पाचोरा रेल्वे कृती समितीकडून खासदार स्मिताताई वाघ यांना पाचोरा स्थानकावरील रेल्वे सोयीसुविधा वाढविण्यासाठी निवेदन

0

Loading

पाचोरा : पाचोरा शहरासह परिसरातील प्रवाशांना संध्याकाळनंतर रेल्वे प्रवासात प्रचंड गैरसोय होत आहे. विशेषतः मुंबई व मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी सायंकाळी सहा वाजल्यानंतर कोणतीही गाडी उपलब्ध नसल्याने चार ते पाच तालुक्यांचा प्रवासीवर्ग अक्षरशः अडचणीत सापडतो. या पार्श्वभूमीवर पाचोरा रेल्वे कृती समिती तर्फे पाचोरा स्थानकावर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळावा, तसेच नाशिक–देवळाली–भुसावळ शटल गाडी पुन्हा सुरू करावी, अशा महत्त्वाच्या मागण्या पुढे सरसावल्या आहेत. यासाठी समितीने जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना सविस्तर निवेदन सादर केले. पाचोरा रेल्वे कृती समिती ही शहर व परिसरातील प्रवाशांच्या रेल्वे सुविधांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणारी संघटना आहे. या समितीने पूर्वीही विविध वेळा रेल्वे मंत्रालय, मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), तसेच रेल्वेमंत्र्यांकडे निवेदने सादर करून प्रवासी हिताच्या मागण्या मांडल्या आहेत. परंतु आजही पाचोरा स्थानकावर प्रवाशांना संध्याकाळीनंतर मोठा रेल्वे दुष्काळ भासतो. मुंबईकडे जाण्यासाठी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर एकही गाडी थांबत नसल्याने प्रवाशांना भुसावळ, जळगाव किंवा इतर मोठ्या स्थानकांवर जाऊन गाड्या पकडाव्या लागतात. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम या तिन्ही बाबतीत प्रवाशांवर ताण येतो. पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या दोन्ही गाड्या पाचोरा मार्गे जात असल्या तरी येथे थांबा नाही. जर या गाड्यांना पाचोरा स्थानकावर थांबा मिळाला तर मुंबईसह दिल्ली, नागपूर, अमरावती, भोपाळ, जबलपूर या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल. पाचोरा हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे केंद्र असून येथून दररोज शेकडो प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी तसेच रोजगाराच्या निमित्ताने जाणारे नागरिक मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यांसारख्या शहरांकडे जातात. त्यांना पाचोऱ्यावरूनच थेट लांब पल्ल्याच्या गाड्या मिळाल्यास वेळेची वाचवणूक होईल आणि प्रवास सोयीस्कर बनेल. याशिवाय पूर्वी चालणारी नाशिक–देवळाली–भुसावळ शटल गाडी बंद झाल्यामुळे स्थानिक प्रवाशांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नाशिक, मनमाड, देवळाली, भुसावळ या मार्गावरील दैनंदिन प्रवाशांना या शटल गाडीमुळे मोठा दिलासा मिळत होता. व्यापारी व्यवहार, शिक्षण, नोकरी किंवा वैद्यकीय कारणांसाठी नाशिककडे जाणाऱ्या नागरिकांसाठी ही गाडी अतिशय उपयुक्त होती. आता ती बंद झाल्याने प्रवाशांना महागडी बस सेवा किंवा इतर पर्यायी साधनांचा वापर करावा लागत आहे. शटल पुन्हा सुरू झाली तर पाचोरा व आसपासच्या प्रवाशांसाठी ही अत्यंत मोठी सोय ठरेल. या सर्व मागण्यांसाठी पाचोरा रेल्वे कृती समितीने आज खासदार स्मिताताई वाघ यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. समितीचे सहसचिव शेहबाज बागवान यांनी हे निवेदन देताना सांगितले की, “पाचोरा हे महत्त्वाचे स्थानक असून, या भागातील प्रवाशांची संख्या मोठी आहे. तरीदेखील स्थानकावरील सोयीसुविधा आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे थांबे मिळविण्याच्या बाबतीत दुर्लक्ष केले जाते. आम्ही अनेक वर्षांपासून या मागण्यांसाठी पाठपुरावा करीत आहोत. आता या मागण्या लवकर मान्य होणे गरजेचे आहे.” निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पाचोरा स्थानकावर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या दोन्ही गाड्या थांबल्यास केवळ पाचोरा नव्हे तर भडगाव, पाचोरा, एरंडोल, अमळनेर, चाळीसगाव अशा आसपासच्या तालुक्यांतील प्रवाशांनाही मोठा लाभ मिळेल. या भागातील अनेक विद्यार्थी, नोकरीसाठी प्रवास करणारे तरुण, व्यापारी तसेच लांब पल्ल्याचे नियमित प्रवासी दररोज रेल्वे सेवांचा वापर करतात. स्थानकावर गाड्या न थांबल्याने त्यांना अनेकदा अनावश्यक प्रवास करावा लागतो. खासदार स्मिताताई वाघ यांनी निवेदन स्वीकारत समितीच्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या म्हणाल्या की, “पाचोरा परिसरातील प्रवाशांचा हा दीर्घकालीन प्रश्न आहे. पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांना पाचोऱ्यावर थांबा मिळावा, तसेच नाशिक-देवळाली-भुसावळ शटल गाडी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी मी मध्य रेल्वे प्रशासन तसेच रेल्वे मंत्रालयाशी लवकरच चर्चा करेन. या मागण्यांसाठी योग्य ती पावले उचलण्याचा माझा प्रयत्न असेल.” पाचोरा रेल्वे कृती समितीने मागील काळात विविध आंदोलनांचे आयोजन करून हा प्रश्न वारंवार मांडला आहे. काही वेळा रस्ता व रेल रोकोसारख्या मार्गांनीही आंदोलन केले गेले. तरीदेखील आजपर्यंत अपेक्षित निकाल मिळालेला नाही. आता खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते हा विषय उच्च पातळीवर पोहोचल्याने प्रवाशांमध्ये काहीशी आशा निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते, जर पाचोरा स्थानकावर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेसचा थांबा मिळाला आणि नाशिक-देवळाली-भुसावळ शटल पुन्हा सुरू झाली, तर प्रवास सुलभ होईल, वेळ आणि खर्चाची बचत होईल, तसेच या भागातील व्यापारी, शैक्षणिक आणि सामाजिक जीवनाला नवी चालना मिळेल. पाचोरा परिसराचा विकास आणि लोकांच्या सोयीसाठी या मागण्या तातडीने मान्य व्हाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here