तैनात करण्यात येत असल्याची माहिती असून, 20 ते 25 मिटर अंतरावर असलेली स्वतंत्र पोलीस चौकी कार्यरत असतांना गोळीबार घडला कसा तेव्हा ड्युटीवरील पोलीस कर्मचारी काय करत होते त्यांचे मोबा लोकेशन देखील तपासणे गरजेचे आहे बस स्थानकावर नेहमी होणाऱ्या चोऱ्यां प्रमाणे त्यांना या प्रकाराचा सुगावा का लागला नाही, त्यांनी तत्काळ हस्तक्षेप का केला नाही जर ऑन ड्युटी पोलीस बस स्थानकावर हजर असते तर कदाचित एवढा गंभीर प्रकार घडला नसता या प्रश्नांची चर्चा सर्वत्र होत आहे. सदर प्रकरणात पत्रकार संदीप महाजन यांनी पोलिसांच्या कार्यशैलीवर थेट सवाल उपस्थित करत, ड्युटीवरील पोलिसांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्या कर्तव्यात कसूर झाल्याप्रकरणी चौकशी करून निलंबन करण्यात यावे, अशी तीव्र मागणी केली आहे. या प्रकरणी ऑन ड्युटी असलेल्या संबंधित पोलिसांना वाचवण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर देखील कारवाई करावी यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्र घेतला जाईल बस स्थानकासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था असूनही जर अशा घटना घडत असतील तर ती केवळ प्रशासनाच्या उदासीनतेमुळे घडत आहेत. पाचोरा बस स्थानकावर दररोज हजारो प्रवासी, महिला, विद्यार्थी, नागरिक व व्यापारी ये-जा करत असतात. अशा ठिकाणी सुरक्षा रक्षकांची उपस्थिती नसणे, सीसीटीव्ही यंत्रणा बंद असणे आणि ड्युटीवरील पोलिसांचा प्रतिसाद वेळेवर न मिळणे ही बाब संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी आहे. सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नसल्यामुळे तपासाला हवी तशी गती मिळताना दिसत नाही. घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुढील उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. यामध्ये बस स्थानक परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तत्काळ तपासणी करून ते कार्यान्वित करणे, ड्युटीवरील पोलिसांच्या कार्यपद्धतीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई करून निलंबन करणे बस स्थानकात विशेष पोलीस बंदोबस्त ठेवणे, आणि एस टी महामंडळाने दररोज गस्त घालणाऱ्या सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करणे या मागण्या प्रमुख आहेत. सध्या शहरात या घटनेची तीव्र चर्चा असून, सर्वच स्तरातून “आता तरी प्रशासन जागे होईल का?” असा थेट सवाल विचारला जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उभारलेली यंत्रणा जर वेळेवर कार्यरत राहिली नाही, तर त्याचा उपयोग काय? हा प्रश्न सध्या प्रत्येक सुजाण नागरिकाच्या मनात आहे. पाचोरा बस स्थानकावर घडलेली गोळीबाराची घटना ही केवळ एका युवकाच्या मृत्यूशी संबंधित नाही, तर ती प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि पोलिसांच्या शिथिल कार्यपद्धतीचे गंभीर उदाहरण ठरली आहे. यावर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर भविष्यात अशाच घटनांची पुनरावृत्ती होणार हे निश्चित आहे. त्यामुळे जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही, बंद असलेल्या यंत्रणांची दुरुस्ती, आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणारी ठोस धोरणात्मक पावले उचलणे आता अपरिहार्य झाले आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here