![]()
पाचोरा – ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या विवाह नोंदणी विभागामध्ये सध्या अत्यंत भोंगळ व अनागोंदी स्वरूपाचा कारभार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर येत आहे. शासनाने नागरिकांना सुलभ, पारदर्शक व वेळेत सेवा मिळाव्यात या उद्देशाने विवाह नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली असली, तरी प्रत्यक्षात या विभागात सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या विभागातील संबंधित कर्मचारी यांच्या जाण्या-येण्याची वेळ निश्चित नसल्याने नागरिकांना कार्यालयात येऊनही तासन्तास वाट पाहावी लागते. अनेक वेळा कार्यालय उघडे असतानाही लाईट व पंखे सुरू ठेवलेले असतात; मात्र प्रत्यक्षात कार्यालयात कोणताही कर्मचारी उपस्थित नसतो, अशी तक्रार वारंवार केली जात आहे. परिणामी, दूरवरून आलेल्या अर्जदारांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात आहेत. नागरिकांनी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, “कामानिमित्त बाहेर आहे” असे सांगून वेळ मारून नेली जाते, असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, काही वेळा आर्थिक देवाण-घेवाण केल्यास कामे त्वरित पूर्ण होतात, तर नियमाप्रमाणे अर्ज सादर करणाऱ्या सामान्य नागरिकांना मात्र आठवड्यांनंतरही दाखल्यासाठी प्रतीक्षा करावी लागते, असा आरोपही होत आहे. हा प्रकार प्रशासनाच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. विवाह नोंदणीचा अर्ज दिल्यानंतर विवाह दाखला तयार होण्यासाठी नियमाने किती कालावधी लागतो, याची स्पष्ट माहिती कार्यालयात कुठेही दर्शविण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होतो. तसेच अनेक वेळा अपूर्ण अर्ज स्वीकारले जातात आणि नंतर कागदपत्रांच्या नावाखाली पुन्हा-पुन्हा नागरिकांना बोलावले जाते. एकाच वेळी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची सविस्तर माहिती दर्शविणारा फलक कार्यालयात लावण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याशिवाय, संबंधित कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी कोण आहेत, त्यांची नावे, हुद्दे व संपर्क क्रमांक यांची माहिती दर्शविणारा फलक असणे अत्यावश्यक आहे. मात्र सध्या अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांना नेमके कोणाशी संपर्क साधावा, हेही समजत नाही. तसेच संबंधित कर्मचारी स्थानिक रहिवासी आहेत की अप-डाऊन करून ये-जा करतात, याचीही वरिष्ठ स्तरावरून सखोल परताळणी करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन चौकशी करावी, विवाह नोंदणी विभागातील कारभार नियमबद्ध, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्यासाठी ठोस उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा पाचोरा परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत. अन्यथा शासनाच्या लोकाभिमुख सेवेची संकल्पना केवळ कागदावरच राहील, अशी संतप्त भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






