पत्रकार बांधवांचा ऐतिहासिक सन्मान : पाचोरा पीपल्स बँकेत ज्येष्ठ पत्रकार अनिलआबा येवले आमंत्रित सदस्यपदी नियुक्त

0

Loading

पाचोरा – पाचोरा शहर व तालुक्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या इतिहासात प्रथमच एका पत्रकाराला वित्तीय संस्थेच्या संचालक मंडळावर प्रतिनिधित्वाची संधी मिळाली आहे. पाचोरा पीपल्स बँक लि., पाचोरा या शहरातील नामांकित सहकारी बँकेच्या संचालक मंडळावर ज्येष्ठ पत्रकार अनिलआबा कालिदास येवले यांची आमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली असून, या निर्णयामुळे पत्रकार बांधवांच्या प्रतिनिधित्वाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. या ऐतिहासिक नियुक्तीमागे पाचोरा –
भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील,विविध राजकीय पक्षाचे मान्यवर,बँकेचे चेअरमन अतुलभाऊ संघवी, व्हाईस चेअरमन प्रशांतभाऊ अग्रवाल तसेच विद्यमान संचालक मंडळाचा व्यापक दृष्टीकोन अधोरेखित झाला आहे. या नियुक्तीने अनिलआबा येवले यांचा माजी आमदार दिलीप भाऊ वाघ,वैशालीताई सूर्यवंशी,अमोल भाऊ शिंदे,सचिन दादा सोमवंशी या राजकीय स्तरावरील मान्यवरांकडून कडून वैयक्तिक सन्मान झाला आहेच, परंतु त्यासोबत पत्रकारिता या क्षेत्रालादेखील प्रथमच संस्थात्मक स्तरावर मान्यता मिळाली आहे. पत्रकार हे समाजाचे डोळे-कान मानले जातात; परंतु त्यांच्या योगदानाला कधीही औपचारिक मान्यता मिळत नाही. पाचोरा पीपल्स बँकेने हा इतिहास घडवत पत्रकार बांधवांना नवी ओळख, नवा आत्मविश्वास आणि प्रोत्साहन दिले आहे. त्यामुळे पाचोरा शहरातील पत्रकार व समाजातील विविध घटकांतून संचालक मंडळाच्या या निर्णयाचे मनःपूर्वक कौतुक होत आहे. अनिलआबा येवले हे गेली तीन दशके पत्रकारितेत सक्रिय आहेत. “दक्ष पोलीस टाइम्स” या दैनिकातून त्यांनी आपला प्रवास सुरू केला आणि आजही त्याच वृत्तपत्राशी निष्ठा राखून कार्यरत आहेत. एका दैनिकाशी दीर्घकाळ निष्ठा ठेवून पत्रकारिता करणे हे स्वतःतच दुर्मिळ उदाहरण आहे. त्यांनी कधीही पत्रकारितेला वैयक्तिक फायद्याचे साधन केले नाही. जाहिराती मागणे, ब्रेकींग टाकून ब्लॅकमेलिंग करणे आणि अशा पत्रकारितेला उत्पन्नाचे साधन समजणे अशा प्रवृत्तींपासून ते नेहमीच दूर राहिले. उलट अनेकदा स्वतःच्या खिशातून खर्च करून बातम्या छापणे आणि गरजूंपर्यंत वृत्तपत्र पोहोचवणे हे त्यांनी आपले सामाजिक कर्तव्य मानले. समाजकारणातही त्यांचा वाटा लक्षणीय आहे. गरीब विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, पंखे, पुस्तके यांचे वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांना सायकली देऊन प्रोत्साहन देणे, अशा उपक्रमांतून त्यांनी शिक्षणक्षेत्राला हातभार लावला आहे. आपल्या कुटुंबावर आर्थिक संकटं, स्वतःवर कर्जाचे ओझे आले तरीही त्यांनी कधीही आपल्या प्रामाणिकपणाशी तडजोड केली नाही. त्यांचे सर्व जाती-धर्मांशी अगदी सलोख्याचे संबंध आहेत ते मुस्लिम वस्तीत पाच दशके राहूनही त्यांचे कोणाशीही वाद-विवाद नाही किंवा एकही गुन्हा किंवा साधी एन.सी. नोंद झालेली नाही, ही त्यांच्या संयमी व प्रामाणिक जीवनशैलीची साक्ष आहे. पत्रकारितेत त्यांनी नेहमीच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. समाजातील प्रत्येक घटकाची चांगली बाजू मांडणे, मान्यवरांचा सन्मान अधोरेखित करणे, लहानमोठ्या आनंदाच्या वा दुःखाच्या क्षणी लोकांसोबत राहणे, सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेचा आवाज पुढे नेणे, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले आहे. म्हणूनच पाचोरा शहरातील विविध सामाजिक संस्था, मान्यवर नागरिक, शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन आणि नगरपरिषद यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आहेत. पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालक मंडळावर त्यांची नियुक्ती होणे म्हणजे पत्रकारांच्या कामाला औपचारिक प्रतिष्ठा मिळण्याचा टप्पा आहे. पाचोरा – भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील , चेअरमन अतुलभाऊ संघवी, व्हाईस चेअरमन प्रशांतभाऊ अग्रवाल, संचालक अविनाशभाऊ भालेराव आणि इतर सर्व संचालक मंडळाचे यासाठी विशेष कौतुक केले जात आहे. त्यांनी एक पत्रकाराचे प्रतिनिधित्व बँकेत आणून सहकार चळवळीच्या इतिहासात नवा आदर्श निर्माण केला आहे. अनिलआबा येवले यांनी याआधीच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून धाडसी पाऊल उचलले होते. दोन मोठ्या पॅनेलसमोर एकाकी उभे राहूनही त्यांना तब्बल 400 च्या जवळपास मते मिळाली होती. यंदाही त्यांनी अर्ज दाखल केला होता; मात्र संचालक मंडळाने त्यांना पॅनेलच्या विजयासाठी सहकार्य करण्याची विनंती केली त्यांनी ती सहज स्वीकारून एका शब्दात माघार घेतली परिणामतः संचालक मंडळाने त्यांची आमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती केली. या निर्णयाने संचालक मंडळाचे वचनपूर्तीबाबतचे प्रामाणिकपण अधोरेखित झाले आहे. नियुक्ती जाहीर होताच शहरातील विविध संस्था, मान्यवर नागरिक आणि मित्रपरिवाराकडून त्यांचा मोठ्या उत्साहाने सत्कार करण्यात आला. फुलांचे गुच्छ, शाल-श्रीफळ, मानपान देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अजूनही अनेक ठिकाणी त्यांच्या नियुक्तीचा आनंद साजरा करण्यासाठी कार्यक्रम आयोजित होत आहेत. या उत्स्फूर्त प्रतिसादातून जनसामान्यातील त्यांच्यावरील विश्वास, प्रेम आणि आत्मीयता प्रकर्षाने दिसून येते. पत्रकार संदीप महाजन यांनीही या निमित्ताने चेअरमन अतुलभाऊ संघवी, व्हाईस चेअरमन प्रशांतभाऊ अग्रवाल, संचालक अविनाशभाऊ भालेराव तसेच सर्व संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांनी व्यक्त केले की, अशा प्रकारे निस्वार्थी व स्वावलंबी पत्रकारांना संधी मिळाली तर निश्चितच पत्रकार बांधवांना नवचैतन्य मिळेल आणि समाजाप्रती जबाबदारी अधिक जोमाने पार पाडता येईल. या घटनेने पाचोरा शहराच्या इतिहासात एक अभूतपूर्व टप्पा गाठला आहे. पत्रकारांच्या निस्वार्थ कार्याला समाजमान्यता मिळणे हे समाजजीवनाच्या परिपक्वतेचे द्योतक आहे. भविष्यात अशाच स्वरूपात पत्रकारांना विविध संस्थांच्या, मंडळांच्या व समित्यांच्या निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत राहिले तर लोकशाही अधिक बळकट होईल. पत्रकार बांधवांना केवळ चौथ्या स्तंभाचे स्थान न राहता समाजकारणाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागाची संधी मिळेल. पत्रकार बांधवांना मिळालेल्या या संधीमुळे भविष्यात बँकेच्या कार्यात अधिक पारदर्शकता, सकारात्मक संवाद आणि जनतेशी जास्तीत जास्त सलोखा साधला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. पत्रकारांचा सहभाग संचालक मंडळात असल्यानं बँकेच्या निर्णय प्रक्रियेत समाजातील सर्व घटकांचा आवाज पोहोचेल, हे निश्चित आहे. भविष्यात शैक्षणिक संस्था, सहकारी मंडळे, सामाजिक संघटना आणि अगदी नगरपरिषदांमध्येही पत्रकारांना प्रतिनिधित्व मिळावे, अशी अपेक्षा आता सर्वत्र व्यक्त होत आहे. कारण पत्रकार समाजातील समस्यांशी रोजच झगडतो, लोकांच्या वेदना आणि अपेक्षा जवळून पाहतो. त्यामुळे त्यांचा सहभाग कोणत्याही निर्णय प्रक्रियेत अधिक परिणामकारक ठरतो. पाचोरा पीपल्स बँकेच्या संचालक मंडळाने केलेल्या या ऐतिहासिक निर्णयातून इतर संस्थांनी प्रेरणा घ्यावी आणि पत्रकार बांधवांना संधी देऊन लोकशाही अधिक सबळ करावी, अशी मागणी होत आहे. पाचोरा शहराने पाहिलेला हा ऐतिहासिक क्षण केवळ एका व्यक्तीच्या नियुक्तीपुरता मर्यादित नाही, तर संपूर्ण पत्रकार बांधवांच्या सन्मानाचा आणि समाजातील विश्वासार्हतेचा टप्पा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here