पाचोरा ( भोला पाटील ) धार्मिक आणि सामाजिक भावनेचा संगम घडवणाऱ्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील कृष्णापुरी चौफुलीवरील भारत डेअरी स्टॉप, अश्विनी ऑटो मोबाईल समोर दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘माऊली गृप’ व ‘बहुळेश्वर गृप’ यांच्या संयुक्त विद्यमाने साबुदाणा खिचडी, केळी व इतर उपवास फराळ वाटपाचा कार्यक्रम अतिशय भक्तिपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या सेवाभावी उपक्रमाची सुरुवात आजपासून अठरा वर्षांपूर्वी झाली होती. त्यावेळी काही मोजक्या तरुणांनी एकत्र येत उपवास करणाऱ्या भाविकांना निस्वार्थ भावनेने अन्नसेवा करण्याचा संकल्प केला आणि त्यातून ‘माऊली गृप’ व ‘बहुळेश्वर गृप’ या दोन संघटनांची मूळ संकल्पना उदयास आली. आज त्याच उपक्रमाने पाचोऱ्यासह पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे, आयोजनकर्त्यांकडून पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच नियोजन सुरू केले जाते. विविध ठिकाणी भेटी घेऊन, साहित्य संकलन करून आणि कामांची विभागणी करून ही सेवा नेटकेपणाने पार पाडली जाते. या उपक्रमामध्ये गावातील तसेच परिसरातील नागरिक, व्यापारी, सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती यांचे भरघोस योगदान असते. काही दात्यांनी तर गुप्तपणेच मोठ्या प्रमाणात साबुदाणा , शेंगदाणे, तेल केळी, साखर इत्यादी आवश्यक साहित्याचा पुरवठा करून आपले कर्तव्य पार पाडले आहे.
आज ६ जुलै २०२५ रोजी सकाळी ९ वाजता कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठल माऊलीच्या मुर्तीच्या दुध व दहीने अभिषेक व आरती करून झाली. यानंतर माऊली गृप आणि बहुळेश्वर गृपच्या वतीने माऊलीला उपवास फराळाचा नैवेद्य अर्पण करून साबुदाणा खिचडी, केळी आणि इतर उपवास फराळाचे वाटप सुरू करण्यात आले.
फराळ वाटपाच्या या पवित्र कार्यात कोणतेही राजकारण नव्हते, कोणताही प्रसिद्धीचा हव्यास नव्हता, होता तो केवळ भाविकांप्रती प्रेम, सेवा आणि भक्तीचा आदर. अनेक भाविकांना वेळेत अन्न मिळावे यासाठी कार्यकर्ते तत्पर होते. गर्दी असूनही शिस्तबद्ध रांगेत वाटप सुरू होते.
या सेवाभावी उपक्रमात यावर्षी पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे साहेब यांनी कुटुंबासह उपस्थित राहून विठ्ठल माऊलीचे दर्शन घेतले व उपवासाचा फराळ ग्रहण केला. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, राजकीय क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी देखील या कार्याची प्रशंसा करून आयोजकांचे अभिनंदन केले. पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, एरंडोल, पिंपरखेड आदी परिसरातील भाविक भक्त विठोबा दर्शनासाठी पायी चालत निघतात. अनेक भाविक अशा पदयात्रेच्या दरम्यान थकलेले असतात. यावेळी असा नि:स्वार्थ उपक्रम त्यांच्यासाठी वरदान ठरतो. सकाळी सुरू झालेला फराळ वाटपाचा कार्यक्रम दुपारपर्यंत चालू होता आणि हजारो भक्तांनी याचा लाभ घेतला. या यशस्वी उपक्रमामागे ‘माऊली गृप’ व ‘बहुळेश्वर गृप’ चे सर्व सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा व ज्येष्ठ भाविकांनी आपापली जबाबदारी अतिशय निष्ठेने पार पाडली. काहींनी स्वयंपाकाचे काम पाहिले, काहींनी वितरणाचे, काहींनी वाहतूक नियोजन तर काहींनी सुरळीत शिस्त राखण्यासाठी परिश्रम घेतले.अनेक महिला सदस्यांनी देखील फराळ तयार करण्यासाठी मेहनत घेतली. या वर्षी मिळालेला प्रतिसाद पाहता आयोजकांनी पुढील वर्षी अधिक मोठ्या प्रमाणात, अधिक चांगल्या नियोजनाने उपवास फराळ वाटप करणार असल्याचे संकेत दिले आहेत. अधिक भाविकांना सेवा देता यावी यासाठी नवीन जागा, अधिक स्वयंपाक साहित्य, आणि नवीन स्वयंसेवकांची भर घालण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
‘माऊली गृप’ आणि ‘बहुळेश्वर गृप’ चा उपक्रम हे केवळ खाद्य वाटप नव्हे, तर तो धर्म, श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि सेवा भावनेचा एक आदर्श प्रतीक बनलेला आहे. पाचोऱ्यातील ही परंपरा आज एक सामाजिक चळवळ म्हणून उभी राहत आहे.
या कार्यक्रमामुळे केवळ उपवास केलेल्या भाविकांना अन्न मिळते इतकेच नव्हे, तर शहरात भक्तीमय व सेवाभावाने भारलेले वातावरण निर्माण होते, जे सामाजिक सलोखा वाढवणारे आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते –
“जे जे भेटे भक्तांस आता, ते ते विठोबा रूप दिसता…”
‘माऊली गृप’ आणि ‘बहुळेश्वर गृप’ यांच्या या सेवा परंपरेला अशाच भक्तिभावाने पुढील अनेक वर्षे वृद्धिंगत व्हावे, हीच विठुरायाच्या चरणी प्रार्थना!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.