एस.एस.एम.एम. महाविद्यालयात पीएम-उषा कार्यशाळा उत्साहात संपन्न : विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्य व करिअर मार्गदर्शनाचा लाभ

0

Loading

पाचोरा – येथील शिक्षण क्षेत्रात लौकिक प्राप्त केलेल्या श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पीएम-उषा सॉफ्ट कॉम्पोनन्ट अंतर्गत कौन्सिलिंग फॉर बॉईज अँड गर्ल्स या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेचे उद्दिष्ट महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक, शैक्षणिक आणि सामाजिक जाणीवा अधिक दृढ करून त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविणे हे होते. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने मानसिक आरोग्य, करिअर समुपदेशन, किशोरवयीन अवस्थेतील समस्या व त्यांचे उपाय, तसेच मानसिक आणि शारीरिक स्वच्छतेचे महत्त्व या विविध पैलूंवर तज्ज्ञ मार्गदर्शन कार्यशाळेत देण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन पा. ता. सह. शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन तसेच क.ब.चौ.उ.म. विद्यापीठाचे अधिसभा सदस्य नानासाहेब व्ही.टी. जोशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांनी आजच्या बदलत्या जगात शैक्षणिक प्रगतीसोबतच मानसिक दृढता आणि शारीरिक स्वास्थ्य जोपासणे अत्यावश्यक असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा विद्यार्थ्यांना जीवनातील वास्तव आव्हाने स्वीकारण्याची हिंमत देतात असे सांगत महाविद्यालयीन प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा योग्य लाभ घेण्याचे आवाहन केले. या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलेल्या जळगाव विद्यापीठ रसायनशास्त्र अभ्यास मंडळाचे चेअरमन डॉ. गुणवंत सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक आयुष्याचा पाया भक्कम करण्यासाठी नियमित अभ्यास आणि आत्मविश्वासाचे महत्त्व पटवून दिले. विख्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राजेंद्र चिंचोले यांनी स्पर्धा परीक्षांच्या तयारीत मानसिक ताणाचे व्यवस्थापन कसे करावे यावर व्याख्यान दिले. त्यांनी युवकांनी सातत्य, संयम आणि योग्य दिशेने प्रयत्न केल्यास कोणतेही उद्दिष्ट साध्य करता येते हे आपल्या अनुभवातून स्पष्ट केले. एस.जी. पाटील महाविद्यालय, साक्रीचे मानसशास्त्र प्रा. जयप्रकाश चौबे यांनी किशोरवयीन अवस्थेतील शारीरिक व मानसिक बदल, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यांचे उपाय यावर सविस्तर समुपदेशन केले. त्यांनी पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद अधिक परिणामकारक करण्याची गरज अधोरेखित केली. डॉ. जी.डी. बेंडाळे महाविद्यालयाच्या डॉ. कीर्ती महाजन यांनी विद्यार्थ्यांना मानसिक तसेच शारीरिक स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी निरोगी शरीरातच निरोगी मन वसते, असे सांगत स्वच्छतेच्या दैनंदिन सवयींचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होतो हे उदाहरणासह स्पष्ट केले. या कार्यशाळेत चार सत्रांद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्येक सत्रात विविध विषयांचा सखोल उलगडा करून विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यशाळेत केवळ महाविद्यालयातीलच नव्हे तर इतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनीही सहभागी होऊन मोठ्या उत्साहाने कार्यक्रमाचा लाभ घेतला. एकूण 208 विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून या उपक्रमाला प्रतिसाद दिला. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित करत भविष्यातही अशा प्रकारच्या कार्यशाळा सातत्याने आयोजित करण्याचे आश्वासन दिले. उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले आणि डॉ. जे.व्ही. पाटील यांनीही कार्यशाळेच्या नियोजनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यशाळा समन्वयक प्रा. अतुल पाटील तसेच सह-समन्वयक डॉ. योगेश पुरी आणि डॉ. क्रांती सोनवणे यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागाला चालना देत कार्यक्रमाचे उत्तम नियोजन व यशस्वी पार पाडण्यासाठी कष्ट घेतले. या कार्यशाळेत महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. बी.एन. पाटील आणि डॉ. एस.एम. पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. त्यांच्या अनुभवसंपन्न भाषणामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच वैयक्तिक जीवनात सकारात्मक दृष्टीकोन विकसित करण्याची प्रेरणा मिळाली. कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यक्रम अधिक उत्साही आणि यशस्वी ठरला. विद्यार्थ्यांना या कार्यशाळेतून मानसिक दृढता, आत्मविश्वास, करिअर नियोजन आणि जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन मिळाल्याचे समाधान सर्वांनी व्यक्त केले. या प्रकारच्या कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांचा केवळ शैक्षणिक दर्जा उंचावत नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्व विकासालाही चालना मिळते. महाविद्यालयाने घेतलेला हा उपक्रम परिसरातील इतर शैक्षणिक संस्थांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे यात शंका नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here