चला पाचोरा! आता आश्वासन नको, तर पूर्ती हवी — १३ नोव्हेंबरपासून लक्षवेधी आंदोलन, तर १८ नोव्हेंबरपासून आंदोलक संदीप महाजन यांचे आमरण उपोषणआज मान्यवरांना निवेदन देऊन प्रतिक्रीया घेणार

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या अनुदानासाठी न्याय मिळावा या मागणीसाठी आंदोलनाचा बिगुल वाजला आहे. “आता आश्वासन नको, तर पूर्ती हवी!” या घोषवाक्याखाली दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता लक्षवेधी आंदोलन सुरू होणार आहे, तर शासनाने मागण्यांवर निर्णय न घेतल्यास १८ नोव्हेंबर २०२५ मंगळवार रोजी सकाळी ११ पासून आंदोलक संदीप महाजन आमरण उपोषणास बसणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. आंदोलक संदीप महाजन यांनी सांगितले की, २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जामनेर व चाळीसगाव तालुक्यांतील शेतकऱ्यांना जसे अनुदान दिले गेले, तसेच पाचोरा तालुक्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यातही कोणतीही अट न ठेवता आणि कोणत्याही कारणावरून विलंब न करता सरसकट अनुदान थेट जमा करण्यात यावे. यासाठी जे अधिकारी अथवा कर्मचारी अनुदान मिळण्यात अडथळे निर्माण करीत आहेत किंवा कर्तव्यात कसूर करीत आहेत, त्यांना निलंबित करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांनी पुढे सांगितले की, सन २०१९ पासून आतापर्यंतच्या सर्व शेतकरी अनुदानाची सविस्तर माहिती शासनाने पीडीएफ स्वरूपात तत्काळ सार्वजनिक करावी, जेणेकरून नागरिकांना पारदर्शक माहिती मिळेल. पाचोरा तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना अनुदान वितरणाच्या बाबतीत झालेल्या सर्व व्यवहारांचा तपशील जाणून घेण्याचा अधिकार आहे. या आंदोलनात तिसरी महत्त्वाची मागणी म्हणून संदीप महाजन यांनी म्हटले आहे की, सदरचा घोटाळा जालना, पाचोरा आणि आता मुक्ताईनगर येथे उघडकीस आला असल्याने या प्रकरणाची चौकशी केवळ स्थानिक पातळीवर न होता, राज्यभर उच्चस्तरीय यंत्रणांमार्फत व्हावी. त्यांनी स्पष्ट केले की, “या प्रकरणाचा तपास SIT, ED आणि CBI सारख्या स्वायत्त संस्थांमार्फत मे. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्यात यावा, जेणेकरून कोणत्याही दबावाशिवाय सत्य बाहेर येईल.” महाजन यांनी सांगितले की, पाचोरा येथील प्रथम तक्रारदार नाईक या शेतकऱ्यांने संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध व ई-सेवा केंद्रचालकांविरुद्ध थेट तक्रार दिली असतांना अशा प्रकरणात विलंब न लावता त्यांना तातडीने अटक करून चौकशी करण्यात यावी. आर्थिक गुन्हा शाखेतर्फे सुरू असलेला तपास हा पाचोरा तहसिलदार यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालावर आधारित आहे. परंतु या समितीतीलच एक सदस्य आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब आरोपी म्हणून निष्पन्न झाले असल्याने ही समिती संशयास्पद ठरत आहे. म्हणूनच आर्थिक गुन्हा शाखेने स्वतःच्या स्तरावरून स्वतंत्र तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. संदीप महाजन यांनी पुढे म्हटले की, “मे. न्यायालयासमोर तपासाअंती आरोपींची नावे निष्पन्न होण्याआधीच त्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र पोलिस पथक नेमले जावे. अन्यथा आरोपी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू शकतात.” तसेच, आर्थिक गुन्हा शाखेकडून होणारा तपास, पंचनामे आणि जबाब यांची नोंद प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल पुरावा स्वरूपात — म्हणजेच व्हिडीओ कॅमेरावर — करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी सांगितले की, न्यायालयासमोर सादर केलेल्या आरोपपत्रात काही लोकप्रतिनिधींच्या बनावट सह्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे कोणत्या लोकप्रतिनिधींच्या सह्या बनावटपणे करण्यात आल्या आहेत, त्यांची संपूर्ण नावे व तपशील सार्वजनिक करावेत. या प्रकरणात अटकेत असलेल्या ग्राम महसूल अधिकारी आशिष कडूबा काकडे यांच्या चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी — जे पाचोरा तालुक्याचे रहिवासी नाहीत आणि ज्यांच्याकडे स्वतःची शेती नाही — त्यांनी बनावट शेतजमिनीचे गट क्रमांक दाखवून अनुदान घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यात त्यांच्या वहिणी सौ. मोहिनी, सासरे विजय, सासू सौ. वैशाली, शालक आदित्य आदींचा समावेश आहे. तसेच आरोपी आणि त्यांच्या भावांनी पाचोरा शहरात जवळपास ८० लाख रुपये बाजारभावाने जमीन खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना तातडीने ताब्यात घेऊन त्यांच्यावर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी महाजन यांनी केली आहे. त्यांनी असेही सांगितले की, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी आरोपी क्रमांक २ गणेश हेमंत चव्हाण याने आपल्या वडिलांच्या मदतीने — हेमंत ज्ञानदेव चव्हाण — अनुदानाची रक्कम खोट्या लाभार्थ्याच्या खात्यावर वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले असूनदेखील हेमंत ज्ञानदेव चव्हाण यांना अद्याप सहआरोपी म्हणून समाविष्ट केलेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून त्यांनाही तातडीने आरोपी म्हणून गुन्ह्यात समाविष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. महाजन यांनी सांगितले की, यापुढे या प्रकरणात जे-जे आरोपी म्हणून निष्पन्न होतील, त्यांच्या अटकेसाठी तातडीने युद्धपातळीवर हालचाली करण्यात याव्यात. आरोपींना कायदेशीर संरक्षण मिळू नये, त्यासाठी ठोस पावले उचलावीत. या सर्व मागण्यांसाठीच हे लक्षवेधी आंदोलन आणि आमरण उपोषण होणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “आमचे आंदोलन शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आहे, कोणावर वैयक्तिक सूड नाही. शासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर आम्ही शेवटपर्यंत लढू.” शेवटी त्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले — “आंदोलनाच्या पावित्र्यात, एकतेचा दीप उजळू द्या! शेतकऱ्याच्या घामाचा आदर करा, भ्रष्ट्राचाराचा अंत करा आणि सर्व एकत्र या!” या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी अनुदान घोटाळा आंदोलक संदीप महाजन (मो. ७३८५१०८५१०) करीत असून, त्यांनी पाचोरा तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतकरी हितचिंतक आणि नागरिकांना या लढ्यात एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भात आंदोलक संदीप महाजन यांनी सदरचे निवेदन संबंधित शासकीय अधिकाऱ्यांना दिले असून आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी स्थानिक स्तरावर आमदार किशोरआप्पा पाटील,माजी आमदार दिलीपभाऊ वाघ,अमोलभाऊ शिंदे,वैशालीताई सूर्यवंशी,सचिनदादा सोमवंशी,उद्धवभाऊ मराठे,रमेशशेठ बाफना या मान्यवरांना भेटून आंदोलन निवेदनाच्या प्रती देऊन ऑन व्हिडिओ कॅमेरा त्यांची प्रतिक्रिया घेणार आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here