![]()
मुंबई – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आरीज बेग मिर्झा यांची जळगाव जिल्हा काँग्रेस प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी ही घोषणा करताच जिल्हाभरात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. आर्णी (जि.यवतमाळ) येथील माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले असून युवक काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस पद त्यांनी भूषविले आहे. पक्ष संघटनेतील त्यांचा दीर्घ अनुभव, लोकांशी असलेले थेट संवादाचे कौशल्य आणि संघटन मजबूत करण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आल्याचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे. प्रदेश काँग्रेसतर्फे जळगाव जिल्हा काँग्रेसला अधिकृत पत्र पाठवून या नियुक्तीची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे फक्त जिल्हा प्रभारीच नव्हे तर विधानसभा निहाय प्रभारी नेमणुकीचीही घोषणा करण्यात आली असून यामुळे पक्षाच्या कार्याला अधिक वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या नियुक्त्यांमुळे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसची उपस्थिती ठळकपणे जाणवेल, असे कार्यकर्त्यांचे मत आहे. नियुक्त्या पुढीलप्रमाणे झाल्या आहेत – चोपडा विधानसभा प्रभारी म्हणून बुलढाण्याचे संजय उमरकर यांची नियुक्ती झाली आहे. अमळनेर मतदारसंघाची जवाबदारी किशोर कदम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. रावेरसाठी म.प्र.काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. अरविंद कोलते यांची निवड करण्यात आली आहे. भुसावळसाठी पक्षाचे आणखी एक सरचिटणीस रामविजय बुरुंगले यांची नियुक्ती झाली आहे. जळगाव शहर व ग्रामीण भागासाठी नाशिकचे प्रकाश पवार यांना प्रभारी करण्यात आले आहे. एरंडोल विधानसभा प्रभारी म्हणून बुलढाण्याचे माजी जि.प. अध्यक्ष प्रकाश पाटील यांची जबाबदारी निश्चित झाली आहे. चाळीसगावसाठी धुळ्याचे रणजितसिंग पवार प्रभारी राहणार आहेत. मुक्ताईनगरसाठी बुलढाण्याचे तुळशीराम नाईक यांची निवड करण्यात आली आहे. तर पाचोरा व जामनेर विधानसभा क्षेत्राची थेट जवाबदारी आरीज बेग मिर्झा यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यातील आगामी स्थानिक निवडणुका, विधानसभा निवडणुका तसेच पक्ष संघटन दृढ करण्याच्या दृष्टीने या नियुक्त्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहेत. जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांनी माहिती देताना सांगितले की, लवकरच नव्याने नियुक्त झालेल्या सर्व प्रभारींच्या बैठका आयोजित करून पुढील कार्यक्रम जाहीर केले जातील. तसेच प्रभारींचे जिल्हाभर दौरे होणार असून, कार्यकर्त्यांना थेट संवादाची संधी उपलब्ध होईल. जळगाव जिल्हा काँग्रेसमध्ये गेल्या काही काळापासून संघटनात्मक अडचणी जाणवत होत्या. परंतु या नव्या नियुक्त्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा संचारली असून पक्ष पुन्हा एकदा सक्षमपणे उभा राहील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. आरीज बेग मिर्झा यांच्या नेतृत्वाखाली जळगाव काँग्रेस अधिक प्रभावीपणे काम करेल आणि कार्यकर्त्यांना योग्य दिशा मिळेल, असे मत अनेक वरिष्ठ नेत्यांनी नोंदवले आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनदादा सपकाळ यांनी केलेल्या या नियुक्त्या जिल्हाभर गाजत असून, कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील काही आठवड्यांत होणाऱ्या बैठकीतून आगामी निवडणूक धोरण व संघटनवाढीचा मार्ग निश्चित केला जाणार आहे. काँग्रेसच्या जुने-नवे कार्यकर्ते यामुळे पुन्हा एकत्रित येऊन पक्ष अधिक बळकट होईल, अशी सर्वत्र चर्चा आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






