![]()
पाचोरा ( चेतना हिरे ) अनिर्बंध औद्योगिकीकरण, झपाट्याने वाढणारे शहरीकरण आणि मोठ्या प्रमाणावर होत असलेली जंगलतोड यामुळे आज पर्यावरणासमोर गंभीर आव्हाने उभी ठाकली आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचे नुकसान टाळत आर्थिक प्रगती साधणे ही काळाची गरज बनली असून, प्रदूषण कमी करण्यासाठी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा तसेच सौर उपकरणांचा व्यापक वापर हाच शाश्वत विकासाचा प्रभावी मार्ग असल्याचे प्रतिपादन उमवि येथील व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या प्रा. डॉ. सुरेखा पालवे यांनी केले. आजच्या काळातील शिक्षकांची भूमिका दीपस्तंभासारखी असून समाजात विवेकशीलता निर्माण करणे हाच शाश्वत आर्थिक विकासाचा खरा पाया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पारोळा येथे शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत आणि यांच्या संयुक्त विद्यमाने “मानवता आणि पर्यावरण : शाश्वत विकासासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोन” या विषयावर एकदिवसीय आंतरविद्याशाखीय शासकीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. सुरेखा पालवे बोलत होत्या. या महत्त्वपूर्ण परिषदेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अधिसभा सदस्य प्रा. डॉ. वर्षा पाटील, प्रा. डॉ. भूपेंद्र केसुर आणि प्रा. डॉ. विकास गीते यांनी आपले विचार मांडले. बीजभाषक म्हणून येथील शास्त्रज्ञ डॉ. महेश पाटील यांनी पर्यावरणीय समस्यांचे वैज्ञानिक पैलू, त्यावरील संशोधनाची गरज आणि नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शाश्वत विकास कसा साधता येईल यावर सखोल मार्गदर्शन केले. या परिषदेस राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून जवळपास २०० प्राध्यापक आणि संशोधकांनी नोंदणी केली तर सुमारे दीडशे संशोधन निबंध प्राप्त झाले. विविध विद्याशाखांतील संशोधकांनी मानवता, पर्यावरण, अर्थशास्त्र, विज्ञान, वाणिज्य आणि सामाजिक शास्त्र यांचा समन्वय साधत शाश्वत विकासाच्या संकल्पनेवर आपले विचार मांडले. या परिषदेत येथील वाणिज्य विभागाच्या प्राध्यापिका प्रा. सौ. जयश्रीताई वर्मा वाघ यांनी संशोधक विद्यार्थिनी म्हणून आपला शोध निबंध सादर केला. त्यांच्या संशोधन निबंधात पर्यावरण संरक्षण आणि आर्थिक विकास यामधील संतुलन तसेच स्थानिक पातळीवर राबवता येणाऱ्या शाश्वत उपाययोजनांचा सखोल अभ्यास मांडण्यात आला होता. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थित तज्ज्ञ, प्राध्यापक आणि संशोधकांकडून विशेष दाद मिळाली. निबंध सादरीकरणानंतर त्यांनी मनोगतात्मक अभिप्राय व्यक्त करत संशोधन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाय आणि भविष्यातील संशोधनाच्या संधी याविषयी आपले अनुभव सांगितले. याचवेळी प्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी शाश्वत विकासाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण करताना समाजाच्या वाढत्या गरजा कशा संतुलित करता येतील यावर मार्गदर्शन केले. विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची अपरिमित हानी होऊ न देता नैसर्गिक संसाधनांचा विवेकपूर्ण वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. एकूणच पारोळा येथे झालेली ही एकदिवसीय राज्यस्तरीय परिषद शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली असून मानवता आणि पर्यावरण यांचा समतोल राखत शाश्वत विकास साधण्यासाठी बहुविद्याशाखीय दृष्टिकोन किती आवश्यक आहे हे या परिषदेमधून अधोरेखित झाले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.































