मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती मणिबेन एम.पी. शाह कला व वाणिज्य स्वायत्त महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात शारदोत्सव २०२५ (पाचवे वर्ष) अंतर्गत ‘नवदुर्गा : नवविचार’ व्याख्यानमालेत सहावे पुष्प म्हणून ‘कोसबाडच्या टेकडीवरून’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. विद्यार्थिनींसमोर अनुताई वाघ यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. कार्यक्रमास प्राध्यापकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या व्याख्यानातून समाजसेवेतील स्त्रीशक्तीच्या अद्वितीय योगदानाची जाणीव विद्यार्थिनींना झाली.
व्याख्यानादरम्यान निवेदिका वैशाली जाधव यांनी अनुताई वाघ यांच्या कार्याची सखोल चर्चा करत “कोसबाडच्या टेकडीवरून जीवनदृष्टी मिळते. समाजसेवा म्हणजे केवळ सेवा देणे नाही, तर मुलं शाळेत येत नसतील तर त्यांच्या अंगणात शाळेचं झाड लावण्याची जबाबदारी स्वीकारणे ही खरी सेवा आहे,” असे सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना सांगितले की, प्रत्येक नवीन गोष्ट घडवायची असेल, तर कामाच्या प्रत्यक्ष परिणामाऐवजी मानसिक तयारी, निग्रह आणि सातत्य आवश्यक आहे.
मोक्षाविषयीही विचार मांडले, “मोक्ष शोधताना किंवा काम करताना कामातून मिळणारा मोक्ष हीच खरी कोसबाडची टेकडी आहे. एखादी गोष्ट घडवायची असेल, तर तिच्या मानसिकतेवर निग्रह ठेवून काम करा; परिणामावर जास्त लक्ष केंद्रित करू नका.” त्यांच्या या स्पष्ट आणि प्रामाणिक मतांनी विद्यार्थिनींच्या मनात आत्मशोध आणि कार्याची महत्त्वाची शिकवण रुजली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेतील ज्योती पाटील यांनी केले. प्रमुख वक्त्यांचा परिचय पायल गोतपगार ह्या विद्यार्थिनीने करून दिला, तर कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी आभार प्रदर्शन केले. शारदोत्सवात अशा उपक्रमांनी विद्यार्थिनींना सामाजिक कार्य, स्त्रीशक्तीची जाणीव आणि जीवनदृष्टीचा अभ्यास करण्याची संधी दिली, असे उपस्थितांनी नोंदविले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.