भडगाव – येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. सु.गि. पाटील माध्यमिक विद्यालय व सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय या प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेच्या ग्रंथालयाचे नूतनीकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या नव्या रुपात सजलेल्या ज्ञानमंदिराचे उद्घाटन माजी आमदार भाऊसो दिलीप ओंकार वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे व्हा. चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजयजी वाघ, बाबासो विनयजी जकातदार, नानासो विजयजी देशपांडे, आप्पासो सतीश चौधरी, ताईसो श्रीमती जयश्री पूर्णपात्री, माजी मुख्याध्यापक अरुण पाटील, विश्वासराव साळुंखे, शिवाजीराव पाटील, शेखर पाटील, जयराज पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. सौ. सु.गि. पाटील विद्यालय व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक व अद्ययावत ज्ञानस्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या ग्रंथालयाचे संपूर्ण नूतनीकरण करण्यात आले. हे नूतनीकरण स्वर्गीय रोहित शेखर पाटील यांच्या स्मरणार्थ शिवाजीराव पाटील यांच्या दातृत्वातून साकार झाले. भडगाव परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात दानशूर व्यक्तींनी नेहमीच पुढाकार घेतला असून त्याच परंपरेला अनुसरून पाटील कुटुंबाने केलेले हे योगदान अत्यंत मोलाचे मानले जात आहे. या सोहळ्यात माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ यांनी ग्रंथालयाच्या नव्या रुपरेषेचे कौतुक करताना विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलते. आजच्या AI च्या युगातही लोक पुन्हा एकदा पुस्तकांकडे वळतील. कारण ज्ञानाचा मूळ आधार नेहमीच ग्रंथालय राहिले आहे. जुन्या गोष्टी काळाच्या ओघात नव्या स्वरूपात आपल्यासमोर येतात, तसेच आज पुस्तकांचे महत्व पुन्हा वाढताना दिसेल.” त्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ग्रंथालयाचा अधिकाधिक उपयोग करून घ्यावा आणि सतत नवे ज्ञान आत्मसात करत राहावे, असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात नानासो व्ही. टी. जोशी यांनी भडगाव शहराच्या दानशूर परंपरेची माहिती देताना सांगितले की, “भडगाव हे शहर नेहमीच दातृत्वाने ओळखले गेले आहे. अनेक दानशूर व्यक्तींनी शैक्षणिक क्षेत्राला मोठे योगदान दिले असून त्यामुळेच आपली शैक्षणिक परंपरा भक्कम झाली आहे. आज या ग्रंथालयाचे नूतनीकरण त्या परंपरेला अधोरेखित करणारे आहे.” त्यांनी ग्रंथालयाचा विद्यार्थी व शिक्षकांनी मनापासून उपयोग करून घ्यावा, यासाठी प्रेरित केले. या सोहळ्यात विशेष सन्मान कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ यांच्या हस्ते शिवाजीराव पाटील व शेखर पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीत त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल त्यांना उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या तिलक प्रमोद जडे या गुणवान विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य ए. बी. अहिरे सर यांनी करून उपस्थितांना या नूतनीकरणाच्या मागची संकल्पना आणि कार्यप्रक्रिया सविस्तर सांगितली. सूत्रसंचालन शरद पाटील सर यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने केले, तर आभार प्रदर्शन शरद महाजन सर यांनी व्यक्त केले. यावेळी उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील, उपप्राचार्य संदीप सोनवणे सर, पर्यवेक्षक शरद महाजन सर, पर्यवेक्षिका छाया बिऱ्हाडे मॅडम, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या सर्वांनी एकजुटीने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. नूतनीकरणानंतरचे हे ग्रंथालय केवळ पुस्तके वाचनापुरते मर्यादित राहणार नाही, तर आधुनिक शिक्षण तंत्रज्ञानाशी जोडलेले असेल. विद्यार्थ्यांना संदर्भग्रंथ, स्पर्धा परीक्षा साहित्य, तसेच डिजिटल संसाधनांचा वापर करण्याची संधी येथे उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे भडगाव व परिसरातील विद्यार्थी अधिक ज्ञानसंपन्न होतील आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नवे बळ मिळेल, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. या सोहळ्यामुळे भडगाव शहरातील शैक्षणिक परंपरेला नवा उर्जा स्रोत मिळाल्याचे चित्र दिसून आले. ज्ञानमंदिरासारख्या या ग्रंथालयाचे नूतनीकरण केवळ एक भौतिक बदल नसून विद्यार्थ्यांसाठी नव्या संधींचे दार उघडणारे आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्तृत्वामुळे आणि स्थानिक दातृत्वामुळे हे महत्त्वाचे कार्य साकार झाले आहे. भविष्यात या ग्रंथालयातून अनेक यशस्वी विद्यार्थी घडतील, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.