आपत्तीग्रस्तांसाठी संजयदादा गरुड यांचा मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांना निधी सुपूर्द – ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, केवळ चमकोगिरीला चपराक

0

Loading

जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीने अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या, नाले तुडुंब भरून वाहू लागले, पूरस्थिती निर्माण झाली आणि शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. घरं, जनावरे, शेतीमाल वाहून गेला, अनेक ठिकाणी रस्ते तुटले, तर काही भागांतील लोकांना स्थलांतर करावे लागले. या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील शेतकरी वर्ग तसेच सर्वसामान्य जनतेवर आर्थिक संकट कोसळले आहे. या

पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन साहेब यांनी समाजातील सर्व घटकांना पुढे येऊन पूरग्रस्त बांधवांना मदतीचा हात देण्याचे भावनिक आवाहन केले होते.विशेष म्हणजे गिरीशभाऊंच्या या आवहानाला काही सेकंदात पहिलाच प्रतिसाद त्यांच्याच मतदार संघातील त्यांचे खंदे समर्थक संजयदादा गरुड यांच्याकडून मिळाला कारण वास्तविकता अशी आहे की राज्यात निम्यापेक्षा जास्त भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली असून प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन आपले निर्णय व दिशा ठरवून मदतीसाठी पावले उचलते तोपर्यंत वेळ जातो; शासकीय स्तरावरील मदत मिळेल तेव्हा मिळेल, पण तोपर्यंत नुकसान झालेल्यांनी काय करावे हा प्रश्न अत्यंत गंभीर बनतो. अशा वेळी स्थानिक पातळीवरून मदतीचा हात पुढे करणे ही खरी वेळेची गरज आहे. संजयदादा गरुड यांसारख्या लोकांनी अशा वेळी पुढे येऊन तातडीने मदत करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य संजयदादा गरुड यांनी एक प्रशंसनीय पुढाकार घेतला. त्यांनी स्वतः तसेच विविध संस्थांच्या माध्यमातून एकत्रित केलेला निधी आज मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे सुपूर्द केला. धुळे दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना संजयदादा गरुड यांनी जळगाव विमानतळावर प्रत्यक्ष भेट देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल रुपये ७,१०,६६६/- (सात लाख दहा हजार सहाशे साठसहा रुपये) इतकी आर्थिक मदत धनादेशाद्वारे सुपूर्द केली. या वेळी राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री मा. ना. श्री. गिरीशभाऊ महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री मा. ना संजय सावकारे, आमदार मा. आ. श्री. मंगेशदादा चव्हाण, आमदार मा. आ. किशोरआप्पा पाटील, आमदार मा. आ. अमोल जावळे, ज्येष्ठ नेते मा. श्री. अरविंद देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संजयदादा गरुड यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांवरून कौतुक करण्यात आले. या मदतीत शेंदुर्णीतील धी शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आचार्य गजाननराव गरुड पतसंस्था शेंदुर्णी, शेंदुर्णी सहकारी फळ विक्री संस्था मर्या. शेंदुर्णी, श्री त्रिविक्रम महिला सहकारी दूध उत्पादक संस्था मर्या. शेंदुर्णी या स्थानिक संस्थांचा सक्रिय सहभाग होता. यासोबतच संजयदादा गरुड व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सरोजिनी संजयराव गरुड यांनी वैयक्तिक पातळीवर देखील पुढाकार घेत आपल्या परीने मदतीचा हात दिला. “फुल ना फुलाची पाकळी” म्हणून त्यांनी या उपक्रमात योगदान देत पूरग्रस्त शेतकरी व सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी एकत्रित मदत उभी केली. याच पार्श्वभूमीवर समाजात दिसणाऱ्या एका प्रवृत्तीवर आता कटाक्ष टाकणे गरजेचे आहे. फक्त नेत्यांसोबत पूरग्रस्त भागांचा पहाणी दौरा करणे, फोटो काढून व्हिडिओ बनवणे आणि ते सोशल मीडियावर व्हायरल करून चमकोगिरी करण्यापेक्षा संजयदादा गरुड यांच्यासारखे प्रत्यक्ष दातृत्व दाखवणे हेच खरे समाजकारण आहे. हीच आजच्या काळाची खरी गरज आहे. केवळ कॅमेऱ्यासमोर पंचनामा करणाऱ्या शासकीय यंत्रणे सोबत उभे राहून लोकप्रियता मिळवण्याऐवजी पूरग्रस्तांच्या वेदना समजून त्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणे महत्त्वाचे आहे. संजयदादा गरुड यांनी केलेले हे काम त्या सर्वांना ठोस संदेश देणारे ठरते, जे फक्त दाखवण्यापुरते समाजकारण करतात. संजयदादा गरुड यांनी या भेटीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे पूरग्रस्तांच्या मदतीबाबत काही महत्त्वपूर्ण मागण्या देखील केल्या. त्यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देणे अत्यावश्यक आहे. यासाठी पिकांचे पंचनामे त्वरीत पूर्ण करावेत व नुकसानभरपाईचे वितरण तातडीने करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच शासनाने मदत कार्य अधिक गतीमान करून पूरग्रस्तांना त्वरित आधार मिळावा, यासाठी त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना विशेष विनंती केली. राज्यातील सामाजिक संस्था, सहकारी बँका, शैक्षणिक संस्थांनी अशा कठीण काळात पुढाकार घेऊन मदतकार्य हाती घ्यावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांनी यापूर्वी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत संजयदादा गरुड यांनी केवळ स्वतःच्या पातळीवर मदत न करता विविध संस्थांना प्रेरित केले आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर निधी गोळा झाला. त्यामुळे पूरग्रस्तांसाठी स्थानिक पातळीवरून होणाऱ्या या सामूहिक प्रयत्नांची प्रशंसा होत आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून केलेले हे कार्य स्थानिक जनतेसाठी प्रेरणादायी ठरले आहे. कठीण प्रसंगी शासनाबरोबरच समाजातील विविध घटकांनीही पुढे यावे, हीच खरी लोकशाही आहे, असे स्थानिकांनी यावेळी नमूद केले. संजयदादा गरुड यांची ही मदत केवळ आर्थिक साहाय्य नसून पूरग्रस्तांच्या मनात आशेचा किरण निर्माण करणारी ठरली आहे. या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातून राज्यातील आपत्तीग्रस्त बांधवांसाठी एकता, संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीचे सुंदर उदाहरण निर्माण झाले आहे. संजयदादा गरुड यांचा हा परोपकारी निर्णय आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना दिलेली आर्थिक मदत निश्चितच पूरग्रस्तांना नव्या ऊर्जेचा दिलासा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तसेच ही मदत जाहीर करताना दिलेला संदेश – “चमकोगिरीच्या नावाखाली केवळ फोटो-व्हिडिओ काढून सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यापेक्षा प्रत्यक्ष मदतीचा हात पुढे करणेच खरे समाजकारण आहे” – हा समाजातील प्रत्येक जबाबदार व्यक्तीने आत्मसात करण्याची आजच्या काळाची खरी गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here