दि पाचोरा पिपल्स बॅक निवडणुकीत एक जागा वगळता सर्व जागांवर बिनविरोध निवड; अतुल संघवी पॅनलचे वर्चस्व स्पष्ट

0

Loading

पाचोरा तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दि पाचोरा पिपल्स बॅक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 09 जागांसाठी 10 उमेदवार रिंगणात उतरले असून, या एका जागेसाठी निवडणूक होणार आहे तर उर्वरित सर्व जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत अतुल सुभाषचंद संघवी यांच्या नेतृत्वाखाली उभे राहिलेल्या पॅनलचा प्रभाव ठळकपणे जाणवला. सहकार क्षेत्रातील प्रभावशाली चेहरा असलेल्या संघवी यांच्या संघटन क्षमतेचा पुन्हा एकदा प्रत्यय यानिमित्ताने आला. या निवडणुकीत पॅनलतर्फे अतुल संघवी यांच्या नेतृत्वाखाली पुढील उमेदवार उभे होते – प्रशांत श्रीकिसन अग्रवाल, स्वप्निल सुधारकर पाटील, देवेंद्र रमनलाल कोटेचा, अनंतराव बाबुराव पाटील, राहुल अशोक संघवी, नरेंद्र उत्तमराव पाटील, पुखराज इंदरचंद डांगी आणि अविनाश वसंतराव कुडे. या पॅनलविरुद्ध निलेश विनायक मराठे यांनी एकटेच अर्ज भरल्याने एकाच जागेसाठी निवडणूक होणार असून उर्वरित 9 जागांसाठी ही निवडणूक बिनविरोध झाली आहे. विशेष म्हणजे ओबीसी, महिला, शाखा, एनटी व अनुसूचित जाती-जमाती राखीव जागांवर बिनविरोध निवड झालेली आहे. ओबीसी जागेवर भागवत एकनाथ महालपुर, शाखा जागेवर पवन राजमल अग्रवाल, महिला जागांवर सौ. संगिता शरद पाटे व सौ. संध्या प्रकाश पाटील, एनटी प्रवर्गातून विकास ज्ञानेश्वर वाघ आणि अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातून अविनाश मुकुंदराव भालेराव यांची बिनविरोध निवड झाली.
ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी स्थानिक राजकीय नेतृत्वाने मोठे प्रयत्न केले. यामध्ये राज्याचे माजी मंत्री व भाजपचे नेते ना. गिरीषभाऊ महाजन, आमदार किशोरआप्पा पाटील आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी पुढाकार घेतला. विशेष बाब म्हणजे, आजच्या दिवशी विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आणि हे त्या दिवशी विधानसभागृहाचे तालीका अध्यक्षांचे जबाबदारीचे काम पाहत होते. मात्र तरीही त्यांनी विधानसभा सोडून थेट ए आर कार्यालयात ठाण मांडून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी परिश्रम घेतले आणि प्रत्यक्ष माघारी प्रक्रियेत सहभाग घेतला. यावरून स्थानिक बँकेचे हित लक्षात घेऊन निवडणुकी बाबतची गांभीर्याची पातळी आणि इच्छाशक्ती स्पष्ट होते.
पॅनलविरुद्ध निलेश मराठे यांनी एकमेव अर्ज भरला होता. अखेरच्या क्षणापर्यंतही बिनविरोध निवडणुकीसाठी त्यांची माघार व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र बॅंकेचे अंतर्गत धोरण आणि मराठे बंधूंच्या आंतरिक मतभेदांमुळे माघार घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे सर्वसाधारण एकच जागा अपवाद ठरली.
याच पार्श्वभूमीवर आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पॅनलचे प्रमुख अतुलभाऊ संघवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेमध्ये बिनविरोध निवड झालेल्या सर्व उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली. सर्वप्रथम ज्या उमेदवारांनी निस्वार्थपणे आपले अर्ज मागे घेतले आणि सहकार क्षेत्राच्या शांततेसाठी योगदान दिले, त्यांचे आभार मानण्यात आले. त्यानंतर अतुलभाऊ संघवी यांच्या नेतृत्वातील पॅनलमधील सर्व उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार पॅनल समर्थकांनी केला.
या बिनविरोध निवडीमुळे निवडणूक खर्च, तणाव, राजकीय दडपण यापासून संस्थेला आणि उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. सहकार चळवळीत एकसंघपणे काम करण्याचा संदेश या प्रक्रियेतून देण्यात आला. राजकीय व सामाजिक स्तरावर मतभेद असूनही, सहकार क्षेत्रासाठी सर्वांनी एकत्र येत निर्णय घेणे ही आजच्या काळात दुर्मीळ बाब मानली जाते.
अतुल संघवी यांचे पॅनल म्हणजे स्थानिक सहकार क्षेत्रातील अनुभवी, अभ्यासू, आणि कार्यक्षम नेतृत्वाचे प्रतीक मानले जाते. या पॅनलने पूर्वी अनेक वेळा बँकेच्या विविध योजना आणि कार्यांमध्ये पारदर्शकता, कार्यक्षमता आणि ग्राहकाभिमुख धोरण राबवले आहे. त्यामुळेच स्थानिक सभासदांमध्ये या पॅनलविषयी विश्वासाची भावना निर्माण झाली आहे. राजकीय स्तरावर सत्ताधाऱ्यांपासून स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सहकार्य केल्याचे दिसून आले. यामध्ये विशेषतः किशोरआप्पा पाटील यांचे योगदान उल्लेखनीय राहिले. त्यांनी केवळ समन्वयकाची भूमिका बजावली नाही, तर प्रत्येक उमेदवाराशी वैयक्तिक संवाद साधून परस्पर सहमती साधली. त्याचबरोबर गिरीषभाऊ महाजन आणि दिलीपभाऊ वाघ यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. बिनविरोध निवड झाल्यानंतर निवडून आलेल्या सर्व उमेदवारांचे समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले. जय किरण प्रभाजी पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात माजी पदाधिकारी, कर्मचारी व सभासदांनी उपस्थित राहून निवड झालेल्या सदस्यांचे अभिनंदन केले.
एवढया मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवड ही केवळ एक औपचारिक प्रक्रिया नसून ती एका समंजसपणाची आणि सहकार चळवळीतील एकात्मतेची साक्ष आहे. मतभेद असले तरी ते संवादातून सोडवले गेले पाहिजेत, हे या निवडणुकीने सिद्ध करून दाखवले आहे. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत शांतता, संयम, आणि सहकार्य यांचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. संस्थेच्या भविष्यातील वाटचालीसाठी हे एक सकारात्मक पाऊल ठरेल, अशी अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.
येत्या काही दिवसांत निवडून आलेल्या संचालकांची अधिकृत बैठक होऊन अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड होणार आहे. या निवडणुकीत अतुल संघवी पॅनलने दाखवलेले नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य भविष्यात संस्थेच्या प्रगतीत निश्चितच उपयोगी ठरेल, असा विश्वास सभासद व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here