मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : सेवा मंडळ एज्युकेशन सोसायटी संचालित श्रीमती एम.पी. शाह महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागात शारदोत्सव २०२५ (पाचवे वर्ष) अंतर्गत ‘नवदुर्गा : नवविचार’ व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेत पाचवे पुष्प म्हणून ‘स्व-कथाकथन’ या विषयावर व्याख्यात्या, लेखिका आणि कथाकथनकार डॉ. वृंदा कौजलगीकर यांनी व्याख्यान सादर केले. कार्यक्रमास विद्यार्थिनींसह प्राध्यापकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्त्री उपजतच सृजनशील असून तिचं योगदान केवळ कुटुंबापुरतं मर्यादित न राहता साहित्य, कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात ठसा उमटवते, असे त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. कौजलगीकर म्हणाल्या, “स्व-कथाकथन म्हणजे स्त्रीने स्वतःच्या अनुभवांवर, भावविश्वावर, संघर्षांवर व आत्मशोधावर आधारित कथन सादर करणे. हे केवळ आत्मकथन नसून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा, विचारांचा आणि सामाजिक स्थितीचा आरसा ठरतो.” त्यांनी सांगितले की स्त्रीच्या अनुभवातून समाजासही संदेश मिळतो आणि तिच्या जीवनातील कथा विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यांनी समाजातील स्त्रीच्या विविध भूमिकांवर आणि सृजनशीलतेवरही प्रकाश टाकला.
व्याख्यानादरम्यान डॉ. कौजलगीकर यांनी काही गंभीर आशयाच्या तर काही विनोदी रंगाच्या कथा सादर केल्या. त्यांच्या कथांमधून स्त्रीच्या संघर्षांचे, आनंदाचे आणि भावनांचे सूक्ष्म दर्शन घडले. प्रेक्षकांनी त्यांच्या कथांचा उत्साहाने आनंद घेतला. एका विद्यार्थिनीने सांगितले, “डॉ. कौजलगीकर यांच्या कथांमधून स्त्रीच्या जीवनातील विविध पैलू समजून घेता आले.” या कथांनी उपस्थितांना विचार करण्यास प्रवृत्त केले आणि स्वकथाकथनाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्ष कला शाखेतील टिशा जाधव हिने केले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. नेहा भोसले यांनी प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय करून दिला, तर यस्तरा मान हिने आभार प्रदर्शन केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींना सृजनशील अभिव्यक्तीला वाव मिळतो तसेच समाजातील स्त्रीच्या बहुआयामी योगदानाची जाणीव होते. शारदोत्सव सारख्या कार्यक्रमांनी साहित्य, कला आणि विचारांना नवी दिशा मिळवून दिली, असा सूर उपस्थितांनी नोंदविला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.