एस एस एम एम महाविद्यालयात वाणिज्य मंडळाचा भव्य उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न

0

Loading

पाचोरा – शहरातील शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण स्थान मिळवलेले श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नेहमीच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांतून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासाची संधी उपलब्ध करून देत असते. ह्याच परंपरेला अनुसरून महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागामार्फत दरवर्षी आयोजित केला जाणारा वाणिज्य मंडळाचा उद्घाटन सोहळा यंदाही उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध क्षेत्रात यशस्वी झालेले माजी विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आली. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले सर यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन केले. त्यांच्या सोबत प्रमुख वक्ते म्हणून भडगाव येथील र. ना. देशमुख महाविद्यालयाचे वाणिज्यशास्त्र विषयातील ख्यातनाम प्राध्यापक डॉ. गजानन चौधरी उपस्थित होते. या वेळी सभागृहात उपस्थित सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत केले. वाणिज्य विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. योगेश पुरी यांनी प्रास्ताविक करताना महाविद्यालयातील वाणिज्य मंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. त्यांनी सांगितले की वाणिज्य मंडळ हे फक्त अभ्यासापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या व्यवसायाभिमुख दृष्टिकोनाला वाव देणारे, त्यांच्या उद्योजकतेच्या क्षमतेला चालना देणारे व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन कल्पना, तंत्रज्ञानाची जाण आणि आधुनिक व्यावसायिक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी वाणिज्य मंडळ वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करते. यानंतर प्रमुख वक्ते डॉ. गजानन डी. चौधरी यांनी “AI in कॉमर्स, AI in डेटा सायन्स, AI चा उपयोग व त्याच्या मर्यादा” या अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आजच्या काळात अत्यंत सुसंगत अशा विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आता केवळ तांत्रिक क्षेत्रापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती व्यावसायिक क्षेत्रातही क्रांतिकारी बदल घडवत आहे. ऑनलाईन व्यवहार, डिजिटल मार्केटिंग, ग्राहकांच्या खरेदीच्या सवयींचे विश्लेषण, डेटा सायन्सच्या आधारे बाजारपेठेतील बदलांचा अंदाज लावणे, तसेच लेखा प्रणाली आणि करसंबंधित प्रक्रिया यांमध्ये AI चा वापर कसा करता येतो हे त्यांनी सविस्तर समजावून सांगितले. त्याचबरोबर AI वापरताना येणाऱ्या मर्यादा, नैतिकता आणि डेटाच्या सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना सावधगिरी बाळगण्याचे मार्गदर्शनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. वासुदेव वले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना स्थानिक रोजगार संधींचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की आजच्या युगात मोठ्या शहरांमध्ये रोजगार मिळवण्यासाठी झटणाऱ्या तरुणांनी आपल्या मूळ गावीही उद्योग, व्यापार आणि सेवा क्षेत्रातील संधी शोधल्या पाहिजेत. महाविद्यालयातील वाणिज्य विभागातून शिक्षण घेऊन अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, काहींनी स्वतःचे व्यवसाय उभारले आहेत तर काही जण नामांकित कंपन्यांमध्ये उच्च पदांवर कार्यरत आहेत, हीच या विभागाची खरी कामगिरी आहे, असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील चार विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध स्पर्धांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना गौरवण्यात आले. या सन्मानामुळे उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाच्या सुयोग्य नियोजनासाठी आणि सुरळीत पार पडण्यासाठी वाणिज्य विभागातील प्राध्यापकांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सरोज अग्रवाल यांनी उत्तमरित्या पार पाडले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. जयश्री वर्मा वाघ यांनी करून दिला. आभार प्रदर्शन प्रा. किरण पाटील यांनी करताना सर्व उपस्थित पाहुण्यांचे, प्राध्यापकांचे, कर्मचाऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या सोहळ्याला प्रा. डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. आर. बी. वळवी, डॉ. शरद पाटील, डॉ. माणिक पाटील, प्रा. सुवर्णा पाटील, प्रा. प्राजक्ता शितोळे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. क्रांती सोनावणे, प्रा. जयश्री महाजन या प्राध्यापकांसह कर्मचारी श्री. भीला पवार, श्री. सुरेंद्र तांबे, जावेद देशमुख आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. लक्ष्मी गलाणी आणि प्रा. अक्षय शेंडे यांनी विशेष प्रयत्न केले. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. त्यांच्या चेहऱ्यावर पाहुण्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि सत्कारामुळे नव्या उमेदीचा आणि प्रेरणेचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. वाणिज्य मंडळाच्या उद्घाटनामुळे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरते मर्यादित न राहता उद्योग, व्यापार, तंत्रज्ञान, नव्या व्यवसाय कल्पना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या आधुनिक संकल्पनांची ओळख होईल, तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि भविष्यातील करिअर घडविण्यासाठी योग्य दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. अशा प्रकारे श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात झालेला वाणिज्य मंडळाचा उद्घाटन सोहळा केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी ज्ञानवर्धक, प्रेरणादायी आणि करिअर मार्गदर्शन करणारा ठरला. या कार्यक्रमातून महाविद्यालयाने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here