“गुन्हेगारीविरोधात मिशन मोडमध्ये : पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांची धडाकेबाज सुरुवात”

पाचोरा – पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी रुजू होताच अवघ्या ३६ तासांमध्ये आपल्या कार्यतत्परतेचा ठसा उमठवत, शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तींच्या विरोधात धडाकेबाज मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या या सकारात्मक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे शहरातील सर्वच स्तरातून त्यांचे विशेष कौतुक होत असून, नागरिकांमध्ये एक विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुल कुमार पवार हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक तडफदार, निष्ठावान व जनतेच्या सुरक्षेबाबत सदैव जागरूक अधिकारी म्हणून ओळखले जातात. पाचोरा पोलीस ठाण्यात त्यांनी नुकतीच जबाबदारी स्वीकारल्यानंतर, त्यांनी शहरातील गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी “अवैध हत्यार मुक्त” “रोमिओ मुक्त पाचोरा” आणि “विद्यार्थिनी सुरक्षितता मोहीम” असे विशेष मिशन सुरू केले आहेत.
या मोहिमेच्या माध्यमातून त्यांनी शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींची छेडछाड करणारे, कट्ट्यावर थांबून टवाळक्या करणारे तथाकथित रोमिओ, तसेच परीक्षेच्या काळात मुलींना त्रास देणारे टपोरींना वठणीवर आणण्यासाठी कटाक्षाने निरीक्षण सुरू केले आहे. या कार्यवाहीत त्यांनी स्वतंत्र पोलीस अधिकारी, एक महिला कॉन्स्टेबल आणि प्रशिक्षित पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून शाळा-महाविद्यालय परिसरात गस्त वाढवली आहे. 
शाळा आणि कॉलेज परिसरात सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. दररोज एक महिला पोलीस कर्मचारी व पुरुष पोलीस अधिकारी शाळा व महाविद्यालय परिसरात चोख गस्त घालत असून विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्यही सुरू आहे.
पोलीस निरीक्षक राहुल कुमार पवार यांनी सुरुवातीपासूनच स्थानिक गुन्हेगारी प्रवृत्तींवर लक्ष केंद्रित केले आहे. गुन्हेगारी विरोधात त्यांनी ‘झीरो टॉलरन्स’ ची भूमिका घेतली असून, कोणत्याही प्रकारचा त्रास देणारा, टोळीयुद्ध करणारा, सार्वजनिक ठिकाणी गैरकृत्य करणारा यांना क्षमा केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना देखील आदेश दिले आहेत की, सर्वसामान्य जनतेशी सौजन्यपूर्ण वागावे, त्यांच्या समस्या तातडीने ऐकून घेऊन कायदेशीर मार्गाने मार्गदर्शन करावे.
गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सक्रीय करण्यात आले असून, विशेष पथक तयार करून अवैध धंद्यांवर देखील लक्ष ठेवले जात आहे. मद्यपान करून सार्वजनिक ठिकाणी हुज्जत घालणारे, वाहनांवर मॉडिफाइड सायलेन्सर बसवून ध्वनीप्रदूषण करणारे, विना परवानगी रात्री उशिरा फिरणारे यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक पवार यांच्या या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे पाचोरा शहरात नवीन उर्जा आणि शिस्त निर्माण झाली आहे. शहरातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी त्यांनी उचललेले पावले निश्चितच अभिनंदनीय आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा पोलीस दल नव्या जोमाने काम करत असून, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात आता एक सशक्त यंत्रणा उभी राहत आहे.शहरातील काही ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “आम्ही अनेक पोलीस निरीक्षक पाहिले, पण अवघ्या 36 तासात राहुल पवार यांनी दाखवलेला उत्साह, तत्परता, आणि नागरी संवाद कौशल्य हे विशेष कौतुकास्पद आहे.” महिला वर्गातूनही समाधान व्यक्त होत आहे.
पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या कार्यपद्धती संदर्भात प्राप्त माहितीनुसार गुन्हेगारी प्रवृत्तींना वचक देण्यासाठी कधी वेळप्रसंगी कठोर कारवाई करण्यात येते, तर जनतेला विश्वासात घेण्यासाठी संवाद, समज आणि मार्गदर्शन या त्रिसूत्रीचा वापर केला जातो – हे पोलीस निरीक्षक राहुल पवार यांच्या नेतृत्वाचे खरे वैशिष्ट्य आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते – “धाक दाखवणाऱ्या टोळ्यांवर आता धाक निर्माण करणारा एक खंबीर अधिकारी उभा राहिला आहे!”
पाचोरा शहरातील नागरिकांनी पोलीस प्रशासनाशी सहकार्य करून हा सकारात्मक बदल आणखी भक्कम करण्यासाठी पुढाकार घ्यावा, हीच काळाची गरज आहे.

Loading

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here