पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. सु. गी. पाटील माध्यमिक विद्यालय व ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालयात आज जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास सीनियर सिटीजन जनकल्याण संस्था, भडगाव येथील सदस्य विशेषतः उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तात्या साहेब अनिल पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णासाहेब गुलाबराव जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक यांनी प्रास्ताविक करताना ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान का करावा यावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, “वृद्ध आणि अनुभवी व्यक्ती हे खऱ्या अर्थाने देशाची संपत्ती आहेत. त्यांचे ज्ञान, अनुभव व जीवनमूल्ये ही पुढील पिढीसाठी मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाने आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना आदराने वागवले पाहिजे.” यानंतर उपस्थित मान्यवर ज्येष्ठ नागरिकांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सन्मानित ज्येष्ठ नागरिकांमध्ये सी. आर. पवार, मोरसिंग राठोड, के. डी. वाघ, अशोक केदार, एस. डी. पाटील, अरुण पाटील, दयाराम वाघ, लक्ष्मीबाई महाजन, सरलाबाई महाजन, गोविंदा महाजन यांचा समावेश होता. त्यांचा सन्मान होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि विद्यार्थ्यांनीही आपल्या वडीलधाऱ्यांना मानाचा मुजरा केला. मंचावर उपमुख्याध्यापक आर. बी. पाटील, पर्यवेक्षिका सौ. सी. व्ही. बिऱ्हाडे, पर्यवेक्षक शरद महाजन, कार्यालय अधीक्षक डी. एस. सोनवणे, तसेच प्रथमेश जोशी, आनंद बागुल, चेतन पाटील, शितल साळुंखे, अशोक तायडे आणि डी. पी. पाटील उपस्थित होते. या मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून ज्येष्ठ नागरिकांच्या अनुभवाचा सन्मान करण्याची गरज व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन सोनजे यांनी प्रभावीपणे केले तर आभारप्रदर्शन शरद महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याचा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. विद्यार्थ्यांना यामधून कुटुंबातील वडीलधाऱ्यांबद्दल आदराची भावना जोपासण्याचा संदेश मिळाला. पिढ्यान् पिढ्या चालत आलेल्या संस्कारांची आणि अनुभवांची शिदोरी पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सोहळ्यातून दिसून आला.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.