ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांचा स्पष्टवक्तेपणा: व्यक्तिनिष्ठ आरोपांपेक्षा बँकेच्या हिताचा मुद्दा महत्त्वाचा

Loading

पाचोरा – दि पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून स्थानिक पातळीवर आरोप-प्रत्यारोपांचे वारे जोरात वाहत असून, यामध्ये विशेषतः सहकार पॅनलचे प्रमुख अतुलभाऊ संघवी आणि प्रतिस्पर्धी उमेदवार निलेशभाऊ मराठे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमध्ये केवळ कर्ज, न्यायालयीन प्रक्रिया, वैयक्तिक व्यवसाय व्यवहार या गुंतागुंतीवरच चर्चा सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीचा बारकाईने आढावा घेत, ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांनी एक संयमित, जनहिताकडे लक्ष देणारा आणि पत्रकारितेच्या मूल्यांना प्राधान्य देणारा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, निवडणुकीच्या काळात उमेदवारांच्या व्यक्तिगत कर्ज, त्यावरील खटले किंवा न्यायालयीन वादांवर आधारित चर्चांना आणि प्रेस कॉन्फरन्समधील एकमेकांवर करण्यात येणाऱ्या टोकाच्या टीकांना आतापुढे प्रसिद्धी नाकारण्याचा निर्णय घेतला आहे त्याऐवजी आमच्या माध्यमांत फक्त बँकेच्या व्यवस्थापन, सभासदहित, युवकांचे रोजगार, पारदर्शक नोकर भरती व बँकेच्या आर्थिक सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित केले जाईल कारण अशा चर्चांनी सभासदांचा मूळ हिताचा मुद्दा बाजूला पडतो आणि लोकशाही प्रक्रियेमधील गांभीर्याला धक्का पोहोचतो.दि पाचोरा पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक ही गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा शहरातील आर्थिक व्यवहारांची कणा ठरली आहे. शेकडो सभासद, हजारो ठेवीदार आणि स्थानिक युवकांचे रोजगार या बँकेच्या निर्णयांवर अवलंबून आहेत. अशा स्थितीत, बँकेच्या भविष्यासाठी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी पुढील महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका मांडणे अपेक्षित होते – सर्वसामान्य सभासदांच्या हिताचे धोरण काय असणार? ५१ रुपये शेअर असलेल्या जुने सभासद मतदान प्रक्रियेत पुन्हा सहभागी होतील का? त्यासाठी काय पावले उचलणार? बँकेच्या गतीशील व्यवस्थापनासाठी कोणती सुधारणा करणार? स्थानिक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देणार? नोकर भरतीच्या धोरणात पारदर्शकता असेल का? स्थानिक तरुणांना प्राधान्य असेल का? वर्षानुवर्षे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांची पदोन्नती कशी निश्चित केली जाणार? वरील मुद्दे हे निवडणुकीचे खरे मुद्दे असून, एक सभासद, ठेवीदार, ग्राहक आणि बँकेच्या हितचिंतक म्हणून प्रत्येक नागरीकाच्या मनात हे प्रश्न आहेत. परंतु त्यांना बगल देत उमेदवार आपल्या व्यक्तिगत आरोप-प्रत्यारोपाच्या चर्चांमध्ये अडकत असल्याची खंत ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांनी व्यक्त केली आहे.ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र या दोन्ही माध्यमांनी यावेळी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून स्पष्टपणे जाहीर केले आहे की, पत्रकार परिषदांमध्ये उमेदवारांनी जर केवळ व्यक्तिगत वाद आणि कर्जाच्या फेऱ्यात चर्चा अडकवली, तर अशा बातम्यांना प्रसिद्धी नाकारण्यात येईल.व नकारात आहे पाचोरा शहरातील जनतेने गेल्या अनेक दशकांपासून पत्रकारितेवर विश्वास ठेवला आहे. परंतु हल्लीच्या काही माध्यमांमध्ये फक्त चिखलफेक, द्वेषमूलक आणि नकारात्मक मथळ्यांना प्राधान्य दिले जात असल्याची तक्रार सर्वसामान्य जनतेने अनेकवेळा केली आहे. अशा वेळी, ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांनी घेतलेला हा निर्णय एक पथदर्शी आणि जबाबदारीने युक्त पाऊल आहे.ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र चे संपादकाचे पत्रकार आणि सविस्तर वार्तांकन करणारे प्रतिनिधी यांचे यामध्ये महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी बातम्या मांडताना व्यक्तीपेक्षा मुद्दा, द्वेषाऐवजी दिशा आणि संवेदनशीलतेपेक्षा समाजहित हे तत्व डोळ्यासमोर ठेवले असल्याचे यावेळी प्रकर्षाने दिसून आले.दि पाचोरा पीपल्स बँकेसारख्या सहकारी संस्थांची निवडणूक ही कोणत्या तरी वैयक्तिक वैरभावना व्यक्त करण्यासाठी नसून, संस्थेच्या हिताचा, जनतेच्या विश्वासाचा आणि आर्थिक सुदृढतेच्या मार्गाचा निर्णय घेण्यासाठी असते. ही निवडणूक हे संधीचक्र असून बँकेसाठी नवी दिशा, नव्या संकल्पना, आणि पारदर्शक कार्यपद्धती यासाठी ती वापरली जाणे गरजेचे आहे.ध्येय न्यूज व झुंज वृत्तपत्र यांनी सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे की, आता व्यक्तिगत वाद सोडून त्यांनी पुढील मुद्द्यांवर खुल्या व्यासपीठावर आपली मते मांडावीत : बँकेच्या आर्थिक पुनरुज्जीवनाचे त्यांचे आराखडे काय आहेत? सभासदसंख्या वाढवण्याबाबत कोणते उपक्रम राबवणार आहेत? ५१ रुपयांचे जुने शेअरधारक पुन्हा मतदान प्रक्रियेत येण्यासाठी काय प्रयत्न करणार? विविध गटात बँकेच्या नोकऱ्या पारदर्शी पद्धतीने भरल्या जातील का? संगणकीकरण, डिजिटायझेशन, ग्राहक सेवा सुधारणा याबाबत कोणती योजना आहे? ‘ध्येय’ म्हणजे ध्येय, उद्दिष्ट. आणि हे उद्दिष्ट जर समाजाच्या हिताचे नसेल तर बँक निवडणुकीचा व पत्रकारितेचा अर्थच उरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here